Ahilyanagar BJP Internal Politics : श्रीरामपूर बाजार समितीत पालकमंत्री राधाकृष्ण विखे गटाच्या समर्थक संचालकांनी एकाचवेळी राजीनामे दिल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. विखे गटाचे सात, मुरकुटे व ससाणे गटाचा प्रत्येकी एक, अशा एकूण नऊ संचालकांनी आपल्या संचालक पदाचे राजीनामे जिल्हा उपनिबंधक गणेश पुरी यांच्याकडे दिले.
बाजार समितीचा कारभार चांगला चालत नसल्याचे ठपका ठेवत हे राजीनामे देण्यात आले आहेत. यामुळे संचालक मंडळ अल्पमतात आले असून लवकरच प्रशासकांची नियुक्ती होईल, असे भाकित वर्तविले जात आहे.
सभापती निवडणुकीत विखे गटातील (Radhakrishna Vikhe) संचालक जितेंद्र गदिया यांच्याविरोधात करण्यात आलेल्या तक्रारीनंतर उपनिबंधकांनी त्यांना अपात्र ठरवले. त्यानंतर काल ससाणे गटाचे खंडेराव ढोकचौळे व मुरकुटे गटाचे किशोर बनसोडे यांनी विखे गटात प्रवेश केल्यामुळे अभिषेक खंडागळे, नानासाहेब पवार, गिरीधर आसने, सरला बडाख, सुनिल शिंदे, किशोर कालगंडे, दीपक हिवराळे या नऊ संचालकांनी मंत्री विखे व डॉ.सुजय विखे यांच्या सल्ल्यानुसार आपल्या संचालक पदाचे राजीनामे जिल्हा उपनिबंधकांकडे दिले.
संचालकांना नगरला नेण्याची जबाबदारी सुजय विखे यांनी भाजपचे (BJP) माजी तालुकाध्यक्ष दीपक पटारे, माजी जिल्हा परिषद सदस्य शरद नवले यांच्यावर सोपविली होती. या सर्व घडामोडीमागे सुजय विखे यांचा मास्टरस्ट्रोक असून बाजार समितीत विखे पॅटर्न सुरू झाल्याची चर्चा समाज माध्यमांवर रंगली आहे.
बाजार समितीत आता ससाणे गटाकडे केवळ आठ संचालक आहेत. त्यामुळे सत्ताधारी गट अल्पमतात आला आहे. सध्याच्या सत्ताधारी गटाचे बाजार समितीत मनमानी कारभार असून शेतकऱ्यांवर अन्याय होत आहे. तसेच बेकायदेशीर कामांमुळे आम्ही राजीनामे दिले असल्याची माहिती विखे गटाच्या संचालकांनी दिली. तसेच बाजार समितीवर आता प्रशासकाची नियुक्ती करावी, अशीही मागणी केली आहे.
निवडणूक काळात विखे, ससाणे व मुरकुटे युती होती. ससाणे गटाला सात, विखे गटाला सात व मुरकुटे गटाचे चार संचालक निवडून आले होते. मात्र, युतीत झालेल्या वाटाघाटीप्रमाणे कार्यवाही होत नसल्याने ऐनवेळी ससाणे-मुरकुटे यांनी विखे यांच्या विरोधात दंड थोपटले होते.
त्यामुळे सुजय विखे यांच्या उपस्थितीत विखे गटाच्या सभापतीपदासाठी प्रयत्न सुरू असताना अचानक कलाटणी मिळत सत्ताधारी ससाणे-मुरकुटे युतीच्या पाठबळावर सभापती निवडण्यात आले. आता विखे गटाने जोरदार मुसंडी मारत बाजार समितीतील सत्ताबदलाची प्रक्रिया सुरू केली आहे.
बाजार समिती सभापती सुधीर नवले यांनी संचालकांच्या राजीनाम्यावर नियमांकडे बोट दाखवले आहे. "संचालकांना राजीनामे द्यायचे झाल्यास ते सभापती अथवा सचिवांकडे द्यायचे असतात. बैठक घेऊन ते मंजूर करण्याचे अधिकार सभापतींना असतो. दोन तृतीयांश सदस्यांनी राजीनामे दिलेले नाही, आजही आठ सदस्य संख्याबळ आमच्याकडे आहे.
त्यामुळे ज्या संचालकांनी राजीनामे दिले, त्याठिकाणी निवडणूक घ्यायची की नाही हे अधिकार सभापती व सचिवांना आहेत. मात्र, सहाय्यक निबंधक राजकीय दबावापोटी काहीही चुकीचे निर्णय घेत आहेत. मागील दोन वर्षांपासून चुकीचे निर्णय घेतले म्हणून न्यायालयाने त्यांना तंबी दिली. आता उपनिबंधक हे आमच्या हक्कावर गदा आणत आहेत", असा आरोप सुधीर नवले यांनी केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.