Sameer Bhujbal, Gokul Zirwal, Seema Valvi & Dhananjay Choudhary Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Assembly Politics: आमदारांना चिंता मुलांच्या तिकीटांची अन् राजकीय बस्तानाची!

Sampat Devgire

Assembly Election News: विधानसभा निवडणूक केव्हाही जाहीर होऊ शकते. या दृष्टीने विविध प्रस्थापित नेते आणि आमदार आपली राजकीय गणिते मांडण्यात व्यस्त झाली आहेत. मतदारसंघावरील वर्चस्व कायम ठेवण्यासाठी त्यांचे जोरदार प्रयत्न होत आहेत.

राजकारणामध्ये कार्यकर्त्यांना संधी केव्हा? असा प्रश्न सातत्याने विचारला जातो. निवडणुकीत मी नसलो तर माझा कोण? याची चिंता प्रस्थापित नेते सदैव करीत असतात. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर मुलगा अथवा मुलीला राजकारणात स्थिर कसे करायचे? यावर ठरत असते.

यंदाही उत्तर महाराष्ट्रात विविध आमदार आणि राजकीय नेत्यांना आपल्या पुढच्या पिढीला राजकारणात स्थिर करण्यासाठी प्रयत्न करायचे आहेत. हे प्रयत्न लपून राहिलेले नाहीत. विविध कारणांमुळे या आमदारांना आता घरातूनच स्पर्धा निर्माण झाल्याचे देखील चित्र आहे.

काही मतदारसंघात राजकीय दबावातून तर काही आमदारांवर कौटुंबिक दबावातून ही परिस्थिती आली आहे. त्यामुळे अनेक आमदारांना यंदाच्या विधानसभा निवडणुकीत आपल्या ऐवजी आपल्या मुलांना पक्षाने संधी द्यावी, असे वाटते आहे.

आपल्या पुढच्या पिढीला राजकारणात लीफ्ट मिळावी यासाठी या आमदारांनी वरिष्ठ नेत्यांकडे फिल्डिंग लावली आहे. नाशिक जिल्ह्यात विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ महायुतीमध्ये आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे ते नेते आहेत. मात्र त्यांचे चिरंजीव गोकुळ झिरवाळ हे देखील यंदा निवडणूक लढवू इच्छितात.

याबाबत या दोघांनीही अनेकदा मतप्रदर्शन देखील केले आहे. त्यामुळे गोकुळ झिरवाळ यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवारी मिळेल काय? यासाठी उघडपणे आणि पडद्यामागून प्रयत्न सुरू असल्याचे बोलले जाते.

राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यंदा पाचव्यांदा येवला मतदारसंघातून उमेदवारी करणार आहेत. मात्र त्याच वेळेस त्यांच्या कुटुंबातील माजी खासदार समीर भुजबळ यांनी यंदा विधानसभेची निवडणूक लढवावी असा त्यांच्या अनुयांयांचा प्रयत्न आहे. मंत्री भुजबळ यांचा राजकीय वारस पुढे यावा, यासाठी त्यांनी नांदगाव विधानसभा मतदारसंघाची निवड केली होती.

सध्या नांदगाव मतदारसंघात त्यांचे कट्टर विरोधक आणि शिवसेना शिंदे गटाचे आमदार सुहास कांदे आहेत. त्यांना आव्हान देण्याची पूर्ण तयारी भुजबळ समर्थकांनी केली आहे. त्यासाठी माजी खासदार भुजबळ हे नांदगाव विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी करण्याची दाट शक्यता आहे. माजी खासदार भुजबळ यांच्या उमेदवारीमुळे नांदगावच्या राजकारण नवा ट्वीस्ट येणार आहे. महाविकास आघाडीचा उमेदवार कोण? याबाबत उत्सुकता वाढली आहे.

सिन्नर मतदारसंघात विद्यमान आमदार माणिकराव कोकाटे हे देखील पाचव्यांदा उमेदवारी करणार आहेत. त्यांनाही त्यांची कन्या सीमांतिनी कोकाटे यांचे राजकीय पुनर्वसन व्हावे, असे वाटते.

लोकसभा निवडणुकीत कोकाटे यांनी उमेदवारी केली असती तर, विधानसभेला सीमांतिनी कोकाटे उमेदवार झाल्या असत्या. आता या संधीची शक्यता कमी आहे. आमदार कोकाटे हे कोणत्याही परिस्थितीत यंदाची निवडणूक लढवायचीच असा चंग बांधून आहेत. त्यामुळे सीमांतिनी कोकाटे यांची संधी पाच वर्षे पुढे गेली आहे.

रावेरचे (जळगाव) आमदार शिरीष चौधरी हे काँग्रेसचे वरिष्ठ आमदार आहेत. त्यांनाही यंदा प्रकृती अस्वास्थ्यामुळे वेगळे काही करण्याची इच्छा आहे. यामध्ये मुलगा धनंजय चौधरी याला उमेदवारी मिळावी यासाठी त्यांचे पक्षाकडे प्रयत्न सुरू असल्याचे बोलले जाते.

माजी मंत्री पद्माकर वळवी यांनी नुकताच भाजपचा राजीनामा दिला. ते लवकरच काँग्रेस पक्षात प्रवेश करण्याची शक्यता आहे. त्यांना देखील आपली कन्या आणि जिल्हा परिषदेची माजी अध्यक्षा अॅड सीमा वळवी यांना उमेदवारी मिळावी, असे वाटते. त्यासाठी त्यांची स्थानिक नेत्यांशी चर्चा सुरू आहे.

या नेत्यांबरोबरच अनेक नेत्यांना आपल्या पुढच्या पिढीला राजकारणात स्थिरस्थावर करायचे आहे. त्यासाठी विधानसभा निवडणूक ही उत्तम संधी मानली जाते. त्यामुळे यंदाची विधानसभा निवडणूक ही `जनरेशन नेक्स्ट पॉलिटिक्स` म्हणून देखील उत्तर महाराष्ट्रात चर्चेत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT