Prakash Chitte 1 Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Prakash Chitte On Radhakrishna Vikhe : 'मंत्री विखेंचा हिंदुत्वाशी अलीकडच्या काळात संबंध'; प्रकाश चित्तेंनी इतिहासच काढला

Prakash Chitte Responds to Radhakrishna Vikhe Patil on BJP Selections : अहिल्यानगर जिल्ह्यात मंडलाध्यक्ष आणि जिल्हाध्यक्ष नियुक्तीवरून भाजपमध्ये वाद उफाळला असून, मंत्री राधाकृष्ण विखे यांनी ओबीसी मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष प्रकाश चित्ते यांच्यात चांगलाच वाॅर भडकला आहे.

Pradeep Pendhare

Maharashtra political news : भाजपच्या मंडलाध्यक्ष अन् जिल्हाध्यक्षांच्या निवडी होत आहे, थेट लोकांच्या संपर्कात असलेली ही पदं, पक्ष संघटनेत महत्त्वाची आहेत. या पदांवर आपल्याच मर्जीतला पदाधिकारी असावा, यासाठी भाजप पक्ष संघटनेतील मंत्री, नेते यांच्यात स्पर्धा अन् कुरघोड्या रंगल्या आहेत. यातून मात्र भाजपच्या निष्ठावान जुन्या कार्यकर्तांना डावलले जात असल्याने, त्यांनी मंत्री, नेत्यांनी थेट पंगा घेण्यास सुरुवात केली आहे.

अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूरमध्ये भाजपमध्ये असाच वाद उफाळलेला आहे. यातून झालेल्या बॅनरबाजीमुळे भाजप मंत्री राधाकृष्ण चांगलेच दुखावले गेले. यावर त्यांनी असंतुष्टांकडून असे प्रकार होणार, लक्ष देत नाही, असे म्हणत फटकारले. आता मंत्री विखेंना भाजपचे निष्ठावान अन् जुने कार्यकर्ते ओबीसी मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष प्रकाश चित्ते यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

प्रकाश चित्ते यांनी म्हटले आहे की, "सत्तेचे पद असेल, तर संतुष्ट! सत्तेचे पद नसेल, तर असंतुष्ट! अशा सत्ता केंद्रित भावनेभोवती नामदार विखेंच्या संतुष्ट असंतुष्टांच्या कल्पना साकारलेल्या आहेत. विखेंचा हिंदुत्वाशी (Hindu) अलीकडच्या काळात संबंध आल्याने त्या "आनंदाची" कल्पना त्यांना येवू शकत नाही. मला असंतुष्ट ठरवण्यापेक्षा ज्या दोघाना मंडळ अध्यक्ष नेमले, त्यांच्या नियुक्तीच्या कारणांवर व गुणवत्तेवर (मिरीटवर) चर्चा करा ना!"

श्रीरामपूर तालुक्यात गेल्या 30-35 वर्षापासून काम करणाऱ्या भाजपच्या (BJP) छोट्या-छोट्या कार्यकर्त्यांना राजकीय सत्तेची पदे मिळू शकत नाही. त्यामुळे त्यांनाच पक्ष संघटनेची पदे देण्यात यावी व त्यांच्या जीवनाचे सार्थक व्हावे, यासाठी माझा लढा कायम राहणार, असेही प्रकाश चित्ते यांनी ठामपणे सांगितले.

भाजपच्या जुन्या कार्यकर्त्यांची कोंडी

मंत्री विखेंना माझ्या या कार्यपद्धतीवर आक्षेप आहे, मेंदू काढून त्यांच्यासोबत त्यांना समर्पित होऊन काम करावे, अशी त्यांची अपेक्षा आहे. जिल्हाभर असलेल्या भाजप जुन्या कार्यकर्त्यांकडून सुद्धा त्यांची हीच अपेक्षा आहे. त्यामुळे जिल्हाभर भाजपच्या जुन्या कार्यकर्त्यांची कोंडी झालेली आहे. आता व्यक्ती सापेक्ष काम न करता भाजप सापेक्ष काम करीत आहोत. त्यामुळे ते पक्षात आल्यापासून सहा वर्ष ते माझ्यावर नाराज आहेत. त्यामुळेच माझी हकालपट्टी झाली, ही हकालपट्टी केवळ तांत्रिक आहे. भारतीय जनता पक्षाचे संघटन आणि मनाने प्रचंड एकरूप आहोत. सत्ता नसतानाही भारतीय जनता पक्षात होतो, आजही भाजपतच आहे आणि पुढेही भाजपचाच राहणार आहे, याबद्दल कोणी शंका बाळगण्याचे कारण नाही, असेही प्रकाश चित्ते यांनी म्हटले.

