Vijay Aoty  Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Nagar News: भाजप उमेदवाराला पाठिंबा देणे भोवलं, माजी आमदार विजय औटींचे निलंबन

Vijay Aoty Suspended : शिवसेनेचे माजी आमदार विजय औटी यांनी महायुती भाजपचे उमेदवार खासदार डॉ. सुजय विखे यांना पाठिंबा जाहीर केल्याने महाविकास आघाडीमध्ये खळबळ उडाली आहे.

Pradeep Pendhare

Nagar Political News: शिवसेना (Shivsena) उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी आमदार विजय औटी यांना महायुतीच्या भाजप (BJP) उमेदवाराला पाठिंबा दिल्याचे चांगलेच भोवले आहे. वरिष्ठांच्या आदेशानुसार त्यांच्यावर जिल्हाप्रमुखांनी निलंबनाची कारवाई केली आहे.

विजय औटी यांच्या या भूमिकेविषयी स्थानिक शिवसैनिकांनी देखील मोठी नाराजी व्यक्त करत आक्रमक भूमिका मांडली. पारनेरच्या शिवसेना पदाधिकाऱ्यांनी नगर शहरामध्ये पत्रकार परिषद घेऊन विजय औटी आणि त्यांच्या निर्णयाला एकटे पाडले. पारनेरमधील हा डॅमेज रोखताना महाविकास आघाडीतील पदाधिकाऱ्यांची चांगलीच धावपळ झाली.

पारनेरमधील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी आमदार विजय औटी लोकसभा निवडणुकीत कोणती भूमिका घेतात याकडे लक्ष लागले होते. यानुसार त्यांनी शिवसेना कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला. मेळाव्यात कार्यकर्त्यांनी उद्धव ठाकरे यांच्याबरोबर राहण्याची भूमिका मांडली.

मेळाव्यानंतर विजय औटी यांनी निवडक पाच पदाधिकाऱ्यांशी पुन्हा चर्चा केली. या चर्चेनंतर विजय औटी यांनी महायुती भाजपचे उमेदवार खासदार डॉ. सुजय विखे यांना पाठिंबा जाहीर केला. विजय औटी यांनी घेतलेल्या या भूमिकेनंतर महाविकास आघाडीमध्ये खळबळ उडाली.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार माजी आमदार नीलेश लंके पारनेरमधील स्थानिक असल्याने आणि यातच शिवसेनेचे माजी आमदार विजय औटींनी हा निर्णय घेतल्याने मोठी खळबळ उडाली. या डॅमेजची मुंबई शिवसेना भवनावर देखील दखल घेतली गेली.

माजी आमदार विजय औटी यांच्या या भूमिकेनंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पारनेर तालुकाप्रमुख डॉ. श्रीकांत पठारे, आघाडी प्रमुख प्रियंका खिलारी, युवासेना प्रमुख अनिल शेटे, नगर दक्षिण जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे, संदेश कार्ले यांनी नगरमध्ये पत्रकार परिषद घेतली.

विजय औटी यांचा हा निर्णय शिवसेना पदाधिकारी यांना मान्य नसल्याचे सांगितले. शिवसेना पदाधिकारी उद्धव ठाकरे यांचा निर्णय मान्य करतील. महाविकास आघाडी बरोबर कायम राहतील, असे सांगितले. भाजपने उद्धव ठाकरे यांना त्रास दिला आहे. शिवसेना पक्ष फोडला आहे.

त्यामुळे आम्ही भाजपबरोबर जाणे शक्य नाही. दोन दिवसापूर्वी आम्ही भाजपविरोधात भांडाफोड आंदोलन केले आणि त्याच पक्षाच्या उमेदवारासाठी आम्ही मते कशी मागणार, असा प्रश्न डॉ. श्रीकांत पठारे यांनी उपस्थित केला.

महाविकास आघाडीने, असा रोखला डॅमेज

माजी आमदार विजय औटी यांनी महायुती भाजपचे उमेदवार यांना पाठिंबा दिल्यानंतर महाविकास आघाडीमध्ये खळबळ उडाली. उमेदवार माजी आमदार नीलेश लंके, माजी आमदार दादा कळमकर, शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, उद्धव ठाकरे गटाचे नगर दक्षिणप्रमुख प्रा. शशिकांत गाडे, शिवसेनेचे संदेश कार्ले यांनी तातडीने पारनेरमधील शिवसेना पदाधिकाऱ्यांशी संपर्क केला.

त्यांची भूमिका जाणून घेतली. यानंतर या पदाधिकाऱ्यांना नगरमध्ये बोलावून घेतल बैठक घेतली. यात बैठकीत पारनेर तालु्क्यातील आगामी काळातील राजकीय सूत्र ठरले. माजी आमदार नीलेश लंके यांनी देखील यावर सहमती दर्शवत हमी दिली. यानंतर शिवसेना पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेत माजी आमदार विजय औटी आणि त्यांचा निर्णय एकटा पाडला.

विजय औटी यांचे पक्षातून निलंबन

नगर दक्षिण जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे यांनी वरिष्ठांच्या आदेशानुसार माजी आमदार विजय औटी यांना पक्षातून निलंबन केले आहे. तसे पत्र काढले आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष हा महाविकास आघाडीत सहभागी आहे.

महाविकास आघाडीकडून नगर दक्षिणमध्ये माजी आमदार नीलेश लंके यांना अधिकृत उमेदवारी दिली आहे. परंतु माजी आमदार विजय औटी यांनी काल महायुती भाजपचे उमेदवार खासदार डॉ. सजुय विखे यांना पाठिंबा दिल्याची भूमिका घेतल्याने त्यांना पक्षातून निलंबन करण्यात आले आहे, असे शशिकांत गाडे यांनी पत्रात म्हटले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

लंके आणि औटींमधील राजकीय इतिहास काय

माजी आमदार विजय औटी यांचे नीलेश लंके एकेकाळी सहकारी होते. दोघेही शिवसेनेमध्ये होते. या दोघांमध्ये विधानसभा 2019 मध्ये संघर्ष निर्माण झाला. नीलेश लंके यांनी विजय औटी यांना आव्हान दिले. नीलेश लंके यांनी विजय औटी यांच्याविरोधात राष्ट्रवादीकडून उमेदवारी घेतली. विधानसभा 2019 मध्ये लंकेंनी औटींचा पराभव केला. यानंतर महाविकास आघाडीचे सरकार राज्यात आले. लंके आणि औटी यांच्यातील संघर्ष कमी करण्यात महाविकास आघाडीतील नेत्यांना यश आले.

स्थानिक पातळीवरच्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये लंके आणि औटी दोन्ही गट एकत्र आले. महाविकास आघाडी सरकार गेल्यानंतर राज्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्ष फुटली. यातच लोकसभा निवडणुका जाहीर झाल्या. महाविकास आघाडीकडून माजी आमदार नीलेश लंके लोकसभेच्या निवडणुकीच्या रिंगणात आले.

यामधल्या काळात माजी आमदार विजय औटी सक्रिय नव्हते. परंतु लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात आणि भाजपचे स्टार प्रचारक मंत्री राधाकृष्ण विखे यांनी स्वतंत्र भेट घेत विजय औटी यांच्याशी चर्चा केली. यामुळे विजय औटी या निवडणुकीत काय निर्णय घेतात याकडे लक्ष लागले होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT