Ahmednagar News : बोगस मतदानामुळे काय होऊ शकते, हे सर्वच राजकारण्यांना माहीत आहे. त्यामुळे मतदार याद्या प्रसिद्ध होताच, राजकीय नेते त्याचा चांगला अभ्यास करतात. अहमदनगर जिल्ह्यातील मतदार याद्या जाहीर झाल्या आहेत.
नगर शहर विधानसभा मतदार संघात दुबार मतदारांवर नोंदणीवर हरकत महाविकास आघाडीने हरकत घेतली आहे. पण यावर कार्यवाही करण्याऐवजी जिल्हा निवडणूक शाखेनं मतदारांना नोटीसा पाठवल्या आहेत. यावर 'मविआ'चे पदाधिकारी चांगचेल आक्रमक झाले असून, प्रांताधिकारी आणि तहसीलदारांवर कारवाईची मागणी केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (NCP) शरदचंद्र पवार पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष अभिषेक कळमकर, काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे, शिवसेना शहरप्रमुख संभाजी कदम यांच्यासह विक्रम राठोड, किशोर कोतकर, बाळासाहेब बोराटे, संजय झिंजे उपस्थित होते. 'मविआ'ने पत्रकार परिषद घेत प्रशासनावर शरसंधान साधले. जिल्हा निवडणूक शाखेनं नमुना 14 अंतर्गत नियम 19 (1) (ब) अन्वये मतदारांनाच नोटीसा बजावल्या असून 10 सप्टेंबरला आवश्यक त्या कागदपत्रांसह हजर राहण्याचे फर्मान काढले आहे.
या नोटीसांनुसार उपस्थित न राहिल्यास मतदारांना आपले काही एक म्हणणे मांडायचे नाही, असे समजून मतदार नोंदणी नियम 1960 मधील तरतुदीनुसार नियमोचित कार्यवाही करण्यात येईल, असे म्हटले आहे. नियमाचा बडगा दाखवून पुन्हा एकदा संगनमत करत जी खरी मतदारांची नावे आहेत, ती सुद्धा वगळण्याचे षडयंत्र रचले जात असल्याचा आरोप 'मविआ'ने केला. कोणत्याही खऱ्या मतदाराचे नाव प्रशासनाने वगळल्यास नगर शहरामध्ये मोठे जनआंदोलन छेडण्याचा इशारा 'मविआ'तर्फे काँग्रेसचे (Congress) शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी दिला.
संगनमत करत ज्या प्रशासनातील लोकांनी राजकीय नेत्यांच्या दबावातून मतदारांची फसवणूक करून त्यांच्या नावाचा गैरवापर करत दुबार नोंदणी केली आहे, त्यांना नोटीसा बजवायला हव्या होत्या. यामध्ये वरिष्ठ अधिकारी म्हणून प्रांताधिकारी आणि तहसीलदार यांच्यावर प्रमुख जबाबदारी आहे. आम्ही जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी यांच्याकडे याबाबत लेखी तक्रार केली आहे. सर्वसामान्य मतदारांना नोटीसा बजावण्या ऐवजी प्रांताधिकारी, तहसीलदार यांना त्यांच्या गलथान कारभाराबद्दल नोटीसा बजवायला हव्या होत्या. मतदारांना नोटीसा म्हणजे 'चोर सोडून संन्याशाला फाशी' असे म्हणण्याची दुर्दैवी वेळ आल्याचे 'मविआ' नेते यांनी म्हटले.
खासदार नीलेश लंके यांच्यासह तिन्ही पक्षांनी निवडणूक प्रशासनाकडे लेखी हरकत घेतल्यानंतर झोपी गेलेले प्रशासन खडबडून जागे झाले. नगर शहरातील राजकीय नेत्यांशी संगनमत करत केलेल्या बोगस मतदार नोंदणीच्या स्कॅमचा भांडाफोड 'मविआ'ने केला. आता प्रशासनाच्या मतदारांना नोटीसा म्हणजे, मतदारांमध्ये गोंधळ निर्माण करण्याचे कुटील षडयंत्र असल्याचा आरोप नगर शहर 'मविआ'च्या नेत्यांनी केला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.