Nashik Niphad Politics : सर्वोच्च न्यायालयात एकीकडे शिवसेना पक्ष आणि 'धनुष्यबाण' चिन्हाच्या वादावर सध्या अंतिम सुनावणी सुरू आहे. तर दुसरीकडे दिशा सालियान मृत्यू प्रकरणात उद्धव ठाकरे यांच्यासह आदित्य ठाकरे यांचे नाव सीबीआयच्या जबाबामध्ये आले आहे. हे संपूर्ण प्रकरण राजकीय हेतूने प्रेरित असून दबावात आणण्यासाठी रचलेले षडयंत्र असल्याचा दावा उद्धव ठाकरे यांच्यासह आदित्य ठाकरे, संजय राऊत यांनी केला असून त्यांच्या आरोपांचा रोख सत्ताधारी शिंदे सेनेकडे असल्याचे दिसते.
या दोन्ही प्रकरणांमुळे दोन्ही शिवसेनेमधील वाद टोकाला पोहोचला असताना नाशिकमध्ये मात्र वेगळेच चित्र पाहायला मिळत आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी आमदार अनिल कदम यांनी शिंदेंच्या शिवसेनेचे मंत्री असलेल्या दादा भुसे यांना आपल्या ओझर येथील निवासस्थानी गणपतीची आरती करण्यासाठी निमंत्रित केलं. भुसे यांच्या हातून गणपतीची आरती झाल्यानंतर कदम यांनी त्यांचा सन्मानही केला. या भेटीचे फोटो कदम यांनी स्वतः सोशल मीडियावर शेअर केले. त्यामुळे या भेटीमागे केवळ कौटुंबिक-सामाजिक निमंत्रण आहे की कदम यांच्याकडून काही राजकीय संकेतही दिले जात आहेत, याची निफाडच्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. या भेटीविषयी अनिल कदम यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला पण त्यांनी प्रतिसाद दिला नाही.
गणेशोत्सवाच्या निमित्ताने झालेली ही सदिच्छा भेट असली तरी, दोन्ही शिवसेनांमधील संघर्ष टोकाला गेला असताना झालेल्या या भेटीमुळे राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या. अनिल कदम हे निफाडच्या राजकारणातील महत्त्वाचे नाव मानले जाते. शिवसेनेतील फुटीनंतरही कदम यांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहण्याची भूमिका घेतली. ठाकरेंकडून त्यांना विधानसभेची उमेदवारी देखील मिळाली. मात्र, राष्ट्रवादीचे दिलीप बनकर यांच्या सोबत झालेल्या सामन्यात अनिल कदम यांचा पराभव झाला. २०१९ व २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत सलग दोनवेळा पराभव झाल्याने त्यांची राजकीय वाटचाल काहीशी बॅकफूटवर आली. मात्र, आता पुन्हा एकदा राजकीय प्रवाहात सक्रिय होण्यासाठी अनिल कदम सत्ताधारी पक्षाच्या दिशेने वाटचाल करणार असल्याच्या चर्चा मतदारसंघात गेल्या काही दिवसांपासून आहेत.
विशेषत:, आगामी जिल्हापरिषद, पंचायत समिती व निफाड नगरपंचायतीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भुसे-कदम भेटीला महत्व प्राप्त झाले आहे. निफाड तालुक्याच्या राजकारणात शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेकडे सध्या तुलनेने एवढा मोठा स्थानिक चेहरा नाही. त्यादृष्टीने अनिल कदम यांच्याकडे शिवसेनेचे लक्ष असण्याची शक्यता नाकारता येत नाही.
महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये दादा भुसे हे कृषीमंत्री होते. त्यावेळी ते तालुक्यात आल्यास त्यांची गाडी नेहमी ओझरकडे कदमांच्या निवासस्थानी आवर्जून वळत असे. दोघांमध्ये चांगली मैत्री आहे. याच मैत्रीचा राजकीयदृष्ट्या उपयोग होतो का, हे आगामी काळात पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
दरम्यान, यापूर्वी कदम हे भाजपत जात असल्याच्या चर्चाही रंगल्या होत्या. गेल्या महिन्यातच नाशिकमध्ये झालेल्या भाजपच्या संघटनात्मक बैठकीच्या ठिकाणी कदम यांच्या उपस्थितीचीही चर्चा झाली होती. तेव्हा बैठकीनंतर अनिल कदम भाजपमध्ये प्रवेश करतील, अशीही चर्चा रंगली होती. मात्र, त्यावेळी आपण विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांची भेट घेण्यासाठी आलो असल्याचे त्यांनी माध्यमांना सांगितले होते. आपण उद्धव ठाकरे यांच्यासोबतच असून आपण उद्धव ठाकरे यांच्यासोबतच आहोत आणि त्यांच्यासोबतच एकनिष्ठ राहणार असही त्यांनी स्पष्ट केलं होतं.
एकंदरीतच गेल्या काही महिन्यांपासून सुरु असलेल्या घडामोडी पाहाता कदमांचे कदम नवी राजकीय दिशा चाचपडत असल्याच्या चर्चा निफाडच्या राजकीय वर्तुळात सुरु आहेत. त्यामुळे ‘कदमांच्या कदमांना’ नेमकी कोणती राजकीय दिशा मिळणार, याचे उत्तर त्यांच्या पुढील भूमिकेतूनच स्पष्ट होणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.