Ahilyanagar News : भाजपचे माजी खासदार सुजय विखे यांच्या संगमनेरच्या धांदरफळ सभेत त्यांचे समर्थक वसंतराव देशमुख यांनी ज्येष्ठ नेते माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांची धाकटी कन्या जयश्री थोरातांवर आक्षेपार्ह विधान केले.
या विधानानंतर संगमनेरमधील थोरात आणि काँग्रेस समर्थक चांगलेच आक्रमक झाले असून, बहिणीसाठी आमदार डाॅ. सत्यजित तांबे देखील मैदानात उतरले आहेत. आमदार तांबे यांनी विधानावर संताप व्यक्त करताना सुजय विखे यांना चांगलेच सुनावले आहे.
आमदार सत्यजित तांबे यांनी या विधानानंतर भाजपचे (BJP) सुजय विखेंना सुनावणारी पोस्ट समाज माध्यमांवर शेअर केली आहे. 'सुजय विखे यांनी संगमनेरच्या विधानसभेच्या निमित्ताने राजकारणाची घाणेरडी पातळी गाठली आहे', असा संताप आमदार तांबे यांनी व्यक्त केला. सुजय विखे यांच्या उपस्थितीत त्यांचे सर्वात जुने, सगळ्यात जवळचे व तालुक्यातील सगळ्यात मुर्ख म्हणून ओळखले जाणारे वसंत देशमुख यांनी आमची बहीण डाॅ. जयश्री थोरात हिच्यावर टीका करताना जी पातळी सोडली, ती त्यांची खरी संस्कृती आहे, असे देखील सत्यजित तांबेंनी सुनावले आहे.
सत्यजित तांबे यांनी वाचाळवीर वसंत देशमुखांना आजोबा स्वातंत्र्य सेनानी भाऊसाहेब थोरात यांनी कसा सरळ केला होता, याची आठवण करून देखील सुजय विखेंना करून दिली. आता परत वेळ आली आहे, अशी नीच लोकांना त्यांची जागा दाखवायची, असे सांगून लवकरच यावर सविस्तर भाष्य करण्याचा इशारा आमदार सत्यजित तांबे यांनी दिला.
जयश्री थोरातांवर वसंत देशमुख यांनी सुजय विखे यांच्या उपस्थित विधान केल्यानंतर संगमनेरमध्ये त्याचा उद्रेक झाला. सभास्थळी थोरात आणि काँग्रेसचे कार्यकर्ते येत, तिथं सभा उधळून लावली. महिलांनी स्टेजचा ताबा घेत, तिथं विखे समर्थकांशी भिडले. यानंतर विखे समर्थकांनी सभास्थळ सोडून दिले.
सभास्थळावरील विखेंचे पोस्टर फाडले, तसंच काळं देखील फासलं. याचे पडसाद संगमनेर शहरात देखील उमटले. संगमनेर शहारातील अकोले नाक्यावर विखे समर्थकांच्या वाहनांना टार्गेट करण्यात आले. तिथं जाळपोळ झाली. काही ठिकाणी तणावाचे वातावरण होते. थोरात आणि काँग्रेस कार्यकर्त्यांनी संगमनेर पोलिस ठाण्यात धाव घेत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. माजी आमदार डाॅ. सुधीर तांबे, माजी नगराध्यक्ष दुर्गा तांबे यावेळी चांगल्याच आक्रमक झाल्या होत्या.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.