Shrirampur political complaint : भाजपचे अहिल्यानगरमधील पालकमंत्री राधाकृष्ण विख पाटील आणि श्रीरामपूरमधील स्थानिक नेते प्रकाश चित्ते यांच्यातील राजकीय संघर्ष उफाळला. विधानसभा निवडणुकीत या संघर्षाला दोन्ही बाजूनं धार चढली होती. पण प्रकाश चित्ते यांना भाजपच्या ओबीसी मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्षपदावरून दूर व्हावं लागलं. पुढं जात दोघांमध्ये अनेक राजकीय गुंता वाढला.
यातून आता प्रकाश चित्ते यांनी पक्षाच्या राज्यातील प्रमुख नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री गिरीश महाजन यांच्या संपर्कात राहून स्थानिक राजकारणाला बळ मिळवण्याचा प्रयत्नात यशस्वी होताना दिसत आहे. यामुळे भाजप मंत्री विखे पाटील आगामी काळात येऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये नेमका कोणता 'राजकीय डाव' टाकतात, याकडं लक्ष लागलं आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रकाश चित्ते श्रीरामपूरमध्ये (Shrirampur) सक्रिय झाले आहेत. भाजपमध्ये नसले, तरी ते पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या संपर्कात आहेत. प्रकाश चित्ते आणि त्यांच्या समर्थकांना नुकताच, मुंबईत भाजपमध्ये 'संकटमोचक' म्हणून परिचित असलेले मंत्री गिरीश महाजन यांची भेट घेतली. ही भेट चर्चेत आली आहे, ती प्रकाश चित्ते यांचे राजकीय पुनर्वसन होणार का? या प्रश्नाने!
प्रकाश चित्ते आणि त्यांच्या समर्थकांनी मुंबईत 'सेवासदन' बंगल्यावर मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांची भेट घेतली. गेल्या काही दिवसांपासून पक्षातील निष्ठावान पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्यावरील बाहेरच्यांनी केलेल्या अतिक्रमणांची, अन्यायाची माहिती दिली. मंत्री महाजन यांच्याकडून शब्द घेऊन आल्याचा दावा प्रकाश चित्ते यांनी केल्याने भाजपच्या अहिल्यानगरमधील निष्ठावान कार्यकर्त्यांना चांगले दिवस येणार, अशा आशा पल्लवीत झाल्या आहेत.
चित्ते यांनी या भेटीविषयी सांगितले की, “शिर्डी संस्थान विश्वस्तपदापासून जिल्हाध्यक्षपद आणि नियोजन मंडळाच्या सदस्यपदापर्यंत आमच्यावर अन्यायच होत आला आहे. पक्षाच्या विरोधात उमेदवारी करणाऱ्यांवर कारवाई झाली नाही. पण आम्ही पक्षनिष्ठ राहूनही श्रीरामपुरात केवळ मंत्री विखे पाटलांच्या सांगण्यावरून आमच्यावर कारवाई करण्यात आली.”
याच पार्श्वभूमीवर, अलीकडेच काँग्रेसमधील दहा नगरसेवकांना भाजपमध्ये घेत त्यांना नगराध्यक्षपदाचा शब्द देण्यात आल्याने स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये असंतोष वाढला आहे. हा निर्णय ‘विखे पाटील गटाने वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी आखलेला राजकीय डाव’ आहे, अशी आपण भाजप श्रेष्ठींकडे कैफियत मांडल्याचंही प्रकाश चित्ते यांनी सांगितलं.
स्थानिक कार्यकर्त्यांची भावना थेट महाजन यांच्यापर्यंत पोहोचवताना, “श्रीरामपूरातील भाजप कार्यकर्ते कुणाच्याही दबावाखाली राहणार नाहीत. आम्ही कुठल्याही परिस्थितीत नगराध्यक्षपदाची निवडणूक लढवणारच,” असा ठामपणे सांगितल्याचा दावा करताना, गिरीश महाजन यांनी देखील “काळजी करू नका, सर्व ठीक होईल,” असे आश्वासन दिल्याचे प्रकाश चित्ते यांनी सांगितले.
प्रकाश चित्ते यांनी थेट पक्षश्रेष्ठींशी साधलेल्या संपर्कावर राजकीय निरीक्षकांनी मत मांडताना, मंत्री विखे पाटील गट जिल्हास्तरावर प्रभावशाली असला तरी, चित्ते यांचा श्रीरामपूर शहरातील जनसंपर्काचं नेटवर्क मोठं आहे. संघटन हे त्यांचं बलस्थान आहे. त्यामुळे येणाऱ्या नगराध्यक्ष निवडणुकीत दोन्ही गटांतील संघर्ष तीव्र होण्याची शक्यता आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.