Ajit Pawar Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Ajit Pawar Politics: वाहतूक कोंडीवर अजित पवारांचे भाषण.... प्रवास मात्र विमानाने!

Sampat Devgire

Ajit Pawar News: नाशिक मुंबई महामार्गावरील वाहतूक कोंडी हा खुपच गंभीर प्रश्न झाला आहे. या अत्यंत क्लिष्ट विषबावर तोडगा निघेचना अशी स्थिती आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि तीन मंत्र्यांनी आश्वासने देऊनही याबाबत कार्यवाही होत नसल्याने सगळेच हतबल असल्याचे चित्र आहे.

नाशिक मुंबई महामार्गावरील वाहतूक कोंडी पुढे सबंध राज्य शासन असहाय्य असल्याचे दिसते. यापूर्वी मुख्यमंत्र्यांनी कारवाईचे आदेश दिले होते. त्यानंतर मंत्र्यांनी बैठका घेतल्या. आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वाहतूक कोंडी विषयी मंत्रालयात सगळ्यांनाच दम भरला.

उपमुख्यमंत्री पवार यांनी या विषयावर गुरूवारी मंत्रालयात अधिकाऱ्यांना भाषण दिले. मात्र आज नाशिकला येण्यासाठी त्यांनी या महामार्गाने येण्याचे टाळले. त्यांनी विमानाने नाशिकला येणे पसंत केले. त्यामुळे महामार्ग कोंडीवर भाषण आणि प्रत्यक्ष समस्येविषयी वेगळीच भूमिका अशी स्थिती आहे.

त्यामुळे नाशिक शहरवासीयांची मुंबईच्या वाहतूक कोंडीतून खरोखर मुक्तता होईल का? असा प्रश्न पडला आहे. नाशिक मुंबई महामार्गाची वाहतूक कोंडी आता सगळ्यांच्याच गळ्याचा फास बनला आहे. चार तासांचा प्रवास दहा तासांमध्ये पोहोचला आहे.

या संदर्भात काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी सभागृहात आवाज उठवला होता. त्याला चक्क सत्ताधारी पक्षाचे मंत्री छगन भुजबळ यांनीही सहमती दर्शविली होती. पालकमंत्री दादा भुसे यांनी यासंदर्भात दहा दिवसांपूर्वी संबंधित विभागाला वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी सूचना केल्या होत्या.

वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी आठवड्याची मुदत देण्यात आली होती. त्यातूनही काहीच निष्पन्न न झाल्याने पालकमंत्री भुसे यांना पुन्हा एकदा या विषयावर प्रशासनाची कान उघडणे करावी लागली. पालकमंत्री भुसे यांनी नाशिकला तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी मंत्रालयात एक बैठक घेतली.

उपमुख्यमंत्री पवार यांच्या बैठकीला मंत्री छगन भुजबळ यांसह अप्पर मुख्य सचिवांपासून तर अनेक वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. वाहतूक कोंडीचा मुद्दा आणि महामार्गावरील खड्डे केव्हा बुजवणार? असा प्रश्न त्यांनी अधिकाऱ्यांना केला. महामार्गावरील खड्डे बुजत नाहीत, तोपर्यंत टोल बंद करा, अशी टोकाची भूमिका त्यांनी घेतली.

टोल बंद करण्याच्या सुचनेचा तरी महामार्ग प्रशासन व कंत्राटदारांवर परिणाम होतो का? हे पहावे लागेल. आता खरोखरच वाहतूक कोंडी न थांबल्यास टोल बंद होईल का? याची सगळ्यांना उत्सुकता आहे. नाशिकच्या लोकप्रतिनिधी आणि मंत्र्यांच्या इच्छाशक्तीवरच आता त्रस्त नागरिक प्रश्नचिन्ह उपस्थित करू लागले आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीत या मुद्द्यावर राज्य शासनाला विरोधकांकडून टार्गेट केले जाण्याची शक्यता आहे.

पालकमंत्री दादा भुसे, मंत्री छगन भुजबळ, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यापासून तर थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रश्नावर विविध सुचना केल्यात. नाशिकच्या वाहतूक कोंडी हा विषय एव्हढ्या मंत्र्यांनी लावून धरला. महामार्गाची दुरावस्था दूर करण्यासाठी उपाय योजनेचे आदेश दिले. मात्र या मंत्र्यांच्या सूचनेनंतरही वाहतूक कोंडी काही दूर झालेली नाही.

-----

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT