Ajit Pawar News: विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मालेगाव मध्य मतदारसंघात राजकीय हालचालींना गती आली आहे. या संदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माजी आमदार असिफ शेख यांना गोंजारण्याचा प्रयत्न करीत उमेदवारीची ऑफर दिल्याचे बोलले जाते.
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे उपमुख्यमंत्री पवार यांची जन सन्मान यात्रा सध्या जोरात सुरू आहे. या अनुषंगाने त्यांनी मालेगाव मध्य मतदारसंघ आपल्याकडे खेचण्यासाठी मोठा राजकीय डाव टाकण्याचा प्रयत्न केला. मात्र तो यशस्वी होऊ शकला नाही.
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते आणि पूर्वाश्रमीचे काँग्रेसचे माजी आमदार आसिफ शेख यांची त्यांनी भेट घेतली. माजी आमदार रशीद शेख यांचे नुकतेच निधन झाल्याने ही सांत्वन पर भेट होती. मात्र त्यात राजकीय चर्चा झालीच, असा दावा निकटवर्तीयांनी केला.
या मतदारसंघातून माजी आमदार शेख हे अपक्ष उमेदवारी करणार आहेत. त्यांनी नुकताच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे माजी आमदार शेख हे अजित पवार गटात आल्यास मालेगाव मध्य हा मतदारसंघ आपोआपच पवार गटाला मिळेल. अशी राजकीय मांडणी होती.
याबाबत उपमुख्यमंत्री पवार यांनी आसिफ शेख यांना विविध पर्याय देत पक्षाचा उमेदवार होण्यासाठी विनंती केल्याचे बोलले जाते. त्याला उपमुख्यमंत्री पवार पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी स्पष्टपणे होकार दिला नाही. मात्र ही बैठक झाल्यावर माजी आमदार असिफ शेख यांनी आपण अपक्ष उमेदवारी करणार आहोत, असे जाहीर केले.
माजी आमदार शेख यांच्या या घोषणेमुळे आपोआपच मालेगाव मध्य मतदारसंघाच्या राजकारणात महायुतीचा चंचू प्रवेश थांबला आहे.या मतदारसंघावर महायुतीच्या नेकत्यांच्या नजरा आहेत.
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत शहरातील सर्व पक्ष आणि सर्व नेत्यांनी मिळून भारतीय जनता पक्षाचा पराभव करण्याचा चंग बांधला होता. या मतदारसंघात दोन लाख आठ हजार मतदान झाले. त्यातील एक लाख ९८ हजार मतदान काँग्रेस पक्षाला मिळाले.
भारतीय जनता पक्ष आणि महायुतीचे घटक पक्ष यांचा मालेगाव मतदारसंघात निभाव लागणे किती कठीण आहे, हे स्पष्ट होते. मालेगाव शहरात सध्या एमआयएम पक्षाचे मौलाना मुक्ती इस्माईल हे आमदार आहेत. ते पुन्हा एकदा निवडणुकीची तयारी करीत आहेत.
आमदार मौताना मुफ्ती काँग्रेस पक्षात प्रवेश करण्याची शक्यता देखील बोलली जाते. त्याला अद्याप कोणताही दुजोरा मिळालेला नाही. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत अपक्ष माजी आमदार असिफ शेख आणि एमआयएम चे आमदार मौलाना मुफ्ती अशी लढत होणार हे स्पष्ट आहे.
उपमुख्यमंत्री पवार यांनी राजकीय खेळी करून हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाला मिळावा, असा डाव टाकला. मात्र तो सध्या तरी यशस्वी झाला नाही, असेच म्हणावे लागेल.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.