Najiabano Patahan with womens on Water Tank.
Najiabano Patahan with womens on Water Tank. Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

`एमआयएम`च्या नाजियाबानो यांचे पाण्यासाठी महिलांसह `आज के शोले` आंदोलन!

Sampat Devgire

धुळे : महापालिकेत (Dhule) भाजपची (BJP) सत्ता आहे. त्यांच्या नगरसेवकांची संख्या मोठी असल्याने विरोधकांची ताकद नगण्य आहे. मात्र शहरातील पाणीप्रश्‍नावर हे विरोधी पक्ष सध्या आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. एमआयएमच्या (AIMIM) नगरसेविका नजियाबानो पठाण (Najiabano Pathan) केने प्रभागातील महिलांसोबत थेट जलकुंभावर चढून शोले स्टाइल आंदोलन करून मनपा सत्ताधारी, प्रशासनाच्याविरोधात घोषणाबाजी करीत भाजपला थेट आव्हाण दिले. (AIMIM Najiyabano Pathan agitate for Drinking water tank in Dhule)

धुळे शहरात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अत्यंत बिकट झाला आहे. रोज शहरात नागरिक आंदोलन करीत आहेत. दोन दिवसांपूर्वी शिवसेनेने आंदोलन केल्यानंतर शुक्रवारी एमआयएमच्या नगरसेविकेने प्रभागातील महिलांसोबत थेट जलकुंभावर चढून शोले स्टाइल आंदोलन केले. त्यांनी सत्ताधारी भाजप व प्रशासनाला थेट अल्टिमेटम दिला.

शहरातील पाण्याची ही समस्या सोडविली नाही तर यापेक्षा मोठे आंदोलन करू असा इशारा नगरसेविका नाजियाबानो पठाण यांनी दिला. दरम्यान, दुसरीकडे पाणीप्रश्‍नी महापौरांनी शिवसेनेला उत्तर दिल्यानंतर शिवसेनेने पुन्हा महापौरांवर पलटवार केला आहे.

नगरसेविका श्रीमती पठाण म्हणाल्या, संपूर्ण शहरात पाण्याची मोठी समस्या आहे. तीव्र उन्हाळा असताना नागरिकांना १५-१५, २०-२० दिवस पाणी मिळत नाही. त्यामुळे आम्ही झोपलेल्या महापालिका यंत्रणेला जागे करण्यासाठी जलकुंभावर चढून आंदोलन केले. उन्हात महिलांना हंडे घेऊन पाण्यासाठी इकडे-तिकडे भटकावे लागते. आम्ही वारंवार या समस्येबाबत महापालिकेकडे तक्रारी केल्या. स्थायी समिती सभेतही मी वारंवार समस्या मांडते. मात्र सभापती, सत्ताधारी, प्रशासन केवळ होकार भरतात. अंमलबजावणी मात्र होत नाही. महापालिका प्रशासनाने पाण्याची ही समस्या सोडविली नाही तर यापेक्षा मोठे आंदोलन करू व त्यास मनपा प्रशासन जबाबदार राहील असा इशाराही श्रीमती पठाण यांनी दिला.

दरम्यान, पाण्याच्या या प्रश्नावरून देवपूर भागातील प्रभाग क्रमांक- ३ च्या एमआयएमच्या नगरसेविका तथा स्थायी समिती सदस्या नाजियाबानो पठाण यांनी प्रभागातील महिलांसह देवपूर भागातील नवरंग जलकुंभावर चढून शोले स्टाइल आंदोलन केले. भर दुपारी श्रीमती पठाण व महिलांनी जलकुंभावर चढून महापालिका सत्ताधारी, प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी केली.

तीव्र उन्हाळा असताना शहरातील पाणीपुरवठ्याचे नियोजन कोलमडल्याने शहरातील विविध भागांमध्ये नागरिकांना पाणी मिळत नसल्याने दोन दिवसांपूर्वीच शिवसेनेने कावड यात्रा आंदोलन करून महापालिकेत आयुक्तांना घेराव घातला. शिवाय काही भागातील नागरिकांनीही पाणीप्रश्‍नी आंदोलन केले. दरम्यान, शिवसेनेच्या आंदोलनकर्त्यांना आयुक्त देविदास टेकाळे यांनी पाच दिवसाआड पाणीपुरवठ्याचे लेखी आश्‍वासन दिले.

---

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT