Nilesh Lanke & Uddhav Thackeray Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Nilesh Lanke & Uddhav Thackeray : अजित पवार गटाच्या आमदार लंकेंनी दिलेला शब्द पाळला, ठाकरेंना दिले खास 'बर्थ डे' गिफ्ट !

सरकारनामा ब्यूरो

राजेंद्र त्रिमुखे -

Ahmednagar : शिवसेने (उध्दव बाळासाहेब ठाकरे) चे प्रमुख उद्धव ठाकरे यांचा गुरुवारी वाढदिवस. आणि आजच पारनेर नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्षपदाची निवडणूक असताना आणि दिलेला शब्द पाळणारा आमदार अशी ओळख असलेले आमदार निलेश लंके यांनी उध्दव ठाकरेंना त्यांच्या वाढदिवसानिमित्त खास 'बर्थ डे' गिफ्ट दिले. त्यांनी ठाकरे गटाला दिलेला शब्द पाळत जायदा शेख यांची 'उपनगराध्यक्ष'पदावर शिक्कामोर्तब करून बिनविरोध विजयी केले.

आमदार निलेश लंके(Nilesh Lanke) हे मूळचे कट्टर शिवसैनिक आहेत. आजही त्यांच्या हातात उद्धव ठाकरे यांनी स्वतः बांधलेले शिवबंधन आहे. आणि त्याचा ते अनेकदा अभिमानाने उल्लेखही करतात. 2019 मध्ये राष्ट्रवादी कडून मोठ्या मताधिक्याने त्यांनी शिवसेनेचे तीनदा आमदार राहिलेले आणि तत्कालीन विधानसभेचे उपसभापती असलेले विजय औटी यांचा पराभव केला.

मात्र, 2019 विधानसभेचे निकाल स्पष्ट झाले आणि राज्यात महाविकास आघाडीचे उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) यांचे सरकार आले. दरम्यान, झालेल्या पारनेर नगरपंचायत निवडणुकीत महाविकास आघाडी धर्म पाळत पंचायत समितीत राष्ट्रवादी आणि शिवसेनेची सत्ता आली. सत्तेदरम्यान उपनगराध्यक्षपद शिवसेनेला देण्याचा शब्द आमदार लंके यांनी माजी आमदार आणि ठाकरे सेनेचे ज्येष्ठ नेते विजय औटी यांना दिला होता.

राष्ट्रवादीत नुकताच अजित पवारां(Ajit Pawar)नी भूकंप घडवला. यात आमदार लंके हे अजितदादांच्या सोबत गेल्याने राज्यात राजकीय गणिते बदलली. तत्पूर्वी काही सेनेचे नगरसेवक शिंदे यांच्या शिवसेनेत गेले होते. या बदलाचे परिणाम पारनेरच्या नगरपंचायत निवडणुकी पडतील अशी अपेक्षा होती.

मात्र, लंके यांनी विजय औटी यांना दिलेला शब्द पाळत उपनगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवार असलेल्या जायदा शेख यांनाच पाठिंबा असल्याचा निर्णय घेतला. दरम्यान, विरोधकांकडून उमेदवारी अर्जच न आल्याने जायदा शेख या राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर बिनविरोध निवडून आल्या.

नगरसेवक पुन्हा लोणावळयात

आमदार निलेश लंके हे विधीमंडळाच्या अधिवेशनानिमित्त मुंबईत असल्याने त्यांनी सर्व सत्ताधारी नगरसेवकांना लोणावळा येथे बोलवून घेतले होते. लोणावळा येथे बुधवारी रात्री व गुरूवारी सकाळी बैठक घेण्यात येऊन नगरसेवकांची मते जाणून घेण्यात आली. त्यानंतर लंके यांनी औटी यांना दिलेल्या शब्दाप्रमाणे जायदा शेख यांना उपनगराध्यक्षपदाची संधी देण्याची सूचना दिली.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT