NCP Youth Congress Kopargaon : कोपरगावमधील राजकीय गुन्हेगारी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. चोरीचं सोनं खरेदीत अजित पवार यांच्या राष्ट्रवादी युवक काँग्रेस पक्षाचा पदाधिकारी आढळला आहे. सराफ व्यावसायिक महेश उदावंत, असं त्याचं नाव असून, तो पसार आहे. महेशचा भाऊ योगेश उदावंत आणि महिला आरोपी शीला काळे हिचा न्यायालयाने जामीन फेटळला आहे.
दरम्यान, सराफ व्यावसायिक महेश उदावंत हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा पदाधिकारी असून, चोरीच्या सोनं खरेदीत हात काळे झाल्याचे समोर येताच, कोपरगावमधील गुन्हेगारीला राजाश्रय मिळू लागल्याची चर्चांना पुन्हा पेव फुटला आहे.
कोपरगाव (Kopargaon) तालुक्यातील ग्रामीण भागात चोरीच्या घटनांनी कहर केला असतानाच, आता थेट कोळगाव थडी इथल्या एका सिव्हील इंजिनिअरच्या बंद बंगल्याचे कुलूप तोडून चोरांनी सुमारे 21 लाखांहून अधिक किमतीच्या मुद्देमालावर हात सफाई केली. या चोरीप्रकरणी अभियंता प्रमोद धामणे यांनी फिर्याद दिली आहे.
चोरांनी प्रमोद धामणे यांच्या घरातील फर्निचर, कपाटातील लॉकर फोडून सुमारे 10 तोळ्याच्या बांगड्या, साडेआठ तोळ्याचे गंठण,5 तोळ्याची मोहनमाळ, अडीच तोळ्याच्या अंगठ्या, 5 ग्रॅम कानातील टापसे यासह जवळपास 27 तोळे सोन्याचे दागिने, असा जवळपास 21 लाखांचा ऐवज लंपास केला. या चोरीप्रकरणी कोपरगाव पोलिसांबरोबर (Police) स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांच्या पथकानं समांतर तपास केला.
स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी या चोरीच्या गुन्ह्यात योगेश रवींद्र उदावंत, त्याचा भाऊ महेश, कपिल पिंपळे, नंदू पिंपळे, सोनू शिंदे, रोहित जगबन्सी, शीतल काळे ही आरोपी निष्पन्न झाली आहेत. यातील राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा महेश हा पसार आहे. दरम्यान त्याचा भाऊ योगेश आणि शीतल काळे हिचा न्यायालयाने जामीन फेटाळला आहे. पसार महेश उदावंत याचा गुन्ह्यात समावेश असून, त्याचा शोध सुरू असल्याचं स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांनी 'सरकारनामा'शी बोलताना सांगितलं.
पोलिसांनी गजाआड केलेले कपिल पिंपळे, नंदू पिंपळे सराईत चोर असून, त्यांच्याकडून चोरीचं सोनं खरेदी करणारे देखील सराईत असल्याचे तपासात समोर आलं आहे. चोर अन् सराफ व्यावसायिकांचा मोबाईलवरील संभाषणावरून ते संपर्कात असल्याचं निष्पन्न झालं आहे. चोरीचा मुद्देमाल घेण्याचा घटनाक्रमाचा तपास करायचा असल्यानं न्यायालयाने सराफ व्यावसायिकाचा जामीन अर्ज फेटाळला.
दरम्यान, अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आशुतोष काळे यांनी काही दिवसांपूर्वीच उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन कोपरगावमधील अवैध धंदे, त्यातूना वाढलेल्या गुन्हेगारीवर कारवाईच्या मागणीचं निवेदन दिलं होतं. आता त्यांच्याच पक्षाचा युवा पदाधिकारी चोरीच्या सोनं खरेदीत सापडल्यानं खळबळ उडाली आहे.
कोपरगावमधील वाढत्या गुन्हेगारीवरून आमदार काळे यांच्यावर भाजपकडून वारंवार निशाणा साधला जातो. आता तर पुन्हा एकदा भाजपला आयत कोलीत मिळालं आहे. तसंच पूर्वी कोपरगावमध्ये झालेल्या दंगलीत, तर आमदार काळे यांच्या खासगी स्वीय सहायकानं पोलिसांवर हात उगारला होता. त्यावरून बरचं राजकारण तापलं होतं.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.