Mumbai NCP joining event : अहिल्यानगरच्या श्रीगोंदा तालुक्यात मोठी राजकीय उलथापालथ झाली आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी तळ्यात-मळ्यात अशी भूमिका असलेले माजी आमदार राहुल जगताप यांनी आता आपली राजकीय भूमिका स्पष्ट केली आहे. तसेच त्यांचे राजकीय प्रतिस्पर्धी राजेंद्र नागवडे यांनी देखील मोठी भूमिका घेतली.
जगताप अन् नागवडे यांनी एकाच वेळी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या उपस्थित हा प्रवेश मुंबईत झाला. जगताप अन् नागवडे या दोघा राजकीय प्रतिस्पर्धांनी एकाचवेळी हा पक्ष प्रवेश केल्याने त्यांची तालुक्यात राजकीय 'सहमती एक्सप्रेस' किती दूरवर धावणार, अशी चर्चा रंगली आहे.
लोकसभा निवडणुकीनंतर अन् विधानसभा निवडणुकी पूर्वी माजी आमदार राहुल जगताप यांची राजकीय भूमिका गुलदस्त्यात होती. शरद पवार की, अजित पवार (Ajit Pawar), असा त्यांचा संभ्रम होता. यातच विधानसभा निवडणुकीला श्रीगोंद्याची जागा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाला सोडण्यात आली. तिथं अनुराधा नागवडे यांनी ऐनवेळी शिवसेना ठाकरे पक्षात प्रवेश करत निवडणूक लढवली.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार (Sharad Pawar) पक्षाकडून इच्छुक असलेले माजी आमदार राहुल जगताप यांचा चांगलाच हिरमोड झाला. तिकीटासाठी त्यांनी शरद पवार यांच्यासमोर मोठं शक्तिप्रदर्शन केलं होते. तब्बल शंभर पेक्षा जास्त मोटरगाडीतून जात गेलेले हे शक्तिप्रदर्शन राज्यात चर्चेत आलं होते. जागा शिवसेना ठाकरे पक्षाला गेल्याने नाराज झालेले राहुल जगताप अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरले.
निवडणुकीच्या रिंगणात जगताप आल्याने नागवडे यांना त्याचा फटका बसला अन् भाजपचे विक्रम पाचपुते यांचा विजयाचा प्रवास सुखकर झाला. विरोधात राहून पुढचं राजकारण सोपं नाही. त्यातच दोन्ही नेते सहकार संस्थांनी निगडीत. या संस्थांसाठी पुढचं राजकारणाची जुळवाजुळव करत, हा पक्ष प्रवेश दोघांसाठी गरजेचा असल्याचे जाणकारांचे म्हणणे आले. हा झाला सर्व राजकीय इतिहास.
अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या उपस्थित मुंबई कार्यालयात माजी आमदार राहुल जगताप आणि नागवडे सहकारी कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांनी एकत्रित प्रवेश केला. या दोघांच्या पक्ष प्रवेशाने श्रीगोंदा तालुक्यात येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था आणि नगरपालिका निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाची ताकद वाढली असून तालुक्यातील राजकारणाला पुन्हा कलाटणी मिळणार आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जगताप-नागवडे 'सहमती एक्सप्रेस' तालुक्यात जोरात धावल्यास आगामी निवडणुकांमध्ये भाजपचे आमदार विक्रम पाचपुते यांची डोकेदुखी निश्चित वाढणार आहे. महायुतीची सत्ता आल्यानंतर अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये जोरदार पक्षप्रवेश सुरू आहे. यापूर्वी श्रीगोंद्यातून काँग्रेसचे घनश्याम शेलार, तसेच मंत्री विखे यांचे कट्टर समर्थक जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष आण्णासाहेब शेलार यांनी राष्ट्रवादी प्रवेश केला होता.
श्रीगोंदा तालुक्यातील नेत्यांच्या बळावर जिवंत असलेल्या काँग्रेस पक्षातील नेत्यांसह पक्षाचे तालुकाध्यक्ष प्रशांत दरेकर यांनी देखील अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. त्यामुळे काँग्रेस पक्ष पुन्हा एकदा पोरका झाला आहे. अनेक वेळा स्वार्थासाठी दुसऱ्या पक्षात जाणाऱ्या नेत्यांना पुन्हा-पुन्हा पक्षात घेत पावन करून घेतल्याने काँग्रेसवर ही वेळ आल्याचे बोलले जात आह. श्रीगोंद्यातील हेमंत ओगले हे श्रीरामपूर मतदारसंघाचे काँग्रेसकडून लोकप्रतिनिधी आहे. ते मूळचे श्रीगोंद्याचे आहेत, एवढं काही काँग्रेसचे बळ श्रीगोंद्यात पाहायला मिळणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.