Ahilyanagar News : भाजपचे माजी खासदार सुजय विखे यांचे समर्थक वसंतराव देशमुख यांनी जयश्री थोरातांवर केलेल्या आक्षेपार्ह विधानानंतर संगमनेरच्या धांदरफळमध्ये त्याचा उद्रेक झाला. बाळासाहेब थोरात आणि काँग्रेस समर्थकांनी सभा उधळली.
संगमनेर शहरात त्याचे पडसाद उमटले. काही ठिकाणी हिंसाचाराच्या घटना झाल्या. वाहनांची तोडफोड तसंच ती जाळण्यात आली. आज संगमनेरमधील काही गावांमध्ये आक्षेपार्ह विधानाच्या निषेधार्थ बंद पुकारण्यात आला आहे. या सर्व घडामोडीवर भाजपचे माजी खासदार सुजय विखे यांनी गंभीर आरोप केला आहे.
माजी खासदार सुजय विखे (Sujay Vikhe) यांनी संगमनेरमध्ये मला मारण्याचा प्लान होता. हा सर्व प्लान पूर्वनियोजित झाला होता. त्यामुळे या सर्व प्रकाराची पोलिस प्रशासनाने सखोल चौकशी केली पाहिजे. तसंच निवडणूक आयोगाला पत्र लिहून संगमनेरमधील निवडणुकीवर मार्गदर्शन मागवणार आहोत, असे सुजय विखेंनी सांगितले.
सुजय विखे म्हणाले, "धांदरफळमधील सभेत झालेल्या वक्तव्याचा सुरवातीलाच निषेध करतो. यामध्ये ते जे व्यक्ती आहेत, ते स्थानिक असल्याने त्यांना व्यासपीठावर बोलवलं होते. परंतु ते महायुतीतील कोणत्याही घटक पक्षाचे नाहीत. स्थानिक लोकप्रतिनिधींच्या विरोधातील ते कार्यकर्ते होते. स्थानिक असल्या कारणाने ते स्टेटवर आले. त्यांना भाषणाला कोणीही उठवलं नव्हते. त्यांनी स्वतःहून भाषण केले. भाषण करताना, टीका करताना, त्यांना अनेकांनी थांबवण्याचा प्रयत्न केला. पण ते थांबले नाहीत. आणि दुर्दैवाने असे विधान वापरले गेले, ते वापरले नव्हते पाहिजे". महायुतीकडून (Mahayuti) कोणीही खालच्या पातळीची टीका स्वीकार करत नाहीत. आम्ही पोलिस प्रशासनाला कारवाई करत असेल, त्यांना संपूर्ण सहकार्य राहणार आहोत, असेही सुजय विखे यांनी म्हटले.
या विधानानंतर उफाळेल्या हिंसाचाराकडे सुजय विखे यांनी लक्ष वेधत गंभीर आरोप केले. ते म्हणाले, "या विधानानंतर 15 मिनिटानंतर त्या गावातून बाहेर पडण्याच्या प्रत्येक मार्गावर 100 ते 150 जणांचा जमाव उभा होता. पेट्रोल, राॅकेल, दगड फेकून गाड्या फोडल्या, जाळल्या गेल्या, महिलांना गाड्यातून खेचले गेले. पूर्वनियोजित कटाने मला मारण्याचा प्लान होता". या सभास्थळातून जात असताना, त्यांच्याच (थोरात यंत्रणा) यंत्रणेतून मला फोन आला, मला अलर्ट केले आणि सभा स्थळावरून दुसऱ्या मार्गाने जाण्याचा सल्ला दिला गेला, असा गौप्यस्फोट देखील सुजय विखेंनी केला.
"माझ्यावरचा हल्ला माझ्या कार्यकर्त्यांनी अंगावर घेतला. विधान करणाऱ्याला काहीच करा, अटक करा, कारवाई करा, याबाबत आमचे काहीही म्हणणे नाही. सर्वसामान्यांन महिलांना वाहनातून बाहेर ओढता, त्यांना मारता, हे संगमनेरचे खरं चित्र महाराष्ट्रासमोर आलं आहे. याबाबत निवडणूक आयोगाकडे संगमनेरच्या निवडणुकीबाबत कायदेशीर मार्गदर्शन घेणार आहोत. माझ्याकडे सर्व चित्रीकरण आहे. स्थानिक आमदारांचे कार्यकर्ते, पदाधिकारी यात दिसत आहेत. संगमनेर विधानसभेची निवडणुकीवर आयोगाचे त्यांच्या नियंत्रणाखाली घ्यावी, अशी मागणी करणार आहोत", असेही सुजय विखे यांनी म्हटले.
संगमनेर पोलिसांनी या घटनेनंतर वेगवेगळ्या प्रकारचे चार गुन्हे दाखल झाले. यावर बोलताना सुजय विखे म्हणाले, "गुन्हे काय दाखल झाले आहेत, हे मला माहीत नाही. सभास्थळावरून कार्यकर्ते घरी सुखरूप पोचेपर्यंत मी कार्यकर्त्यांच्या संपर्कात होतो. काही कार्यकर्ते ऊसात लपले होते. त्यांना माझे वाहन पहाटे तीन वाजता पाठवून घरी पोचवले. त्यांचे सर्व कार्यकर्ते दारू पिऊन होते. कोणच्या घरी जाऊन कोणाला मारणार होते, याची देखील मला खबर मिळाली होती. त्यांना फोन लावून माहिती देत दुसऱ्या ठिकाणी सुखरूप पोचवले. संगमनेरमधून महाराष्ट्राचे नेतृत्व करणाऱ्यांचा खरा चेहरा आता संपूर्ण महाराष्ट्राला कळाला."
संकल्प सभा सुरूच राहणार, जनतेचा आवाज उठवत राहणार. परंतु सभेपूर्वी जे आरोपी आहेत. त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. काँग्रेसचे माजी आमदार सुधीर तांबे यांनी पोलिस तक्रार घेत नाही, या आरोप सुजय विखेंनी खोडून काढला. "मी पोलिसांना फोन लावून कारवाईची मागणी केली. पोलिसांनी मला नाही सांगितले, मी त्यांना फोन केला होता. कारवाई झालीच पाहिजे, अशी मागणी होती. गुन्हा दाखल केला गेलाय, पोलिस त्यांना शोधतील, कारवाई करतील. दुसरा पैलू आहे, त्यावर पोलिस काय कारवाई करणार याकडे लक्ष लागले आहे. हा वाद कोणी सुरू केला, याचा विचार करायलाच हवा. माझ्याविषयी आणि साहेबांविषयी आक्षेपार्ह बोलल्यावर योग्य ते उत्तर दिलं जाईल", अशा इशारा सुजय विखेंनी दिला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.