Ashok Gaikwad press conference collapse : आरक्षण उपवर्गीकरणाच्या विरोधात जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा काढला जाणार होता.
त्याच्या नियोजनासंदर्भात माहिती देण्यासाठी श्रीरामपूर येथील शासकीय विश्रामगृहावर अशोक गायकवाड यांनी पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. तिथेच ते कोसळले अन् अखेरचा 'जय भीम' केला.
आंबेडकर, दलित पँथर, दलित चळवळीतील ज्येष्ठ नेते अशोक रामचंद्र गायकवाड (वय 72) यांचे अहिल्यानगर येथे निधन झाले. याचबरोबर अहिल्यानगर (Ahilyanagar) जिल्ह्यातील आंबेडकर आणि दलित चळवळीतील मोठा चेहरा काळाच्या पडद्याआड केला. अशोक गायकवाड दलित, कष्टकऱ्यांसाठी अखेरच्या क्षणापर्यंत लढताना अखेरचा श्वास घेतल्याने अनेकांच्या मनाला चटका लावून गेली.
अशोक गायकवाड यांचा राजकीय संघर्ष मोठा होता. राजकीय प्रवास करताना, त्यांनी पक्षीय राजकारण करताना, अनेक प्रस्थापितांशी संघर्ष केला. त्यांचे मूळ गाव पाथर्डी (Pathardi) तालुक्यातील कवडगाव असून त्यांचे आजोळ नेवासा तालुक्यातील आहे. चांद्यात प्राथमिक तर सोनई येथे त्यांचे माध्यमिक शिक्षण झाले. महाविद्यालयीन शिक्षण घेताना त्यांनी शैक्षणिक प्रश्नांसाठी कधी उपोषण, मोर्चा व रास्ता रोको आंदोलन केले.
राजा ढाले व नामदेव ढसाळ यांच्याशी संपर्क येताच, ते आक्रमक दलित पँथरशी जोडले गेले. तिथे त्यांनी अनेक जबाबदाऱ्या सांभाळल्या. आंदोलनातून प्रस्थापितांशी संघर्ष करताना, अनेकवेळा पोलिस कारवायांना समोरे गेले. पुढे पक्ष फुटल्यावर त्यांनी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या रिपब्लिकन पक्षात प्रवेश करत राज्यभर दौरे केले.
या काळात त्यांचे दिवंगत पतंप्रधान राजीव गांधी तसेच राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याबरोबर संपर्क आला. त्यांच्यात नंतर चांगले ऋणानुबंध निर्माण झाले. ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांच्याशीही त्यांचे घनिष्ठ संबंध होते. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी ते सामाजिक, राजकीय प्रश्नांवर सतत संपर्कात असायचे. पुढे मुळा साखर कारखान्याचे संचालकपदही त्यांनी भूषविले.
सध्या राज्यात आरक्षण उपवर्गीकरणाचा प्रश्न गाजतो आहे. राज्यभरात आंदोलन सुरू आहे. अहिल्यानगरमध्ये याविरोधात जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा काढण्याची तयारीला अशोक गायकवाड यांनी स्वतः ला झोकून दिले आहे. विशेष म्हणजे, ते महायुती सत्तेतील अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असताना, त्यांनी या आंदोलनाची तयारी सुरू केली होती.
या आंदोलनाच्या नियोजनासंदर्भातील माहिती देण्यासाठी काल ते अहिल्यानगर शहरातून श्रीरामपूर येथील शासकीय विश्रामगृहावर आयोजित पत्रकार परिषदेसाठी आले होते. आरक्षण उपवर्गीकरणाच्या संदर्भातील माहिती देत असताना त्यांना अचानक त्रास सुरू झाला. यावेळी उपस्थित असलेले माजी आमदार भाऊसाहेब कांबळे, रिपाइंचे सुरेंद्र थोरात, सुभाष त्रिभुवन, चरण त्रिभुवन, संदीप मगर, नाना गायकवाड, विशाल सुरडकर, संतोष मोकळ आणि पत्रकारांना त्यांना नेमके काय त्रास होतोय हे समजत नव्हते.
पत्रकार परिषदेत त्यांना बोलताच येईना, एक हात व पायाने संवेदना सोडून दिल्याचे लक्षात येताच उपस्थितांनी रुग्णालयात हलवले. माजी आमदार कांबळे यांनी आपल्या वाहनातून प्रथम श्रीरामपूर शहरातील शिरसाट हॉस्पिटल व तेथून पुढे प्रवरा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी हलविले. तेथे उपचार केल्यानंतर त्यांना अहिल्यानगर येथील खासगी रुग्णालयात हलविले होते. याचदरम्यान, अशोक गायकवाड यांनी अखेरचा 'जय भीम' केला.
अशोक गायकवाड यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, दोन मुली असा परिवार आहे. सोमवारी (ता. 3) दुपारी 12 वाजता त्यांच्यावर अहिल्यानगर शहरातील नालेगाव अमरधाममध्ये अंत्यसंस्कार होणार आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.