Ashok Kharat Wife : भोंदू अशोक खरातची पत्नी कल्पना खरात गेल्या तीन महिन्यांपासून फरार आहे. तिला शोधण्यात आजूनही पोलिसांना यश आलेलं नाही. तीन महिने होऊनही ती पोलिसांना सापडत नाही हे खरे तर आश्चर्य असून पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह निर्माण करणारं आहे.
आता, दैवीशक्तीचा धाक दाखवून जमीन हडप केल्याच्या प्रकरणात सिन्नर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या फसवणुकीच्या गुन्ह्यात कल्पना खरातला नाशिकरोड अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्यायाधीश केदार कोपळकर यांनी सशर्त अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. . न्यायालयाने कल्पना खरातला 1 लाख रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर आणि तितक्याच रकमेचा जामीनदार सादर करण्याच्या अटीवर हा जामीन दिला.
मात्र, कल्पना खरातला एका गुन्ह्यात दिलासा मिळाला असला तरी दुसऱ्या गुन्ह्यात अटकेची तलवार कायम आहे. शिर्डी येथील भूखंड बळकावल्याप्रकरणी उच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर कल्पना खरातने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्यामुळे या गुन्ह्यातील न्यायालयीन निर्णयावर तिच्या अटकेचे भवितव्य अवलंबून आहे. या गुन्ह्यात आजूनही तिच्यावर अटकेची टांगती तलवार कायम आहे.
अशोक खरातने शिर्डी परिसरात एका शेतकऱ्याची कोट्यवधींची जमीन फसवणूक आणि बेकायदेशीर सावकारकीच्या माध्यमातून बळकावली. प्रकरणात अशोक खरात याच्यासह त्याची पत्नी कल्पना खरात आणि इतर तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शिर्डी येथील प्रकरणात कल्पना खरातचा अटकपूर्व जामीन अर्ज उच्च न्यायालयाने यापूर्वी फेटाळला होता. त्यानंतर तिने सर्वोच्च न्यायालयात धाव घेत जामिनासाठी अर्ज दाखल केला आहे. हा गुन्हा दाखल झाल्यापासून कल्पना खरात फरार आहे. तीन महिन्यांपासून ती पोलिसांना गुंगारा देत असून नाशिक ग्रामीण पोलिसांसह शिर्डी पोलिस ठाण्याचे विशेष पथक तिचा शोध घेत आहे. सर्वोच्च न्यायालयानेही जामीन अर्ज फेटाळल्यास तिला पोलिसांसमोर शरण यावे लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
ज्या गुन्ह्यात जामीन मिळाला ते प्रकरण काय?
सिन्नर पोलिस ठाण्यात शिवराम माळी यांच्या फिर्यादीनुसार अशोक खरातसह त्याची कल्पना खरात यांच्याविरुद्ध १६.५० एकर जमीन हडपल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. न्यायाधीश केदार जोगळेकर यांनी या प्रकरणाची सुनावणी करताना संबंधित व्यवहार २००४ मधील असून, तक्रार तब्बल २२ वर्षांनी दाखल झाल्याची नोंद घेतली.
या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान न्यायालयाने महत्वपूर्ण निरीक्षणे नोंदवली. एवढ्या कालावधीत व्यवहार रद्द करण्यासाठी, पैशांच्या वसुलीसाठी किंवा जमिनीचा ताबा मिळविण्यासाठी कोणतीही दिवाणी कार्यवाही केलेली नसल्याचे न्यायालयाने नमूद केलं.
संबंधित सिन्नर येथील व्यवहार नोंदणीकृत दस्तावेजाद्वारे झाल्याचे न्यायालयाने स्पष्ट केलं. कल्पना खरात यांनी या व्यवहारात सहभाग घेतल्याचा, फिर्यादींना धमकावल्याचा किंवा फसवणुकीचा कट रचल्याचा कोणताही ठोस पुरावा तपासात समोर आलेला नसल्याचे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले.
त्यामुळे हा वाद प्रामुख्याने दिवाणी स्वरूपाचा असल्याचे नमूद करीत न्यायालयाने त्यांना एक लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर सशर्त अटकपूर्व जामीन मंजूर केला. त्यामुळे कल्पना खरातला सिन्नरच्या प्रकरणात दिलासा मिळाला असला, तरी शिर्डी भूखंड प्रकरणातील सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाकडे तपास यंत्रणा आणि सर्वांचे लक्ष लागले आहे. तिचा पती अशोक खरात हा १८ मार्चपासून कारागृहात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.