Maharashtra BJP proposal to Centre : अतिवृष्टीमुळे राज्यातील जवळपास 50 लाख हेक्टरपेक्षा जास्त कृषी क्षेत्र प्रभावित झाले आहे. अतिवृष्टीग्रस्तांच्या मदतीसाठी राज्यातील भाजप महायुती सरकारकडून आश्वासन दिले जात आहे.
केंद्रीय गृह तथा सहकार मंत्री अमित शहा मुंबई दौऱ्यावर असताना, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट घेऊन मदतीसाठी पत्र दिले होते. हे पत्र देताच केंद्राकडून मदत मिळणार, असे सत्ताधाऱ्यांकडून सांगितले जाऊ लागले.
परंतु आता केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी अहिल्यानगर जिल्हा दौऱ्यात राज्य सरकारने मदतीचा प्रस्ताव पाठवल्यानंतर अतिवृष्टीग्रस्तांना केंद्राकडून तातडीने मदत पाठवली जाईल, असे सांगितले.
अमित शहा यांच्या या विधानामुळे राज्य सरकारचा केंद्राकडे अतिवृष्टीग्रस्तांच्या मदतीसाठी अजूनही प्रस्ताव नसल्याचे स्पष्ट झाले. हा प्रस्ताव कधी जाणार? दिवाळीपूर्वी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळणार का? असे प्रश्न आता उपस्थित झाले आहेत.
राज्याला अतिवृष्टीचा चांगलाच तडाखा बसला आहे. मोठं नुकसान झालं आहे. एकूण नुकसानीचा आकडा अजून समोर आलेला नाही. परंतु अतिवृष्टीमुळे झालेलं नुकसान मोठं आहे. या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या (Farmer) जमिनी खरडून निघून गेल्या आहेत.
त्यामुळे पुढील तीन ते चार वर्षे शेतकरी यातून उभा राहू शकत नाही, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. यातच आता नवीन वादाला तोंड फुटले आहे. राज्यातील भाजप महायुतीने केंद्रातकडे अतिवृष्टीग्रस्तांच्या मदतीसाठी अजूनही प्रस्ताव पाठवलेला नाही. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिवाळीपूर्वी अतिवृष्टीग्रस्तांना मदत देणार, असे देत असलेल्या आश्वासनाची पूर्तता होईल का? अशी चर्चा आहे.
अतिवृष्टीचा तडाखा बसत असताना, केंद्रीय गृह तथा सहकार मंत्री अमित शहा मुंबई दौऱ्यावर होते. तिथं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांची भेट घेत, अतिवृष्टीग्रस्तांसंदर्भात निवेदन दिले होते. अतिवृष्टीमुळे महाराष्ट्रातील 50 लाख हेक्टरपेक्षा अधिक शेतीचे नुकसान झाले असून, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पुन्हा उभं करण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती विभागातून मदत मिळावी, अशी निवेदनाद्वारे मागणी केली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या या निवेदनावर काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी वाशिम दौऱ्यावर 'अर्ज नाटक', अशी टिका केली होती. "अमित शहा महाराष्ट्रात आले तेव्हा तुम्ही अर्ज देण्याचं नाटक केलं. आतापर्यंत कोणत्याही मुख्यमंत्र्यांनी, असा अर्ज दिल्याचं मी पाहिलं नाही. राज्य सरकारकडून केंद्र सरकारकडे नुकसानीचा प्रस्ताव जायला पाहिजे होता. त्यात आकडेवारी टाकायला पाहिजे होती. मात्र मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी अर्ज देऊन नाटक करत असून हे दिशाभूल करणार आहे," असा घणाघात ठाकरेंनी केला.
दरम्यान, शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी देखील दिवाळीपूर्वी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी मदत मिळाली नाही, तर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्री आणि सत्ताधारी आमदार-खासदारांची दिवाळी नीट होऊ देणार नाही, असा इशारा दिला आहे.
यातच केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी अहिल्यानगरच्या दौऱ्यात महाराष्ट्रातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या नुकसानीचा सविस्तर अहवाल राज्य सरकारने तातडीने केंद्र सरकारकडे पाठवावा. पंतप्रधान नरेंद्र मोदी शेतकऱ्यांसाठी मदत करण्याला जराही वेळ लावणार नाहीत, ते मदत जाहीर करतील, असे सांगितले.
केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या या विधानावरून नुकसानग्रस्तांच्या मदतीसाठी राज्यातील भाजप महायुती सरकारकडून अजून केंद्राला प्रस्ताव गेला नसल्याचे स्पष्ट झाले आहे. अमित शहा यांच्या विधानावरून विरोधकांना आयते कोलीत सापडले आहे.
केंद्राकडे मदतीसाठी प्रस्ताव न गेल्याने, अन् केंद्रातील अन् भाजपच्या दिग्गज नेते अमित शहा यांनी महाराष्ट्रातच हे सांगितल्याने विरोधक राज्यातील भाजप महायुती सत्ताधाऱ्यांविरोधात आक्रमक होणार, अशी चिन्हं निर्माण झाली आहेत.
राज्यातील अतिवृष्टीग्रस्तांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री सहय्यता निधीकडे मदतीचा ओघ सुरू झाला आहे. राज्यातील प्रमुख देवस्थान, संस्था, सामाजिक सेवाभावी संस्था, राजकीय संघटना, प्रशासकीय अधिकारी, शैक्षणिक संस्था अन् संघटनांनी मदतीचा हात देऊ केला आहे.
तसंच राज्य सरकारने देखील तातडीची मदत म्हणून अडीच हजार कोटी रुपयांचा निधी देखील वितरीत केला आहे. परंतु नुकसान मोठं असल्याने ते भरून काढण्यासाठी केंद्राची मदत लागणारच आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.