Nashik News : वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख ॲड. प्रकाश आंबेडकर आणि रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष तथा केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले हे दोन्ही नेते येवल्यात एका कार्यक्रमाला आले होते. महाराष्ट्राच्या दलित चळवळीतील हे दोन मोठे नेते एका कार्यक्रमासाठी आले खरे, पण त्यांनी एकमेकांचे तोंडही पाहिले नाही. त्यामुळे अनेक कार्यकर्त्यांची निराशाच झाली. (Ambedkar-Athwale came for a program; But did not even see each other's faces)
महाराष्ट्रातील दलित चळवळीतील नेत्यांनी एकत्र यावे, यासाठी अनेक कार्यकर्ते प्रयत्न करत असतात. मात्र, सर्वच नेत्यांची तोंडं, भूमिका परस्परांच्या विरुद्धच असतात. त्याचा प्रत्यय शुक्रवारी (ता. १३ ऑक्टोबर) पुन्हा एकदा आला. येवला येथे धर्मांत्तर घोषणेच्या ८८ व्या वर्धापन दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले दोघेही आले होते. मात्र, त्यांनी एकमेकांचे तोंडही पाहिले नाही.
या वेळी दोन्ही नेत्यांच्या पत्रकार परिषदा झाल्या. सभा झाल्या. त्यातदेखील केंद्रातील राजकारणाचा प्रभाव दिसून आला. आगामी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या राजकारणाचा उल्लेख या दोन्ही नेत्यांनी आवर्जून केला. तोदेखील परस्परविरोधीच होता.
येवल्यातील या कार्यक्रमात आगामी लोकसभा निवडणुकीसाठी विविध पक्षांना एकत्र करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यात रिपब्लिकन गट प्रमुख आहेत. यामध्ये ॲड. आंबेडकर हे सातत्याने भाजपच्या विरोधात राहिले आहेत. आठवले सध्या भाजपबरोबर आहेत, त्यामुळे आठवले यांनी पुढचे पंतप्रधान नरेंद्र मोदीच असतील. त्यांना पर्याय नाही, असे सांगितले. आंबेडकर यांनी मात्र मोदी कसे पंतप्रधान होऊ शकणार नाहीत, हे गणित मांडले.
या संपूर्ण कार्यक्रमात ॲड. आंबेडकर यांचे स्वागत करण्यासाठी शिवसेनेचे झाडून सगळे नेते हजर होते. त्यामुळे शिवसेना व वंचित बहुजन आघाडी एकत्र असल्याचे चित्र दिसले. दुसरीकडे आठवले यांच्यासाठी मात्र छगन भुजबळ व त्यांचे समर्थक प्रामुख्याने दिसून आले. यातून आगामी लोकसभा निवडणुकीचे चित्र कसे असेल, याचा स्पष्ट संदेश गेला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.