
Mahayuti Coalition Controversy : देशाला आता प्रतीक्षा आहे ती पाकिस्तानला कधी धडा शिकवला जातो याची. पहलगाम येथे अतिरेक्यांनी केलेल्या घृणास्पद कृत्यामुळे विरोधी पक्षांसह सारा देश केंद्र सरकारच्या पाठिशी ठामपणे उभा आहे. समाजात संताप निर्माण झाला आहे.
निष्पाप 26 नागरिकांचे बळी घेणाऱ्या पाकिस्तानला आता त्याची जागा दाखवून दिली पाहिजे, अशी भावना समाजात निर्माण झाली आहे. देशाला एकजूट होण्याची गरज असलेल्या या मोक्याच्या वेळी धर्माच्या आधारावरच फूट पाडली जात आहे. शत्रूचा डाव हाणून पाडण्यासाठी सध्याची वेळ एकी दाखवण्याची आहे, आपसात भांडण्याची नव्हे, हे सर्वांनीच समजून घेतले पाहिजे.
सरकार जनतेच्या भावनांनुसार काम करणार, पाकिस्तानला कायमचा धडा शिकवणार, हे निश्चित आहे. तसे संकेतही मिळत आहेत. मात्र अशा परिस्थितीत काही घटक अंतर्गत वाद निर्माण करत आहेत. अतिरेक्यांच्या कृत्यासाठी एका विशिष्ट समुदायाला दोषी धरून त्यांच्यावर बहिष्कार घालण्याचे आवाहन जाहीरपणे केले जात आहे.
देशासमोरील संकटाचा एकजूट होऊन सामना करण्याची गरज असताना आपसात वाद निर्माण करण्याचे प्रयत्न जोरकसपणे सुरू झाले आहेत. दुर्दैवाने महायुती (Mahayuti) सरकारमधील एक मंत्री याकामी आघाडीवर असल्याचे दिसत आहे.
पोलिसांविषयी आक्षेपार्ह विधान करणाऱ्या आमदाराबाबत कठोर भूमिका घेणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देश कठीण परिस्थितीतून जात असताना धर्माच्या आधारावर समाजात उभी फूट पाडण्याचे मनसुबे बाळगणाऱ्या आपल्या मंत्र्याला कठोर शब्दांत का सुनावत नसतील?, असा प्रश्न आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी पोलिसांविषयी आक्षेपार्ह विधान केले. आमदार गायकवाड हे वादग्रस्त विधानांसाठी ओळखले जातात. कोणत्याही विषयाचे सरसकटीकरण करण्याची प्रथाच जणू रूढ झाली आहे.
धार्मिक पातळीवरही तसाच प्रकार सुरू आहे. ''महाराष्ट्र पोलिसांसारखे अकार्यक्षम खाते जगात नाही. पोलिस 50 लाख रुपये जप्त करतात आणि 50 हजार जप्त केल्याचे दाखवतात,'' असे आमदार गायकवाड म्हणाले होते. एसा प्रकार एखाद्या ठिकाणी झालेला असेल, त्याची आमदार गायकवाड यांना माहिती असेल, असे गृहीत धरले तरी सर्वच पोलिस अधिकारी, कर्मचारी तसेच आहेत, असे म्हणणे अतार्किक आहे.
गृहखाते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे. आमदार गायकवाड यांच्या विधानाने फडणवीस यांचा संताप होणे साहजिक होते. त्यांनी आमदार गायकवाड यांना कानपिचक्या दिल्या. ''पोलिसांबाबात असे बोलणे योग्य नाही. आमदार गायकवाड यांना समज द्या, असे मी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सांगणार आहे.
सुधारणा नाही झाली तर त्यांच्यावर अॅक्शन घेण्यात येईल,'' असे फडणवीस म्हणाले. त्यानंतर शिंदे यांनी गायकवाडांना समज दिली आणि त्यांचे विमान जमिनीवर आले. पोलिसांविषयी मला जो अनुभव आला तो मांडला, तरीही दिलगिरी व्यक्त करतो, असे म्हणत गायकवाड यांनी या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी या प्रकरणात दाखवलेली तत्परता कौतुकास्पद आहे. पोलिसांना विविध समस्या झेलत काम करावे लागते, सतत टीकेचे धनी व्हावे लागते. अशा परिस्थितीत गायकवाड यांच्या विधानाने पोलिसांचे खच्चीकरण झाले होते. त्यामुळे फडणवीस यांनी आमदार गायकवाड यांना अत्यंत योग्यवेळी सुनावले. अशीच तत्परता मुख्यमंत्री फडणवीस हे आपल्या त्या मंत्र्याबद्दल का दाखवत नसतील जो धर्म विचारून खरेदी करा, संशय आला तर हनुमान चालिसा म्हणायला लावा, असे आवाहन जाहीरपणे करत आहे.
अतिरेक्यांनी धर्म विचारून गोळ्या घातल्या, हे घृणास्पद, निषेधार्ह कृत्य आहे. देशभरात सर्वांकडूनच त्याचा धिक्कार केला जात आहे. त्यामुळे अतिरेक्यांना आणि त्यांना पोसणाऱ्या पाकिस्तानला धडा शिकवण्याची मागणी देशभरातून, सर्व समाजांतून होत आहे.
अतिरेकी आणि पाकिस्तानवर हा अखेरचा घाव असावा, त्यांना पुन्हा डोके वर काढता आले नाही पाहिजे, अशी भावना लोकांमध्ये निर्माण झालेली आहे. अशा परिस्थितीत धर्म विचारून खरेदी करा, असे आवाहन करून सरकारमधील मंत्र्याला देशाला, समाजाला मजबूत करायचे आहे की कमकुवत करायचे आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे. अशी फूट पाडून देश, समाज समृद्ध होणार आहे का? देशाची, समाजाची प्रगती होणार आहे का? असे प्रश्न आहेत. त्यामुळेच मुख्यमंत्री फडणवीस हे या मंत्र्याचे कान पिळतील, अशी अपेक्षा आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.