Radhakrishna Vikhe Vs Nilesh Lanke  Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Radhakrishna Vikhe Vs Nilesh Lanke : मंत्री विखेंच्या दिशाभूल राजकारणचं खासदार लंकेंनी सर्वच काढलं

Pradeep Pendhare

Ahmednagar News : खासदार नीलेश लंके यांनी भाजप नेते पालकमंत्री राधाकृष्ण विखेंना पुन्हा घेरलं. नगर-राहुरी-मनमाड रस्त्याच्या दुरुस्तीबाबत पालकमंत्री विखे दिशाभूल करत असून, आपलेच घोडे पुढे दामटत आहे, असा घाणाघात केला. आपण मंजूर करून आणलेल्या सुमारे 9 कोटी रुपये निधीतूनच नगर-मनमाड रस्त्याची दुरुस्ती होणार असल्याचा दावाही खासदार लंके यांनी केला.

दरम्यान, मुळा प्रकल्प आणि उजवा कालवा दुरुस्तीसाठी आपण मंजूर करवून आणलेला दीडशे कोटींचा निधी पालकमंत्र्यांनी दारणा प्रकल्पासाठी वर्ग केल्याचा आरोपही खासदार लंके यांनी केला.

नगर-राहुरी-मनमाड रस्त्याच्या दुरुस्तीवरून सध्या पालकमंत्री विखे आणि खासदार लंके यांच्यात वाद सुरू आहेत. पालकमंत्री विखेंनी दोन दिवसांपूर्वी बैठक घेऊन राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या माध्यमातून या रस्त्याच्या दुरुस्तीचे आदेश दिलेत. तशी जिल्हाधिकार्‍यांवर त्याची जबाबदारी सोपवली आहे. तर दुसरीकडे खासदार लंके यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्याकडून रस्त्याच्या दुरुस्तीसाठी 8 कोटी 85 लाख रुपये मंजूर झाल्याचा दावा केला गेला. या पार्श्वभूमीवर, खासदार लंके यांनी गुरूवारी रात्री माध्यमांशी संवाद साधताना मंत्री विखेंवर टीका केली. यावेळी माजी महापौर अभिषेक कळमकर, युवा सेना राज्य सहसचिव विक्रम राठोड, माजी विरोधी पक्ष नेते बाळासाहेब बोराटे, गिरीश जाधव, प्रदीप परदेशी उपस्थित होते.

"नगर-मनमाड व नगर-पाथर्डी या रस्त्यांच्या कामासाठी 5 डिसेंबर 2022 रोजी उपोषण केल्यावर नगर-पाथर्डी रस्त्याचे काम आपण करवून घेतले, असे स्पष्ट करत नगर-राहुरी-मनमाड रस्ता राष्ट्रीय महामार्गावरून मंत्री राधाकृष्ण विखे (Radhakrishna Vikhe) व त्यांचे चिरंजीव यांच्यावर निशाणा साधला. हा रस्ता मंत्री विखे आणि त्यांचे पुत्र माजी खासदार सुजय विखे यांनी करवून घेणे अपेक्षित होते", असा खासदार लंके यांनी म्हटले.

खंडणीचे नुसते आरोप

"सहा वर्षांपासून रस्ता खोदून ठेवला. ठेकेदाराकडे खंडणी मागितली जात असल्याचा आरोपही, त्यावेळी त्यांनी केला होता. मात्र, हा रस्ता मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेचा नव्हता. आमदार म्हणून आमचा त्याच्याशी संबंध नव्हता. तरीही मतदार संघातून जात असल्याने या रस्त्याचा संबंध असलेल्या मी आणि प्राजक्त तनपुरे आम्ही पैसे मागितल्याचा आरोप खरा ठरला, तर आमदारकीचे राजीनामे देतो, असे आव्हान दिले होते. पण त्यावर पिता-पुत्रांनी काहीच उत्तर दिले नाही, असा दावा खासदार लंके यांनी केला. पालकमंत्र्यांनी बैठक घेतली असली तरी इतक्या दिवस काय केले हा सवाल आहे. नुसता ड्रामा सुरू आहे. या रस्त्याच्या कामासाठी त्यांनी पाठपुरावा केल्याचे एक तरी पत्र दाखवा", असे आव्हानही खासदार लंके यांनी दिले.

पहिले काम केले

4 जूनला खासदार म्हणून निवडून आल्यावर 22 जूनला केंद्रीय मंत्री गडकरींना दिल्लीत भेटलो आणि नगर-राहुरीचे काम करणार्‍या ठेकेदाराला ब्लॅकलिस्ट करा आणि या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी निधी देण्याची मागणी केली. त्यानंतर त्यांनी 10 जुलैला रस्ता दुरुस्तीसाठी 8 कोटी 85 लाख रुपये मंजूर केले आणि वाशी येथील जयहिंद रोड बिल्डर्स ही ठेकेदार कंपनीही या कामासाठी नेमल्याचे सांगत या रस्त्याचे काम करणार्‍या मनीषा कन्स्ट्रक्शन्स या छत्रपती संभाजीनगरच्या ठेकेदार कंपनीला ब्लॅकलिस्ट करण्यात आल्याचे पत्रही 23 जुलैला गडकरींच्या पीएने मला पाठवले आहे, असे खासदार नीलेश लंके यांनी सांगितले.

विखेंची फक्त पब्लिसिटी

पण पालकमंत्र्यांकडून 8 दिवसांपासून यावर राजकारण सुरू आहे. आंदोलनाच्या बातम्या पेरल्या जात आहेत. कृती समितीच्या बैठका लावण्याबाबत दुमत नाही. पण पाठपुरावा काय केला, हे सांगत नाहीत आणि फक्त पब्लिसिटी सुरू आहे. निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राजकारण करणे चुकीचे आहे, असा घाणाघात खासदार लंके यांनी मंत्री विखेंविरुद्ध केला.

रस्ता सिमेंट काँक्रिटीकरणाचा आग्रह

ते जर कार्यक्षम होते, तर याआधीच त्यांनी हे काम करून घ्यायला हवे होते. पाथर्डी रस्त्याचे काम जसे मी करवून घेतले, तसे त्यांनी राहुरी रस्त्याचे करायला हवे होते. पण 5 वर्षात काही केले नाही व आता दुसर्‍याचे श्रेय घेण्यात काय अर्थ आहे, असा सवाल खासदार लंके यांनी केला. पालकमंत्र्यांनी दिलेले दुरुस्तीचे आदेश आणि त्यासाठीचा निधी यावर त्यांचे भाष्य नाही. बीपीसीएल आणि रिलायन्स कंपन्यांच्या निधीतून हे काम होणार नाही, तर आपण गडकरींकडून मंजूर करून आणलेल्या 9 कोटीतूनच या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम होणार आहे, असा दावाही खासदार लंके यांनी केला. दरम्यान, या रस्त्याच्या कामाची नव्याने निविदा काढताना हा रस्ता सिमेंट काँक्रिटीकरणाचा आग्रहही मंत्री गडकरींकडे धरला असल्याचेही त्यांनी आवर्जून स्पष्ट केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT