Dr. Heena Gavit Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Heena Gavit: आमदार-खासदार पिता-पुत्राचा 'गेम' करण्यासाठी माजी खासदार विधानसभेच्या मैदानात

Akkalkuwa Assembly constituency: लोकसभेमध्ये दोन टर्मपासून निवडून गेलेल्या डॉ. हिना गावित यांना मागील लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे नेते, माजी मंत्री के.सी.पाडवी यांचे पुत्र गोवाल पाडवी यांच्याकडून पराभवाची धूळ चाखावा लागली.

सरकारनामा ब्यूरो

सागर निकवाडे

Nandurbar News: नंदुरबार लोकसभा मतदारसंघात पराभूत झाल्यानंतर भाजपच्या माजी खासदार डॉ. हिना गावित (Heena Gavit) यांना आता आमदारकीचे वेध लागले आहेत. त्यांनी निवडणुकीची तयारी सुरु केली आहे.

गेल्या महिन्याभरापासून अक्कलकुवा-अक्राणी मतदारसंघात त्या तळ ठोकून आहेत. त्यातच त्यांचे वडील राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी याच मतदारसंघात विकास कामांच्या उद्घाटनाचा धडाका लावला आहे.

या मतदारसंघात महायुतीकडील इच्छुकांची धाकधूक वाढली आहे. लोकसभा निवडणुकीत डॉ. हिना गावित यांच्याविरोधात उघडपणे भूमिका घेऊन काँग्रेसला या मतदारसंघातील शिवसेनेच्या शिंदे गटाचे संपर्क प्रमुख चंद्रकांत रघुवंशी यांनी मदत केली होती.

लोकसभेमध्ये दोन टर्मपासून निवडून गेलेल्या डॉ. हिना गावित यांना मागील लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे नेते, माजी मंत्री ॲड.के.सी.पाडवी यांचे पुत्र ॲड.गोवाल पाडवी यांच्याकडून पराभवाची धूळ चाखावा लागली. पराभवानंतर डॉ. गावित या नंदुरबारच्या राजकारणात अधिकच सक्रिय झाल्या आहेत. अक्कलकुवा-अक्राणी मतदारसंघात त्यांनी कार्यकर्त्यांच्या बैठकांचा सपाटा लावला आहे.

या मतदारसंघात शिवसेना शिंदेगटाकडून इच्छुक विजयसिंग पराडके आणि किरसिंग वसावे यांनी लोकसभा निवडणुकीत उघडपणे डॉ. हिना गावित यांच्या विरोधात प्रचार केला होता. काँग्रेसचे माजी मंत्री ॲड. के. सी. पाडवी (K.C.Padvi) हे सलग ३५ वर्षांपासून अक्कलकुवा-अक्राणीचे आमदार आहेत.

त्यांच्याच मुलाने डॉ. हिना गावित यांचा पराभव केला. त्यामुळे पाडवी पिता-पुत्रांना त्यांच्याच मतदारसंघात पराभूत करण्यासाठी डॉ.हिना गावित यांनी कंबर कसली आहे. डॉ. गावित यांच्या भूमिकेने शिंदे गटातील नेतेही धास्तावले आहेत.

लोकसभेच्या निकालाची आकडेवारी पाहता विरोधकांनी डॉ. हिना गावित यांच्याविरोधात मोट बांधल्याने पाडवी यांना एक लाख २५ हजार मते या मतदारसंघातून मिळाली होती. दुसरीकडे, गावित यांना सुमारे ८५ हजार मते मिळाली होती.

आता गावित यांच्याविरुद्ध एकत्र येणारे सर्व विरोधक वेगवेगळे लढणार असल्याने त्यांच्या मताची विभागणी होऊन गावित यांना फायदा होऊ शकतो, असे गणित मांडले जात आहे. डॉ. हिना गावित यांनी मतदारसंघातील अक्कलकुवा शहरात एक तर, धडगाव शहरात एक घर वास्तव्यासाठी भाडेतत्वावर घेतली आहेत. त्यामुळे त्यांची विधानसभा निवडणूक लढण्याची संपूर्ण तयारी झाल्याचे मानले जात आहे.

Edited by: Mangesh Mahale

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT