Ajit Pawar Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Ajit Pawar Politics: सरकारवरचा विश्वास उडाला? बांधकाम कंत्राटदार सरकारला बजावणार कायदेशीर नोटीस!

Ajit Pawar; Contractors angry over delayed bills, threaten to take state government to court -राज्यातील बांधकाम कंत्राटदारांची ८९ हजार कोटींची बिले थकल्याने राज्यभरातील कंत्राटदारांत अस्वस्थता

Sampat Devgire

Financial crisis News: राज्य सरकार आर्थिक अडचणीत आले आहे. योजनावरील निधी शासनाने रोखून धरला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाला त्याचा सर्वात मोठा फटका बसला आहे. त्यामुळे आगामी काळात मोठे संकट उभे राहू शकते.

राज्यातील बांधकाम कंत्राटदार चांगलेच वैतागले आहेत. या संदर्भात राज्य शासनाला निर्वाणीचा इशारा देण्यात आला आहे. अर्थमंत्री अजित पवार यांनी आर्थिक स्थिती हाताबाहेर गेल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाला अवघे चार हजार कोटी रुपये निधी उपलब्ध केला आहे.

महाराष्ट्रातील विविध विकास कामांच्या निविदा प्रसिद्ध झाल्यानंतर कंत्राटदारांनी ती कामे पूर्ण केली आहेत. राज्यभरातील विविध कंत्राटदारांनी ८९ हजार कोटींची देयके बांधकाम विभागाला सादर केली आहेत. अनेक महिन्यांपासून ही देयके अदा करण्यात आलेली नाही. केवळ चार हजार कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करण्यात आल्याने मोठी समस्या निर्माण झाली आहे.

या संदर्भात महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघ व अभियंता संघटनेचे अधिवेशन ठाणे येथे झाले. या अधिवेशनात राज्यभरातील कंत्राटदारांच्या समस्यांचा पाढा वाचण्यात आला. शासनाच्या प्रोत्साहनामुळे कंत्राटदारांनी विकास कामे पूर्ण केली आहेत. मात्र आता त्यांची कोंडी करण्यात आली, असा संताप व्यक्त करण्यात आला.

संघटनेचे अध्यक्ष मिलिंद भोसले यांनी याबाबत राज्य शासनाला इशारा दिला आहे. गेले सहा महिने शासनाकडे पाठपुरावा सुरू आहे. मात्र काहीही प्रतिसाद मिळालेला नाही. त्यामुळे कंत्राटदार आर्थिक आणि व्यवसायिक संकटात आले आहेत. यावर लवकरात लवकर तोडगा न काढल्यास शासनाला कायदेशीर नोटीस बजावण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला.

राज्य शासनाकडे विकासकामे करण्यासाठी प्राधान्यक्रम असायला हवा. जी कामे पूर्ण झाली आहेत त्यांची देयके तातडीने अदा केली जावीत. शासनाकडे पैसा नसल्यास केंद्र शासनाकडून तत्पुरते कर्ज घेता येऊ शकते. केंद्र शासन देखील राज्य शासनाला खेळवत आहे. त्यामुळे सध्याची बिकट स्थिती निर्माण झाली आहे.

सार्वजनिक बांधकाम विभागाकडून विकास कामे पूर्ण करण्यासाठी कंत्राटदारांना प्रोत्साहन आणि पाठपुरावा झाला होता. आता मात्र कंत्राटदार संकटात सापडल्यावर कोणीही मदतीला येत नाही. राज्यात अत्यंत गंभीर स्थिती निर्माण झाली आहे. कंत्राटदारांची बिले अदा न केल्यास राज्यातील विकास कामे रोखून धरण्यात येतील असा इशाराही यावेळी देण्यात आला.

सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच संबंधित अनेक विभागांच्या विकास कामांवर या सगळ्या परिस्थितीचा मोठा परिणाम होऊ लागला आहे. अनेक कंत्राटदार अडचणीत आले असून त्याचा आमदार निधीच्या कामांवर विपरीत परिणाम झाला आहे. त्यामुळे सत्ताधारी पक्षाचे आमदार आणि मंत्र्यांनीही त्याची चांगलीच धास्ती घेतली आहे.

-------

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT