Jalgaon politics : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी जिल्ह्यात महायुतीतील घटक पक्ष भाजप आणि शिवसेना यांनी स्वबळावर लढण्याचा नारा दिला आहे. युती न झाल्यास आपण स्वबळावर लढायला पूर्णपणे तयार आहोत अशी ठाम विधाने भाजपच्या वतीने मंत्री गिरीश महाजन आणि शिवसेनेच्या वतीने गुलाबराव पाटील यांनी केली आहेत. दरम्यान या पार्श्वभूमीवर आता राष्ट्रवादी देखील अॅक्शन मोडवर आली आहे.
जळगाव जिल्ह्यात अजित पवारांनी फार आधीच मोठा डाव टाकत अनेक दिग्गज नेत्यांना गळाला लावलं. त्यामध्ये विशेषत : राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षातील दोन माजी मंत्री, दोन माजी आमदार आणि काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्षा प्रतिभा शिंदे यांना पक्षात प्रवेश देऊन अजित पवार गटाने आपली ताकद वाढवून घेतली. मात्र, त्यानंतर निवडणुकांच्या दृष्टीने भाजप व शिवसेनेकडून जोरदार तयारी केली जात असताना राष्ट्रवादी पक्षातील हालचाली काहीशा मंदावल्या होत्या. मात्र आता राष्ट्रवादीने पुन्हा मोठ्या हालचाली सुरु केल्या आहेत.
अजित पवारांनी जळगावची सूत्र पक्षातील नेते व क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे यांच्या हाती सोपवली आहे. जळगाव जिल्ह्याच्या संपर्कमंत्री पदाची जबाबदारी त्यांच्याकडे दिली आहे. निवडणुकांच्या दृष्टीने आता मंत्री कोकाटे जळगावच्या मैदानाची चाचपणी करणार आहेत. शुक्रवार (ता. ३१) व शनिवारी (ता. १) असे दोन दिवस ते जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत.
आगामी स्थानिक संस्थांच्या निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांची चाचपणी कोकाटे करणार आहेत. मंत्री कोकाटे यांच्यासह पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष आमदार अनिल पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत होणाऱ्या बैठकीत जळगाव व रावेर लोकसभा मतदारसंघांतील सर्व नगरपालिका, नगरपंचायत, जिल्हा परिषद गट, पंचायत समिती गणांत निवडणूक लढविणाऱ्या इच्छुक उमेदवारांची चाचपणी केली जाणार आहे. इच्छुकांचे उमेदवारी अर्ज भरून घेऊन त्या ठिकाणी काय परिस्थिती आहे, हे जाणून घेतले जाणार आहे.
रावेर लोकसभा मतदारसंघातील पालिका, नगरपंचायत, जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणांत ज्यांना निवडणूक लढवायाची आहे, अशा इच्छुकांनी, तालुकाध्यक्ष, शहराध्यक्ष, फ्रंटल सेलप्रमुखांसह प्रमुख पदाधिकाऱ्यांनी शुक्रवारी (ता. ३१) सकाळी साडेनऊला भुसावळ येथील रिंगरोडवरील संतोषी माता हॉलमध्ये उपस्थित राहावयाचे आहे.
तर, जळगाव लोकसभा मतदारसंघातील तालुकाध्यक्ष, शहराध्यक्ष, फ्रंटल सेलप्रमुख, प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक १ नोव्हेंबरला दुपारी एकला जळगाव येथील जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयात होणार आहे. माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर, डॉ. सतीश पाटील, माजी आमदार मनीष जैन, कैलास पाटील, दिलीप सोनवणे आदी यावेळी उपस्थित राहतील. या बैठकांना पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन पक्षाचे जिल्हाध्यक्ष संजय पवार (जळगाव लोकसभा), जिल्हाध्यक्ष उमेश नेमाडे (रावेर लोकसभा) व जळगाव महानगराध्यक्ष अभिषेक पाटील यांनी केले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.