Ajit Pawar & NCP Agitation in Dindori Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Ajit Pawar Politics: अजित पवारांचा डाव फसला, राष्ट्रवादीने दिंडोरीचे रस्ते गुलाबी पाण्याने धुतले!

Sampat Devgire

Ajit Pawar News: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नाशिकच्या दौऱ्यात शरद पवार समर्थकांना गोंजारण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याचा उपयोग झाला नाही. अजित पवार यांची पाठ फिरताच याच कार्यकर्त्यांनी त्यांचा निषेध केला.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभा निवडणुकीचा प्रचार दिंडोरी मतदारसंघातून सुरू केला. त्यासाठी त्यांनी जनसंमान यात्रा काढली. गुलाबी रंगाच्या बसमधून प्रवास करीत भाषण केले. मात्र याचा उलटा परिणाम दिंडोरीत झाला.

उपमुख्यमंत्र्यांची पाठ फिरताच आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांचा निषेध केला. दिंडोरी चौफुलीवर गुलाबी पाण्याने रस्ते धुतले. त्यावर गुलाबाचे फुले टाकून उपमुख्यमंत्र्यांचा कडक शब्दात सुनावले.

यावेळी कार्यकर्त्यांनी लाडकी बहीण योजनेतील फसवणूक उघड केली. ते म्हणाले, महिलांना मतदानाचा अधिकार अठरा वर्षांचा आहे. मात्र लाडकी बहीण योजनेचा लाभ फक्त २१ वर्षापासून साठ वर्षांपर्यंतच आहे. साठी पार केलेली महिला बहीण नसते का?. अठरा वर्षाची युवती मतदान करू शकते, मात्र तुम्ही लाडकी बहीण म्हणून तीचा स्वीकार करीत नाही.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हा अध्यक्ष श्याम हिरे म्हणाले, महिलांना तुटभुंजी मदत देण्याऐवजी त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न हवेत. समाजात त्यांना प्रतिष्ठा मिळण्यासाठी, सुरक्षिततेसाठी या सरकारने काय केले? हा खरा प्रश्न आहे.

दिंडोरीच्या दौऱ्यात अजित पवार यांनी लाडकी बहीण योजनेवर गोड गोड भाषण केले. मात्र या मतदारसंघात औद्योगिक वसाहतीचा प्रश्न भीषण बनला आहे. युवकांना रोजगार मिळत नाही. युवकांच्या शैक्षणिक संधी हिरावल्या जात आहेत.

युवकांच्या गंभीर प्रश्नांकडे दुर्लक्ष करून उपमुख्यमंत्री पवार यांनी आमचा भ्रमनिरास केला. गुलाबी गाडी, गुलाबी जॅकेट आणि गुलाबी थंडीचा आस्वाद घेत आदिवासी क्रांती दिनाच्या पूर्वसंध्येला उपमुख्यमंत्री पवार यांनी दिंडोरीचा दौरा केला. मात्र गुलाबी गाडीत बसल्याने क्रांती होत नसते.

सर्वसामान्य शेतकरी, शेतमजूर, कामगार, बेरोजगारांच्या न्याय व हक्कासाठी उपमुख्यमंत्र्यांनी चकार शब्दही काढला नाही. हा वेगळेपणा जनता चांगलीच ओळखून आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्री पवार यांनी कितीही गोंजारण्याचा प्रयत्न केला, तरी आम्ही फसणार नाही.

उपमुख्यमंत्री पवार यांचा आम्ही निषेध करतो, असे कार्यकर्ते यावेळी म्हणाले. यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पदाधिकारी शैलाताई उपाडे, वणीचे सरपंच सोमनाथ ढेरे, मनोज कांदे, सागर गुंबाडे, संदीप बेडे, संतोष रेहरे यांसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते निषेध आंदोलनात सहभागी झाले

उपमुख्यमंत्री पवार यांनी दिंडोरी विधानसभा मतदारसंघापासून निवडणूक जिंकण्यासाठी दौरा सुरू केला. मात्र त्यांची पाठ फिरताच निषेध आंदोलन सुरू झाले. विशेषतः अजित पवार यांनी शरद पवार गटाचे नेते व कार्यकर्त्यांना गोंजारण्याचा प्रयत्न केला होता त्याचा काहीही उपयोग झाला आहे.

------

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT