Jalgaon Kiran Chaudhary, Sealed House Break-in : एसीबीने अकोला येथे भ्रष्टाचार प्रकरणात कारवाई केलेल्या सहजिल्हा निबंधक तथा मुद्रांक जिल्हाधिकारी (अकोला वर्ग-१) किरण पुरुषोत्तम चौधरी यांच्या जळगाव येथील सीलबंद राहत्या घरात घुसखोरी करुन चोरी करण्याचा प्रयत्न झाल्याने खळबळ उडाली आहे.
अकोला येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने काही दिवसांपूर्वी किरण चौधरी यांच्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये कारवाई केली होती. एसीबीने लाच घेतल्याच्या आरोपावरून त्यांना अटक करून त्यांचे जळगाव येथील निवासस्थान सील केले होते.
मात्र, त्यांच्या जळगावातील गणेश कॉलनीतील सीलबंद घरात घुसून पुरावे चोरण्याचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. घराचे कुलूप तोडून आतील दस्ताऐवज, मालमत्तेचे पुरावे लंपास करण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना जिल्हापेठ पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
किरण चौधरी यांचे जळगावमधील गणेश कॉलनी येथील 'साईप्रभा आर्केड'मधील राहते घर झडतीसाठी एसीबीने सील करून सुरक्षित ठेवले होते. मात्र, रविवारी (दि. २८) पहाटे सील केलेल्या घरातून काही आवाज येत असल्याची माहिती शेजाऱ्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (ACB)च्या अधिकाऱ्यांना दिली. त्यानंतर पोलिस पथक घटनास्थळी दाखल झाले व घराच्या मागील बाजूने शिडी लावून आत शिरलेल्या दोघांना रंगेहात पकडण्यात आले.
पोलिस निरीक्षक स्मिता वसंत नवघरे यांच्या फिर्यादीवरून संशयित प्रसाद वसंत नारखेडे (वय ३३, रा. डांभूर्णी, ता. यावल) व प्रवीण अशोक महाजन (३६, रा. गणेश कॉलनी, जळगाव) यांच्याविरुद्ध जिल्हा पेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चौधरी यांचे शासकीय सीलबंद घर फोडून कुणीतरी आत शिरल्याची चाहुल शेजाऱ्यांना लागली. शेजाऱ्यांनी प्रसंगावधान ठेऊन तत्काळ संबंधित अधिकाऱ्यांना संपर्क करून माहिती दिली. त्यामुळे दोन्ही संशयितांना रंगेहात पकडण्यात पोलिसांना यश आले.
दरम्यान, या प्रकरणात काही महत्त्वाच्या बाबींचा पोलीस तपास सुरू असून, हा घुसखोरीचा प्रयत्न नक्की कुणाच्या सांगण्यावरून झाला. घरातील रोख रक्कम किंवा मौल्यवान वस्तू तपास यंत्रणेच्या हाती लागण्यापूर्वी हटविण्याचा कट होता का, तसेच अटक करण्यात आलेल्या दोन्ही संशियतांचे संबंधित अधिकाऱ्याशी नेमके संबंध काय आहेत, याचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.