Shivaji Kardile and District Central Cooperative Bank
Shivaji Kardile and District Central Cooperative Bank  Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Ahmednagar : नगर जिल्हा सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी निवड होताच कर्डिलेंनी सांगितलं विजयाचं गणित

सरकारनामा ब्यूरो

Shivaji Kardile : अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी भाजपचे माजी आमदार शिवाजी कर्डिले यांची निवड झाली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीला पुन्हा एकदा मोठा धक्का बसला आहे.

अहमदनगर नगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा नवा अध्यक्ष कोण होणार? याकडे गेल्या काही दिवसांपासून सर्वांचे लक्ष लागले होते. तसेच या अध्यक्ष निवडीबाबत गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात राजकीय हालचालींना वेग आला होता.

अखेर आज अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदाच्या निवडीसाठी मतदान पार पडले. यामध्ये कर्डिलेंना दहा मतं तर राष्ट्रवादीचे माजी आमदार चंद्रशेखर घुले यांना नऊ मतं मिळाली. त्यामुळे कर्डिले हे विजयी झाले.

दरम्यान, अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष उदय शेळके यांचे काही दिवसांपूर्वी निधन झाले. त्यामुळे त्यांच्या अध्यक्षपदाची जागा रिक्त झाली होती. या रिक्त जागेवर आता कर्डिलेंची निवड झाली आहे.

जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर कर्डिले यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. कर्डिले म्हणाले, ''निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.

त्यामध्ये मला 10 मतं मिळाली. तर 9 मतं माजी आमदार चंद्रशेखर घुले यांना मिळाली. तर एक मत बाद झालं. त्यामुळे एक मताने या निवडणुकीत माझा विजय झाला''.

''जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी (दि.7 मार्च) व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे बैठक घेतली होती. यावेळी या बैठकीत फडणवीसांनी जिल्हा बँक भाजपच्या ताब्यात येण्यासाठी सूचना दिल्या होत्या. त्यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवडणूक आम्ही लढलो आणि निवडूनही आलो''.

''याबरोबरच मला दिलेल्या सर्व मतदारांचे आभार. आता माझ्यावर मोठी जबाबदारी पडली आहे. कारण गेल्या 15 वर्षापासून मी संचालक म्हणून काम पाहत होतो. आता अध्यक्षपदी निवड झाली आहे'', असं म्हणत त्यांनी त्यांच्या विजयाचे एकप्रकारे गणितच सांगितले आहे.

तसेच त्यांनी यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, खासदार सुजय विखे पाटील यांच्यासह भाजप पदाधिकाऱ्यांचेही आभार मानले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT