Akole News : अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले विधानसभा मतदारसंघात मारहाणीच्या एका कथित घटनेमुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार डॉ. किरण लहामटे यांचे स्वीय सहायक तसेच चुलत बंधू मुकुंद लहामटे आणि आणखी एका कार्यकर्त्याने राजूर येथील बाजारपेठेत एका युवकाला मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या घटनेचा कथित CCTV व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
माहितीनुसार, ही घटना सहा जुलै रोजी घडल्याचे सांगितले जात आहे. कुमशेत येथील एका युवकाला किरकोळ कारणावरून राजूरमध्ये (Rajur) मारहाण करण्यात आल्याचा आरोप आहे. या घटनेचे दृश्य परिसरातील CCTV कॅमेऱ्यात कैद झाल्याचे समोर आले आहे.
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये (Video) दुचाकीवर बसलेल्या युवकाकडे काही जण धावत जात त्याला मारहाण करत असल्याचे दिसत आहे. मात्र, हा वाद नेमका कोणत्या कारणावरून झाला, याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही. या घटनेची अकोले तालुक्यात विविध स्तरांवर चर्चा सुरू आहे.
दरम्यान, राजूर पोलिस ठाण्यात या घटनेची कोणतीही अधिकृत तक्रार दाखल झालेली नसल्याची माहिती मिळत आहे. मात्र, मारहाण झालेला युवक तक्रार देण्यासाठी पोलिस ठाण्यात गेला होता, परंतु त्याची तक्रार स्वीकारण्यात आली नाही, असा आरोप संबंधित युवकाकडून करण्यात आला आहे.
दुसरीकडे, आमदार डॉ. किरण लहामटे यांच्या समर्थकांकडून मारहाण झालेला युवक नशेच्या अवस्थेत असल्याचा दावा करण्यात येत आहे. या दाव्याची अधिकृत पुष्टी झालेली नाही. तसेच, राजूर परिसरात दारूबंदी लागू असताना संबंधित युवकाने कोणत्या प्रकारची नशा केली होती, तसेच त्याला मद्य किंवा इतर अमली पदार्थ कोठून मिळाले, असे प्रश्नही स्थानिक स्तरावर उपस्थित केले जात आहेत.
आमदार डॉ. किरण लहामटे हे सध्या पावसाळी अधिवेशनासाठी मुंबईत आहेत. या प्रकरणाबाबत पोलिसांकडून किंवा आमदार डॉ. किरण लहामटे यांच्या कार्यालयाकडून अधिकृत भूमिका अद्याप समोर आलेली नाही.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.