

Pune Nashik Direct Railway Project : पुणे-नाशिक सरळ रेल्वे प्रकल्पाबाबत केंद्र सरकारने सकारात्मक निर्णय घ्यावा, या मागणीसाठी पुणे-नाशिक महामार्गावर ठिकठिकाणी चक्काजाम आंदोलन करण्यात येणार आहे.
क्रांतीदिनी म्हणजे 9 ऑगस्टला सकाळी 9 वाजता हे जनआंदोलन करणार असल्याची माहिती आमदार सत्यजित तांबे यांनी दिली.
सत्यजीत तांबे (Satyajeet Tambe) यांनी रेल्वे प्रकल्पाच्या भवितव्याबाबत चिंता व्यक्त करत, हा मार्ग या भागातून गेला नाही तर पुढील अनेक पिढ्यांसाठी विकासाची मोठी संधी हुकू शकते, असे मत व्यक्त केले. रेल्वेसारखे पायाभूत प्रकल्प वारंवार मंजूर होत नसल्याने हा निर्णय संपूर्ण उत्तर पुणे आणि अहिल्यानगर-नाशिक पट्ट्यासाठी महत्त्वाचा ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले.
त्यांच्या मते, प्रकल्पाबाबत केंद्र सरकारकडून (Central Government) वेगवेगळे संकेत मिळत असले, तरी स्थानिक नागरिकांची मागणी कायम आहे. त्यामुळे आर्थिक गणितापेक्षा जनहिताला प्राधान्य देऊन सरकारने या रेल्वेमार्गासाठी प्रयत्न करावे, अशी मागणी त्यांनी केली.
पुणे-नाशिक महामार्गावरील वाढता वाहतूक कोंडीचा प्रश्नही त्यांनी अधोरेखित केला. सध्या दोन ते अडीच तासांचा प्रवास अनेकदा सहा तासांपर्यंत लांबत जातो. खराब रस्ते आणि वाढती वाहतूक यामुळे प्रवाशांना मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागतो, असे ते म्हणाले.
सिन्नर, संगमनेर, जुन्नर, नारायणगाव, मंचर, चाकण आणि खेड या भागांतील अनेक विद्यार्थी, नोकरदार आणि व्यावसायिक रोज पुणे-नाशिकदरम्यान प्रवास करतात. सरळ रेल्वेमार्ग झाल्यास या संपूर्ण पट्ट्यातील वाहतुकीचा ताण कमी होऊन उद्योग, शिक्षण आणि रोजगाराला चालना मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
सर्वांसाठी सोयीस्कर अशा पुणे-नाशिक रेल्वेमार्गाच्या मंजुरीसाठी नागरिकांनी देखील आंदोलनात सहभागी व्हावे. महामार्गावर शक्य असेल तिथे थांबून चक्काजाम आंदोलन करावे, असे आवाहन तांबे यांनी केले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.