Nilesh Lanke, Radhakrishna Vikhe Patil, Sujay Vikhe Patil  Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Ahmednagar Lok Sabha Election 2024 Result : विखे-लंके लढतीचा एक्झिट पोल काही असो, पण मोठे विखे निकाल पलटवणार?

Lok Sabha Election 2024 Result : नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी अर्धा तासात सुरू होत आहे. सुजय विखे आणि नीलेश लंके यांच्या लढतीकडे लक्ष आहे. एक्झिट पोलचा अंदाज लंकेकडे झुकलेला असला, तरी मंत्री विखे कमाल दिसेल आणि निकाल फिरेल, असे संकेत आहेत.

Pradeep Pendhare

Sujay Vikhe V/S Nilesh Lanke : 'कम से कम दो लाख', असे म्हणत निवडणुकीच्या मैदानात विखेंविरोधात उतरलेले माजी आमदार नीलेश लंके दिग्गज भाजप नेते पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या पुत्रासमोर टिकणार का? याचा फैसला थोड्याच वेळात होईल. एक्झिट पोलमध्ये आघाडीवर असल्याचा अंदाजानंतर नीलेश लंके आणि त्यांचे कार्यकर्ते अधिकच अ‍ॅक्शन मोडमध्ये आहेत. परंतु चांगल्या चांगल्याना अंदाज न येऊ देणारे राजकारणातील अनुभवी दिग्गज मंत्री विखे हा अंदाज पलटवणार आणि विरोधकांना घाम फोडणार, असे संकेत मिळत आहेत.

नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाची निवडणूक लक्षवेधी ठरली. महायुती भाजपकडून खासदार सुजय विखे यांच्यासमोर शरद पवार यांनी माजी आमदार नीलेश लंके यांना समोर उभे केले. गेल्या पंचवार्षिकचा अनुभव घेता, यावेळी शरद पवार यांनी या निवडणुकीत अगदी सुरूवातीपासून सावध पवित्रा घेतलेला दिसला. नीलेश लंके देखील अनुभवीसारखे निवडणुकीच्या मैदानात वावरत होते.

धनशक्तीविरुद्ध जनशक्ती, असा नारा देत लंकेंनी विखेंना आव्हान दिले. त्यामुळे दिग्गज नेते पालकमंत्री राधाकृष्ण विखे (Radhakrishna Vikhe) आणि त्यांचे पुत्र सुजय विखे यांची चांगलीच दमछाक झाली. खासदार विखेंनी सुरूवातीलाच लंकेवर इंग्रजी भाषेचा डाव टाकला. तो उलटला. त्यानंतर ही निवडणूक सोपी नाही, हे लक्षात आल्यावर विखे पिता-पुत्र अगदी सावध झाले आणि वेगाने मतदारसंघात घुसले. फिरू लागले. गाठीभेटींवर भर दिला. त्याचा परिणाम चांगला झाला आणि आता रिझल्ट दिसेल, असे सांगितले जात आहे.

या निवडणुकीत 'विखे यंत्रणा' महत्त्वाची होती. ती राबवण्याची जबाबदारी मंत्री विखेंनी स्वतः हातात ठेवली. त्यामुळे कोठे काय होत आहे, त्याची माहिती क्षणोक्षणी त्यांना मिळत होती. त्यामुळे त्यावर लगेचच अ‍ॅक्शन होत होती. कोठेही कमी राहायला नको, याची काळजी घेतली जात होती. सुजय विखे यांच्या विरोधात काहीशी लाट तयार झाली होती. त्यांच्याभोवती असलेल्या स्वीय सहाय्यकांचा गराडा आणि सर्वसामान्यांना लगेच न भेटणे हा मुद्दा निवडणुकीत खूप गाजला. मंत्री विखे आणि सुजय विखे यांनी त्यावर लगेच काम केले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

'विखे यंत्रणे'बरोबर निष्ठावान भाजप, याची सांगड घालणे गरजेचे होते. मंत्री विखे यांनी त्यावर काम केले. महायुतीचे एकच कार्यालय सुरू करून त्यातून संपर्कावर भर दिला. परिणामी एका साखळीत काम दिसू लागले. परंतु कोण कोठे काम करतो, यावर थेट नियंत्रण मंत्री विखे यांचे होते. त्यामुळे ही साखळी अदृश्य होती. तसेच उत्तरेकडील त्यांचा संपर्क त्यांनी दक्षिणेत उतरवला होता. त्यामुळे वरकरणी नीलेश लंके दिसत असले, तरी आतून विखे यंत्रणा वेग प्रचंड होता. तो मतेपटीतून आज दिसेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

सट्टेबाजारात नीलेश लंके यांना पसंती आहे. असे असले तरी सट्टेबाजारात विखेंचा अंदाज आलेला नाही. त्यामुळे सट्टेबाजार देखील कन्फ्यूज आहे. एक्झिट पोलने देखील नीलेश लंके आघाडीवर असतील, असा अंदाज व्यक्त केला आहे. परंतु हा अंदाज फेल कसा ठरेल, याचे गणित मंत्री विखेंनी आखून ठेवले आहे. ते आज स्पष्ट होईल. त्यामुळे मंत्री विखे निकाल पलटवणार, असा विश्वास भाजपकडून व्यक्त केला जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT