Shrirampur politics Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Shrirampur politics : मुरकुटेंमधील जुना शिवसैनिक जागा झाला; अहिल्यानगरमधील मेळावा टाळल्यानं गटबाजीची 'ठिणगी'

Ahilyanagar Bhanudas Murkute And Sanjay Chhallare Join Eknath Shinde Shiv Sena in Thane : माजी आमदार भानुदास मुरकुटे आणि संजय छल्लारे यांनी शिवसेनेत प्रवेश करताना ठाणे इथं जोरदार शक्तिप्रदर्शन केलं.

Pradeep Pendhare

Ahilyanagar political news : श्रीरामपूरचे माजी आमदार भानुदास मुरकुटे आणि माजी उपनगराध्यक्ष संजय छल्लारे यांनी ठाणं इथं जोरदार शक्तिप्रदर्शन करत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थित शिवसेनेत प्रवेश केला. याचवेळी मंत्री शंभूराज देसाई अहिल्यानगर इथं एकनाथ शिंदेंबरोबर सुरूवातीपासून बरोबर असलेल्या जुन्या शिवसैनिकांच्या उपस्थित शिवसेनेचा मेळावा घेत होते. या मेळाव्यात देखील अहिल्यानगर शहर, श्रीगोंदा आणि पाथर्डीमधील काहीचे पक्ष प्रवेश झाले.

मुरकुटे अन् छल्लारे यांचा हा पक्ष प्रवेश अहिल्यानगरमध्ये देखील झाला असता. पण, तो टाळून दोघांनी शिंदेकडे जाण पसंद केलं. मुरकुटे अन् छल्लारे यांनी, असा का निर्णय घेतला. त्यांच्याबरोबर असलेले माजी खासदार सदाशिव लोखंडे, माजी आमदार भाऊसाहेब कांबळे आणि इतर पदाधिकाऱ्यांनी अहिल्यानगरचा मेळावा का टाळला? अशी चर्चा सुरू असतानाच, शिवसेनेतील ही गटबाजी असल्याचे विश्लेषण राजकीय विश्लेषकांनी केलं आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीमधील सर्वच पक्षांनी जोरदार तयारीला सुरूवात केली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिवसेनेत सर्वात जास्त इनकमिंग सुरू झालं आहे. पण त्याचबरोबर शिवसेनेतील अंतर्गत गटबाजी देखील यानिमित्तानं समोर येऊ लागली आहे. श्रीरामपूरचे माजी आमदार भानुदास मुरकुटे आणि संजय छल्लारे यांनी अहिल्यानगरमधील शिवसेनेचा मेळावा सोडून ठाण्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थित केलेल्या पक्ष प्रवेशामुळे त्या चर्चेला अधिक बळ मिळाले.

काँग्रेस (आय)मधून प्रथम आमदार झालेले व त्यानंतर जनता दल, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (NCP), शिवसेना, बीआरएस, लोकसेवा विकास आघाडी, असा आपला राजकीय प्रवास करणारे माजी आमदार भानुदास मुरकुटे व त्यांचे नातू नीरज आणि समर्थकांसोबतच उद्धव ठाकरेंची मशाल खाली ठेवत माजी उपनगराध्यक्ष संजय छल्लारे यांनीही पुन्हा 'धनुष्यबाण' हाती घेतला. या पक्षप्रवेशांमुळे स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी शिंदे सेनेला बळ मिळाले आहे.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यपद्धतीवर विश्वास ठेऊन आणि त्यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत राहण्याचा संकल्प करत माजी आमदार मुरकुटे आणि त्यांचे नातू अशोक सहकारी साखर कारखान्याचे संचालक नीरज मुरकुटे यांनी 650 समर्थकांसह, तसेच माजी उपनगराध्यक्ष संजय छल्लारे यांनीही आपल्या 75 समर्थकांसह एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. ठाणे इथल्या आनंद आश्रम इथं हा पक्षप्रवेश झाला. यावेळी माजी खासदार सदाशिव लोखंडे, माजी आमदार भाऊसाहेब कांबळे, राजेंद्र देवकर उपस्थित होते.

एकनाथ शिंदे यांनी शिवसेना ही बाळासाहेब ठाकरे यांनी उभारलेली चळवळ आहे. मुरकुटे समर्थकांचा प्रवेश म्हणजे पक्षाच्या विचारधारेत रुजलेल्या निष्ठावान नेतृत्वाची भर आहे. यामुळे पक्षाचे बळ श्रीरामपूर तालुक्यात अधिक घट्ट होईल, असा विश्वास व्यक्त केला.

मुरकुटे-छल्लारेंचे शक्तिप्रदर्शन

आगामी होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका समोर ठेवत, माजी आमदार भानुदास मुरकुटे यांनी प्रवेशासाठी जोरदार शक्तिप्रदर्शन केले. यासाठी 11 बस, 57 चारचाकी वाहनांमधून 650 समर्थक सोबत नेले होते. तसेच छल्लारे यांनीही 15 ते 20 वाहनांमधून 75 समर्थकांना आपल्यासमवेत नेले होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT