Ajit Pawar candidate Car attack Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Nashik Election : अजितदादांच्या उमेदवाराची कार फोडली, मतदानाच्या आदल्यादिवशी नाशिकमध्ये राडा.. आज पोलिसांचा कडक बंदोबस्त

Candidate Car Vandalised Nashik : काल मतदानाला अवघे काही तास शिल्लक असताना सातपूरमध्ये अजित पवार गटाचे उमेदवार यांच्या कारवर संशयितांनी दगडफेक केली. आज मतदानाच्या दिवशी मोठा पोलिस बदोबस्त तैनात आहे.

Ganesh Sonawane

Nashik Election Violence : कायद्याचा बालेकिल्ला असलेल्या नाशिक जिल्ह्यात महापालिका निवडणुक प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात काही ठिकाणी अनुचित प्रकार घडल्याचे पाहायला मिळाले. त्यापार्श्वभूमीवर पोलिस अलर्ट मोडवर आले असून आज मतदानाच्या दिवशी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. काही उमेदवारांसह शहरातील आमदारांना सुरक्षा पुरवण्यात आली आहे.

मतदानाच्या आदल्यादिवशी मतदानाला अवघे काही तास शिल्लक राहिले असताना सातपूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे अधिकृत उमेदवार विजय अहिरे यांच्या कारवर दगडफेक झाल्याची घटना बुधवारी (दि. १४) दुपारच्या सुमारास घडली. या प्रकरणी अहिरे यांच्या तक्रारीवरून संशयित दुचाकीस्वारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सातपूर विभागातील प्रभाग क्रंमाक ११ अ मधून विजय अहिरे हे राष्ट्रवादीच्या घड्याळ चिन्हावर निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहे. त्यांची कार (एमएच १४ जीएच ७५११) त्यांच्या महादेववाडीतील घराजवळ उभी केलेली होती. यावेळी हेल्मेट घालून आलेल्या दुचाकीस्वारांनी कारवर समोरील बाजूने दगड फेकून मारला आणि पळ काढला. यामुळे कारची काच फुटून नुकसान झाले.

दरम्यान कारवर दगड मारणारे दुचाकीस्वार नेमके कोण होते? याचा कुठलाही थांगपत्ता लागलेला नाही. याबाबत गुन्हा दाखल करून घेतला आहे. पोलिस संबधित संशयितांचा शोध घेत आहेत. आयुक्तालय हद्दीतून ५१९ सराईत गुन्हेगारांना तडीपार करण्यात आलेलं असतानाही नाशिकमध्ये असे प्रकार घडतच आहे. त्यामुळे आज मतदानाच्या दिवशी पोलिसांना अधिक खबरदारी घ्यावी लागणार आहे.

प्रभाग क्र. २४ मधील भाजपाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आलेल्या मंत्री गिरीश महाजन यांना देखील काही जणांकडून सभेनंतर अडवण्याचा प्रयत्न झाला होता. याप्रकरणी तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच प्रभाग क्रमांक ११ मध्ये सातपूर परिसरातील प्रबुद्ध नगर भागात आम आदमी पक्षाचे उमेदवार समाधान आहिरे यांना बंदूकीसारखी दिसणाऱ्या लायटरचा वापर करुन धमकवण्याचा प्रकार घडला. या दोन्ही घटनांमुळे परिसरात तणाव निर्माण झाला होता.

तसेच प्रभाग ५ मधील शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार कमलेश बोडके यांच्यासह सात ते आठ जणांवर अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. माझ्या विरोधात प्रचार करतो का..तुला गायब करुन टाकू..असे धमकावत एका बांधकाम ठेकेदाराला बळजबरी कारमध्ये मारहाण करत अपहरण करण्यात आल्याचा आरोप बोडके यांच्यासह त्यांच्या काही कार्यकर्त्यांवर करण्यात आला आहे. तसेच गुन्हाही दाखल झाला आहे.

नाशिकमधील मतदानापूर्वीच्या या घडामोडी पाहाता आज प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी शहरातील संवेदनशील आणि अतिसंवेदनशील मतदान केंद्रावर अतिरिक्त पोलिसबळ तैनात करण्यात आले आहे. या मतदान केंद्रावर वरिष्ठ अधिकारी स्वत:लक्ष ठेवून आहेत. कोणतीही अनुचित घटना वा हालचाल घडल्यास पाच ते सात मिनिटांत पोलिस घटनास्थळी येऊन कारवाई करतील अशी तजवीज करण्यात आली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT