Ahmednagar News : केंद्रीय मंत्री रक्षा खडसे दोन दिवस अहमदनगरच्या जिल्हा दौऱ्यावर होत्या. संवाद कार्यक्रमातून त्यांनी भाजप कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांच्याशी संवाद साधला.
विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने त्यांनी इच्छुकांची चाचपणी केली. इच्छुकांची मते जाणून घेतली. भाजपकडून इच्छुक असलेल्यांमध्ये चुरस वाढवून देत, त्यांच्यात तिकिटासाठी रेस देखील लावून दिली.
राहुरी विधानसभा मतदारसंघात अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष माजी आमदार शिवाजी कर्डिले (Shivaji Kardile) इच्छुकांमध्ये सर्वात पुढे आहेत. परंतु भाजपचे निष्ठावान नेते माजी आमदार चंद्रशेखर कदम यांचे चिरंजीव माजी नगराध्यक्ष सत्यजित कदम यांनी देखील राहुरीतून शड्डू ठोकला आहे. यात माजी खासदार सुजय विखे यांनी देखील विधानसभा निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. यासाठी त्यांनी संगमनेर आणि राहुरी विधानसभा मतदारसंघाची नावे सुचवली आहेत. परंतु तिकीट कोणाला मिळणार याची उत्सुकता आहे. यातच मंत्री रक्षा खडसे दोन दिवस अहमदनगर दौऱ्यावर होत्या. त्यांनी राहुरी विधानसभा मतदारसंघातील राजकीय परिस्थिती पाहता, तिकिटासाठी कर्डिले आणि कदम यांच्यात रेस लावून दिली.
राहुरी विधानसभा निवडणुकीसाठी शिवाजी कर्डिले आणि सत्यजित कदम दोघेही इच्छुक आहेत. माझ्या दोघांना शुभेच्छा आहेत. शेवटी तिकीटाबाबतचा निर्णय वरीष्ठ पातळीवर होईल. परंतु राहुरीचा आमदार भाजप (BJP) पक्षाचा व्हावा, या अनुषंगाने सर्वांनी काम करावीत, अशा सूचना मंत्री खडसे यांनी दिल्या.
रक्षा खडसे यांनी आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने नगर जिल्ह्यात दोन दिवस भेटी देऊन संवाद साधला. भाजपची संघटनात्मक दृष्ट्या चांगली तयारी दिसली. मात्र हे जरी असले, तरी लोकसभा निवडणुकीत पराभव पत्करावा लागला. त्यामागची कारणे शोधून येणाऱ्या निवडणुकीत पुनरावृत्ती होणार नाही, याची काळजी घ्यावी लागणार आहे, असे सांगितले.
तसंच नगर जिल्ह्यात राज्य सरकार आणि भाजप नेते मंत्री राधाकृष्ण विखे यांच्या माध्यमातून चांगल्या प्रकारची कामे झालेली आहेत. अनेक योजना राबविल्या गेल्या असून कार्यकर्त्यांनी मनावर घेऊन लोकांपर्यंत प्रचार आणि प्रसार करण्यासाठी पोचले पाहिजे. राहुरी विधानसभा उमेदवारीबाबत कर्डिले-कदमांसह अनेक इच्छुक आहेत. परंतु उमेदवारीबाबत कोअर कमिटी निर्णय घेईल. इच्छुकांनी व्यक्त केलेली इच्छा आम्ही वरिष्ठ पातळीवर पोचवू, असे रक्षा खडसे यांनी सांगितले.
राहुरी विधानसभा मतदारसंघात माजी आमदार शिवाजी कर्डिले आणि सत्यजित कदम यांच्यात, अशाच पद्धतीने रेस लावून देत दोघांना तिकिटासाठी शुभेच्छा दिल्या. रक्षा खडसेंच्या या राजकीय समज पाहून भाजप नेत्यांच्या भुवया उंचवल्या असल्या, तरी ती भावली, अशी चर्चा आहे. पक्षातंर्गत स्पर्धा वाढवल्यास पदाधिकारी आणि कार्यकर्ते अधिक काम, कष्ट करतात, अशी रक्षा खडसेंची ही भूमिका असल्याचे कौतुक होत आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.