Ahilyanagar News : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी महायुती सरकारवर जोरदार प्रहार केला.
"खोके, सत्तेसाठी आमदार फोडणे, सोयीचे राजकारण, सत्तेसाठी सर्व काही, जनतेच्या विकासाचे मुद्दे वाऱ्यावर, असे हे भ्रष्ट आणि ढोंगी महायुती सरकार लोकसभाप्रमाणे विधानसभेत देखील जनता पराभव करणार, हे निश्चित आहे. आता जनता खुर्ची हिसकावून घेताना दिसत आहे, तर दोन महिन्यात दोन हजार घोषणा केल्या. आता या घोषणा घोषणाच ठरल्या", असा घणाघात जयंत पाटील यांनी केले.
माजी राज्यमंत्री आमदार प्राजक्त तनपुरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी जयंत पाटील, खासदार नीलेश लंके यांच्यासह प्रमुख नेते उपस्थित होते. जयंत पाटील यांनी महायुती (Mahayuti) सरकारवर जोरदार निशाणा साधला.
जयंत पाटील म्हणाले, "महाराष्ट्रातील हे सरकार ढोंगी सरकार आहे. लोकसभा निवडणुकीपर्यंत काहीही काम न करणाऱ्या सरकारने नंतर केवळ दोन हजार घोषणा केलेल्या आहेत.लोकसभा निवडणुकीप्रमाणे विधानसभेतही महाराष्ट्रात परिवर्तन होवून महाविकास आघाडी (MVA) सरकार येणार आहे". या राज्यात भ्रष्टाचाराचा कळस झाला आहे. खोके देऊन आमदार फोडण्याचे काम या पाच वर्षात झाले आहे, असेही जयंत पाटील यांनी म्हटले.
'निळवंडे कालव्याचा प्रश्न फक्त प्राजक्त तनपुरेंच्या पाठपुराव्यामुळे मार्गी लागला. आपले सरकार आल्यावर मुळा धरणाच्या पलीकडील गावे जोडण्याचे काम देखील करणार आहोत. यासाठी 100 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. आज महाराष्ट्रातील भगिनी सुरक्षित नाहीत. आणि या सरकारने लाडकी बहीण योजना अमलात आणली.
ही योजना फक्त मत मिळवण्यासाठीच आणली आहे. महिलांवरचे अत्याचार थांबवता आले नाहीत. मुलींचे संरक्षण करता येत नाही. महिलांचा आदर करता येत नाही. त्यामुळे या सरकाराला जनतेलाच 'गुडबाय' म्हणण्याची घाई झाली आहे', असा टोला देखील जयंत पाटील यांनी लगावला.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.