विखेंनी भाजपच्या कार्यकर्त्यांना स्वीकारलेच नाही

राधाकृष्ण विखे पाटील मंत्री झाल्यानंतर त्यांच्या समर्थनात श्रीरामपूरमध्ये मोठी मोटरसायकल रॅली काढून मनापासून स्वागत केले. मात्र विखे यांनी जिल्हाभर जुन्या भाजपच्या कार्यकर्त्यांना स्वीकारले नाही. त्यांना सावत्रपणाची वागणूक दिली, त्यांचा छळ केला, त्यांना दुबळे म्हणून हिणवले. मात्र या दुबळ्यांनीच आभाळाएवढी हिंमत धरून काँग्रेसमय असलेला जिल्हा भाजपमय केला आणि काँग्रेसची जिल्ह्यात वाट लावली, हे मंत्री विखे सोयीस्करपणे विसरतात, जुन्यांच्या योगदानाची साधी त्यांची जाणिवही ठेवत नाही. जुने भाजप संपवणे म्हणजे भाजप वाढवणे, असे नाही नामदारांचे हे वागणे बरोबर नाही, असा टोला देखील प्रकाश चित्ते यांनी लगावला.

विचारधारेची आठवण

श्रीरामपूर तालुक्यात हिंदुत्वाच्या विचारधारेची 45 टक्के मते तयार झालेली आहे. मात्र या मतांचे कोणी श्रेय घेऊ नये ही विचारधारा रुजवण्यासाठी या तालुक्यात (कै.) श्यामजी व्यास , (कै.) माधवराव डावरे , (कै.) बद्रीशेठ हरकुठ , (कै.) मुरलीशेठ खटोड , (कै.) अनंतराव याडकीकर, (कै.) बाबा साठे, (कै.) गिरधरलाल गुलाटी, (कै.) सुभाष गुलाटी , (कै.) बाबूशेठ चंदन, (कै.) बाळकृष्ण पांडे , हेरंबजी आवटी, प्रवीण पांडे आदींनी ऋषितुल्य व्यक्तींनी आपले संपूर्ण जीवन संघ विचारधारेसाठी समर्पित केल्याची आठवण प्रकाश चित्ते यांनी करून दिली.

न्यायासाठी लढा देणे हा गुन्हा नाही

गेली 30-35 वर्ष हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी काँग्रेसचे विरोधात संघर्ष केला, पक्षाचे काम करताना माझ्यासह अनेक सहकाऱ्यांचे प्रपंच उद्ध्वस्त झाले, या साऱ्या कार्यकर्त्यांचा सन्मान करता येत नसेल, तर किमान त्यांचा अपमान करू नका. अशा 35-35 वर्ष भाजपचे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी साधी मंडलाध्यक्षाची अपेक्षाही ठेवायची नाही का? असा सवाल देखील प्रकाश चित्ते यांनी केला. मंत्री विखेंच्या गटातही अनेक गट आहेत, आणि प्रत्येक गट आणि व्यक्ती एकमेकांच्या प्रचंड विरोधात असून एकमेकांचे शत्रू आहेत. बॅनरबाजीचा अन् आमचा कुठलाही संबंध नाही, ज्या काही गोष्टी न्याय मिळवण्यासाठी करायचा त्या आम्ही उघड-उघड करू. छोट्या छोट्या कार्यकर्त्यांच्या न्यायासाठी लढा देणे हा काही गुन्हा नाही आणि हे सर्व पक्ष जाणतो, असे चित्ते यांनी म्हटले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT