Satyajeet Tambe Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Satyajeet Tambe And Devendra Fadnavis : फडणवीस-तांबेंची खरंच भेट झाली का? 'सरकारनामा'च्या हाती मोठी माहिती

MLA Satyajeet Tambe met BJP leader Devendra Fadnavis : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात यांचे भाचे, नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे यांनी भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्या 'सागर' बंगल्यावर हजेरी लावली.

Pradeep Pendhare

Mumbai News : विधानसभा निवडणुकीत राजकीय भेटी-गाठींना महत्त्व आलंय. भाजपने पहिली निवडणूक यादी जाहीर केल्यापासून नाराजांची संख्या वाढली आहे. त्यामुळे भाजप नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बंगल्यावर नाराजांच्या भेटीची रिघ लागली आहे.

यातच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांचे भाचे, नाशिक पदवीधर मतदार संघातील अपक्ष आमदार सत्यजीत तांबे यांनी 'सागर' बंगल्यावर हजेरी लावली. तांबे यांची ही कृती, माध्यमांमध्ये झळकताच, राजकीय प्रतिक्रिया उमटल्या. या भेटीबाबत सत्यजीत तांबे यांनी 'सरकारनामा'शी बोलताना माहिती दिली.

सत्यजीत तांबे म्हणाले, "मी 'सागर' बंगल्यावर गेलो होतो. तिथं तीन मिनिटं होतो. खूप गर्दी होती. माझ्याकडे भंडारदरा संदर्भातील महत्त्वपूर्ण होती. ती फाईल घेऊन गेलो होतो. गर्दीमुळे फडणवीससाहेबांशी (Devendra Fadnavis) भेट झाली नाही. पण काम महत्त्वाचे होते, त्यामुळे ती फाईल 'पीए'कडे दिली. ही सर्व घडामोड तीन मिनिटांत झाली". यात कोणती भेट होणार? त्यामुळे फडणवीससाहेबांची भेटच झाली नाही, असा दावा सत्यजीत तांबे यांनी 'सरकारनामा'शी बोलताना केली.

विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू असताना सत्यजीत तांबे यांनी 'सागर' बंगल्यावर हजेरी लावल्याने चर्चेला उधाण आले. या भेटीवर राजकीय विश्लेषकांनी सत्यजीत तांबे यांच्या भेटीची टायमिंग चुकल्याचं निरीक्षण नोंदवलं आहे. संगमनेर मतदार संघात सध्या थोरात-विखे यांचा राजकीय संघर्ष पेटला आहे. हा संघर्ष पुढच्या पिढीपर्यंत आला आहे. जयश्री थोरात आणि माजी खासदार सुजय विखे यांच्या शाब्दिक वाॅर रंगला आहे. यातच सत्यजीत तांबे यांनी फडणवीससाहेबांची भेट घेतल्याने वेगळीच चर्चां सुरू झाल्या.

जुन्या आठवणींना उजाळा

नाशिक पदवीधर मतदार संघातील निवडणुकीवेळी बराच राजकीय संघर्ष सत्यजीत तांबे यांना करावा लागला. काँग्रेसने (Congress) सत्यजीत यांचे वडील डाॅ. सुधीर तांबे यांना उमेदवारी दिली होती. परंतु सुधीर तांबे यांनी निवडणुकीत माघार घेतली आणि पुत्र सत्यजीत तांबे यांना पाठिंबा दिला. यामुळे काँग्रेसने सुधीर तांबे यांच्यावर निलंबनाची कारवाई केली. सत्यजीत तांबे या निवडणुकीला अपक्ष म्हणून सामोरे गेले. महाविकास आघाडीच्या उमेदवार शुभांगी पाटील यावेळी निवडणुकीच्या मैदानात होत्या. या निवडणुकीत सत्यजीत तांबे यांनी भाजपचा छुपा पाठिंबा मिळवल्याची चर्चा होती. यात त्यांचा विजय झाला.

फडणवीसांनी तांबेंसाठी खोललं होतं भाजपचं दार

कॅलिफोर्निया राज्याचे गव्हर्नर, गॅविन न्यूसम यांनी लिहलेल्या ‘सिटीझनविल’ या पुस्तकाचं सत्यजित तांबे यांनी अनुवाद केला. या पुस्तक प्रकाशन सोहळ्याला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात, काँग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकूर उपस्थित होत्या. देवेंद्र फडणवीस यांनी बाळासाहेब थोरात तुमच्याकडे तक्रारीच्या सुरात सत्यजित सारखे नेते, तुम्ही बाहेर ठेवू नका. नाहीतर आमची नजर त्यांच्यावर आहे. कारण, चांगली माणसं जमाच करायची असतात, असं म्हणत फडणवीसांनी अप्रत्यक्षपणे सत्यजित तांबेंना भाजपात येण्याची ऑफरच दिली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT