Manikrao Kokate, Ajit Pawar & Saroj Ahire Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Ajit Pawar Politics: अजित पवार का म्हणाले, हे येऱ्या गबाळ्याचे काम नव्हे!

Sampat Devgire

Ajit Pawar News: आज राज्याची निवडणूक जाहीर होण्याची शक्यता आहे. त्याच्या काही तास आधी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी धुमधडाक्यात भूमिपूजनांचे कार्यक्रम केले. यावेळी त्यांनी आपले मन मोकळे केले.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते आज आमदार सरोज अहिरे यांच्या देवळाली मतदारसंघातील सुमारे साडेतीनशे कोटींच्या विकास कामांचे भूमिपूजन केले. यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार अहिरे आणि कोकाटे यांची तोंड भरून स्तुती केली.

उपमुख्यमंत्री पवार यांनी यावेळी आपण केलेल्या कामाची तुलना करीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारचे देखील कौतुक केले. ते म्हणाले मी अनेक सरकारांमध्ये काम केले आहे. सुरुवातीला महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये होतो.

आघाडीच्या सरकारमध्ये मला दीड वर्ष मिळाले. कोरोनामध्ये एक वर्ष गेले. गेल्या दीड वर्षात मुख्यमंत्री शिंदे यांच्याबरोबर काम करता आले. या सरकारमधील काम करण्याचा माझा वेगळा अनुभव आहे.

या दीड वर्षात मी आमदारांना हजारो कोटींचा निधी मंजूर करू शकलो. विकास कामांसाठी निधीला नाही म्हणायचे नाही, असे माझे धोरण आहे. जिथे कुठे काम अडले असेल, तिथे स्वतः लक्ष घालत आलो.

नाशिक जिल्ह्यातील कामांसाठी तर माझ्या स्वीय असाहाय्यकांना माझ्या खास सूचना होत्या. गेल्या दीड वर्षात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारमध्ये काम केले. त्यात आमदारांना हजारो कोटींचा निधी मिळाला. असे यापूर्वी कधी झाले नव्हते.

सिन्नर सारख्या मतदारसंघात १५ हजार कोटींचा नदी जोड प्रकल्प मंजूर झाला. त्यासाठी वर्ष दिड वर्षे पाठपुरावा सुरू होता. एवढा निधी इतिहासात कोणात्याही मतदारसंघाचा मिळाला नसेल. काही छोट्या छोट्या राज्यांचे तर एवढे बजेट देखील नसते.

मी स्वतः लक्ष घातले. मुख्यमंत्र्यांना देखील विश्वासात घेतले. जाता जाता मंत्रिमंडळाच्या बैठकीत त्या निधीला मंजुरी मिळाली आहे. एवढे मोठे काम करू शकलो. दीड वर्ष आम्हाला मिळालेली कामाची संधी हे त्याचे कारण आहे.

यावेळी उपमुख्यमंत्री पवार यांनी आमदारांचे कौतुक करतानाच सरकारने केलेल्या कामांची देखील माहिती दिली. आता राहिलेली जी काही कामे असतील ती निवडणुका झाल्यावर मी करीन. केंद्रातले सरकार अजून साडेचार वर्ष आहे. त्यांना पाच वर्षांसाठी जनतेने जनादेश दिला आहे.

त्या सरकारकडे जाऊन देखील शेतकरी, महिला, कामगार, युवक अशा सर्व घटकांचे जे जे काम असेल, त्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. द्राक्ष उत्पादकांच्या प्रश्नांसाठी त्यांच्या शिष्टमंडळाला स्वतः दिल्लीला घेऊन जाईल. संबंधित मंत्र्यांना विनंती करून ती कामे केली जातील.

या कार्यक्रमाला आमदार माणिकराव कोकाटे आमदार दिलीप बनकर माजी खासदार देविदास पिंगळे यांचं विविध पक्षांचे नेते उपस्थित होते.

------

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT