Ajit Pawar Politics: उपमुख्यमंत्री अजित पवार गेल्या ३५ वर्षापासून राजकारणात प्रभावीपणे काम करत आहेत. सध्या विरोधकांकडून त्यांना बदनाम करण्याचे काम सुरू आहे. विरोधकांचा हा प्रयत्न हाणून पाडण्यासाठी काम करावे, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी सांगितले.
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी आज जिल्ह्यातील कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांशी विचारविनिमय केला. आगामी विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची सुरवात उपमुख्यमंत्री पवार नाशिक येथून करणार असल्याचे त्यांनी सांगितले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा हा राजकीय निर्णय चर्चेचा विषय ठरणार आहे.
नाशिक जिल्हा हा ज्येष्ठ नेते शरद पवार यांना माननारा जिल्हा मानला जातो. श्री. पवार यांच्या राजकीय वाटचालीत नाशिकला विशेष महत्व आहे. १९८५ मध्ये पुलोद आघाडी स्थापन केल्यावर जिल्ह्यातील सर्व १४ आमदार याच आघाडीचे विजयी झाले होते. गेल्या विधानसभा निवडणुकीत नाशिक जिल्ह्यातील सर्वाधीक ६ आमदार शरद पवार यांच्या पक्षाचेच होते.
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत बारामती मतदारसंघात खासदार सुप्रिया सुळे विरोधातील लढत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिष्ठेची केली होती. त्यात सर्व प्रयोग आणि भाजपसह व मुख्यमंत्री शिंदे गटाचा पाठींबा असतानाही सुनेत्रा पवार यांचा पराभव झाला. त्यामुळे बारामती हा शरद पवार यांचाच बालेकिल्ला असा संदेश गेला. त्यामुळे उपमुख्यमंत्री पवार यांनी राजकीय प्रयोगासाठी नाशिकची निवड केलेली दिसते. आगामी निवडणुकीसाठी नाशिक येथून प्रचाराची सुरवात करण्याचा घेतलेला निर्णय राजकीयदृष्ट्या चर्चेचा विषय नक्कीच ठरेल.
यावेळी खासदार तटकरे म्हणाले की, विविध योजनांची घोषणा करून महाविकास आघाडीला जमिनीवर आणण्याचे काम उपमुख्यमंत्री पवार यांनी केलं आहे. राज्यात विविध घोषणा करत असताना आर्थिक समतोल साधण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे.
राज्यातील शेतकरी, महिला, विद्यार्थी, युवक यांच्यासह विविध घटकांसाठी १ लाख कोटी रुपयांच्या योजना सुरू केल्या आहेत. त्या योजना सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहचवा. येणाऱ्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला सर्वाधिक यश कसं मिळेल यासाठी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागावे.
उपमुख्यमंत्री पवार यांच्या जनसंवाद यात्रेद्वारे सर्व विधानसभा मतदारसंघात अजित पवार सर्व ज्येष्ठ नेत्यांसमावेत जातील. ज्येष्ठ नेते मंत्री छगन भुजबळ, खासदार प्रफुल्ल पटेल यांच्या नेतृत्वाखाली या यात्रेद्वारे निवडणुकीत मोठ यश मिळवू.
यावेळी मुंबई अध्यक्ष माजी खासदार समीर भुजबळ म्हणाले की, महायुती सरकारच्या वतीने विविध योजना राबविण्यात येत आहे. या योजना सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचविण्याचे काम राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते करत आहे. येणाऱ्या निवडणुकीत पक्षाच्या वतीने ज्या ज्या ठिकाणी उमेदवार उभे केले जातील त्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी सर्व काम करतील असे त्यांनी सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.