Ajit Pawar Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Ajit Pawar Politics: शरद पवारांचा जवळचा नेता फोडण्यासाठी अजित पवारांनी टाकले जाळे?

Sampat Devgire

Nashik NCP News: राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाची जन सन्मान यात्रा आज दिंडोरी विधानसभा मतदारसंघातून सुरू झाली.उपमुख्यमंत्री पवार यांच्या घोषणा आणि दौऱ्यातील कार्यक्रम यामुळे या यात्रेची सुरुवातच चर्चेचा विषय ठरली आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज शरद पवार यांचे निकटवर्तीय कादवा कारखान्याचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते श्रीराम शेटे यांना आपल्याकडे वळविण्यासाठी त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव करीत जाळे टाकले. त्याचवेळी नाशिक जिल्हा किती चांगला आहे, हे सांगत अनेक मोठ्या योजनांची आश्वासनेही देऊन टाकली.

एकंदरच त्यांच्या या दौऱ्यातून आगामी विधानसभा निवडणुकीचा प्रचार आणि धोरण कसे असेल याचे संकेत मिळाले. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर महायुतीमध्ये घबराट निर्माण झाली. हे लपून राहिलेले नाही. त्यावर उतारा म्हणून लाडकी बहीण पासून तर अनेक लोकप्रिय योजनांचा धडाका राज्य सरकारने लावला.

आता पुढच्या टप्प्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्याहूनही मोठ्या योजनांची आश्वासने देण्यास सुरुवात केली आहे. नाशिक येथील जन सन्मान यात्रेच्या भाषणांत त्याची जाणीव झाली. तिडोरीत खडखडाट व राज्यावर कर्जाचा डोंगर असताना घोषणा देताना हात अजिबात अखडता घेतलेला नाही.

यावेळी अजित पवार यांनी शरद पवार यांचे निकटवर्तीय आणि मोठे नेते असलेले श्रीराम शेटे यांचे खुप कौतुक केले. त्यांच्या कारखान्याला भेट दिल्यावर हा कारखाना किती उत्तम आहे, हे सांगत तोंड भरून कौतुक केले. मला कारखान्यातले कळते. श्रीराम शेटे यांच्या कादवा साखर कारखान्याचे काम उत्तम सुरू आहे, असे त्यांनी सांगितले.

वस्तुतः श्री शेटे शरद पवार यांचे निकटवर्तीय आहेत. तरीही त्यांचे कौतुक झाल्यावर त्याची चर्चा तर होणारच. यावेळी श्री. पवार नाशिक राजकीय दृष्ट्या किती प्रगत आणि पुढे आहे, हे सांगायला विसरले नाही. त्यांनी (कै) यशवंतराव चव्हाण यांच्या बिनविरोध निवडणुकीचा संदर्भ देखील दिला.

वैनगंगा नदी जोड प्रकल्पाबाबत आम्ही मोठा निर्णय घेतला आहे. नाशिकच्या नार-पार नदी जोड प्रकल्पाला देखील लवकरच मंजुरी मिळणार आहे. नाशिकसाठी स्वतंत्र धरण हवे आहे. त्याला लवकरच किकवी धरणाला मंजुरी देण्यात येईल.

नाशिक हे राजकीयदृष्ट्या अग्रेसर आहे. येथे आमचे सर्वाधिक आमदार आहेत. या यात्रेच्या माध्यमातून आम्ही मतदारांचे आशीर्वाद घेऊन निवडणुकीला सामोरे जात आहोत. बारामतीच्या राजकीय परिस्थितीबाबत देखील ते बोलले.

लोकसभेला आम्हाला फटका बसला. ठेच लागल्यावर माणूस शहाणा होतो. जपून पावले टाकत पुढे जातो. आम्ही देखील त्यापासून धडा घेतला आहे. आता कांदा निर्यात बंदी करणार नाही असे सूचक वक्तव्य त्यांनी केले.

राज्यातील तिजोरीची स्थिती, धोरणात्मक निर्णय आणि नदीजोड प्रकल्पात केंद्र शासनाचा हितसंबंध या सर्व स्थितीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे दावे कितपत प्रत्यक्षात येतील, हा वेगळा विषय आहे.

मात्र विधानसभा निवडणुकीसाठी उपमुख्यमंत्री पवार यांनी नाशिककरांना आकर्षित करण्यासाठी कोणतीही कसर सोडली नाही, हे मात्र स्पष्ट आहे. या दौऱ्यानंतर निवडणुकीत नाशिकचे मतदार राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाला कितपत प्रतिसाद देतात हे लवकरच स्पष्ट होईल.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT