-राजेंद्र त्रिमुखे
Ahmednagar : राष्ट्रवादीतील फुटीनंतर पारनेरचे आमदार निलेश लंके हे अजित पवार गटात सामील झाले आहेत. अजितदादासोबत असलेल्या निलेश लंके यांचे पवार परिवाराशी असलेली जवळीक, आपुलकी सर्वश्रुत आहे. त्याचा प्रत्यय विद्यार्थ्यांच्या सत्कार सोहळ्यात आला. आमदार लंके यांनी शरद पवार यांच्या "सिल्वर ओक" या पुस्तकाच्या प्रती विद्यार्थ्यांना भेट दिल्या. राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश मिळविलेल्या विद्यार्थ्यांना हे पुस्तक भेट देण्यात आले.
निलेश लंके यांनी या पुस्तक भेटीच्या उपक्रमातून शरद पवारसाहेब आजही आपल्या मनात असल्याचे सांगितले आहे. अजित पवार गटात सहभागी होण्याची अगोदर घेतलेल्या पक्षाच्या कार्यक्रमात लंके यांनी आई-बापात कशी निवड करणार,कारण दोन्हीही हवे असतात, असा भावनिक प्रश्न स्वतःला पडला असल्याची भावना व्यक्त केली होती. 'पवार परिवार पुन्हा एकत्र येवो,' अशी प्रार्थना त्यांनी केली होती.
पारनेर-नगर मतदारसंघातील २२ विद्यार्थ्यांची विविध शासकीय पदांवर निवड झाली आहे. त्यांचा आमदार निलेश लंके यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी लंके म्हणाले, " विद्यार्थ्यांनी मिळविलेले यश हे सर्वासाठी अभिमानास्पद आहे. राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेसंदर्भात मध्यंतरी निर्माण झालेल्या तिढ्यानंतर पुण्यावरून काही उमेदवार माझ्याकडे आले होते. त्यासंदर्भात मुख्यमंत्री तसेच सबंधितांशी संपर्क करून आपण त्यातून मार्ग काढला होता," असे लंके म्हणाले.
"पैसा, संपत्ती, सत्ता हे क्षणभंगुर आहे. तुम्ही असे काम करा की कोठेही तुमचे नाव घेतले पाहिजे. तुम्ही असेच काम करा. जेथे जाल तेथे तुमचे नाव निघाले पाहिजे," असा सल्ला यांनी लंके यांनी यावेळी विद्यार्थ्यांना दिला.
अजित पवार यांच्या गटात जाण्यापूर्वी निलेश लंके म्हणाले होते की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे माझे कुटुंब आहे. शरद पवार, अजित पवार व सुप्रिया सुळे हे आमचे नेते व कुटुंबप्रमुख आहेत. या कुटुंबातील मी एक अतिशय छोटा घटक आहे. सद्याच्या बदलेल्या राजकीय परिस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व नेते मंडळींनी एकत्र राहावे अशी माझी भूमिका आहे.
(Edited By : Mangesh Mahale)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.