Nashik News: उद्धव ठाकरे यांचा ग्रामीणचा बालेकिल्ला असलेल्या दिंडोरी तालुक्यावर शिंदे गटाने लक्ष केंद्रीत करीत येथील माजी आमदार धनराज महाले यांना दोन वर्षापूर्वीच गळाला लावले आहे. पण दिंडोरीची जागेवर नरहरी झिरवाळ लढणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरी यांनी जाहीर केले आहे. त्यामुळे महायुतीत वाद निर्माण झाला आहे.
दोन दिवसांपूर्वी राष्ट्रवादी शरद पवार गटाने (NCP Sharad Pawar Group) विधानसभा निवडणुकीसाठी रोहित पाटील आणि अमित भांगरे यांच्या नावाची घोषणा केली. त्या पाठोपाठ राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांनी आपल्या नाशिक दौऱ्यात नरहरी झिरवाळ यांच्या उमेदवारीची घोषणा केली.
नरहरी झिरवाळ हे दिंडोरी विधानसभा मतदारसंघातून लढणार असल्याचे तटकरे यांनी जाहीर केले. तटकरे यांच्या नाशिक दौऱ्यानंतर महायुतीत तणाव निर्माण झाला आहे. नरहरी झिरवाळ यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर दिंडोरीचे शिंदे गटाचे नेते आणि माजी आमदार धनराज महाले (Dhanraj Mahale) नाराज आहेत.
झिरवाळ य़ांची उमेदवारी जाहीर करण्याचा तटकरेंनी काय अधिकार ? असा सवाल धनराज महाले यांनी उपस्थित केला आहे. उमेदवारीचा निर्णय तिन्ही पक्षाचे वरिष्ठ नेते घेतील, मी निवडणूक लढण्यावर ठाम आहे, असे महाले यांनी माध्यमांना सांगितले.
तटकरे हे दोन दिवस नाशिक दौऱ्यावर होते. विधानसभेच्या पार्श्वभूमीवर अजित पवार गटाकडून नाशिक जिल्ह्यातील विविध मतदारसंघांचा आढावा घेतला गेला. दिंडोरी विधानसभा मतदारसंघाचा आढावा सुनील तटकरे यांनी घेतला. त्यांनी दिंडोरी मतदारसंघासाठी नरहरी झिरवाळ यांची उमेदवारी जाहीर केली. दिंडोरीचा उमेदवार जाहीर करणाऱ्या तटकरेंची तक्रार पक्षाच्या वरिष्ठांकडे करणार असल्याचे महाले यांनी सांगितले.
शिवसेनेत प्रवेश केला तेव्हाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मला उमेदवारी देण्याचा शब्द दिला आहे, असा दावा धनराज महाले यांनी केला आहे. झिरवाळ कुटुंबियांकडून लोकसभेत महायुतीच्या विरोधात काम केल्याचा आरोप महाले यांनी केला आहे. दिंडोरी (Nashik) विधानसभा मतदारसंघातील माजी आमदार धनराज महाले यांनी नागपूर (Nagpur) येथे शिंदे गटात (Eknath Shinde) प्रवेश केला होता.
शिंदे गटाने धनराज महाले यांना दोन वर्षापूर्वीच गळाला लावले होते. धनराज महाले यांसह ज्येष्ठ नेते सुरेश डोखळे, कादवा साखर कारखान्यांचे माजी संचालक संतपराव घडवजे, बाळासाहेब मेंदणे, युवा नेते सचिन बर्डे, किरण कड यांसह स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते यांनीही नागपूर येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,पालकमंत्री दादा भुसे, भाऊसाहेब चौधरी यांच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश केला होता.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.