Raj Thackrey News: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने यंदाच्या विधानसभा निवडणुकीत स्वतंत्र उमेदवार देण्याची घोषणा केली आहे. राज्यातील काही उमेदवार देखील पक्षाने जाहीर केले आहेत. या पार्श्वभूमीवर उत्तर महाराष्ट्रातील राजकीय स्थितीचा आढावा घेतला जाणार आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे विरधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सक्रिय झाले आहेत. या संदर्भात पुणे, विदर्भ आणि राज्याच्या अन्य भागाचा दौरा त्यांनी नुकताच पूर्ण केला. आता दोन दिवसांच्या दौऱ्यावर ते नाशिकला येत आहेत.
यावेळी ते उत्तर महाराष्ट्रातील राजकीय स्थितीचा आढावा घेतील. त्यांचा हा दौरा प्रामुख्याने विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा भाग म्हणून होणार आहे. त्यात उमेदवारांचा शोध आणि चाचपणी यावर त्यांचा भर असेल.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने यंदाच्या निवडणुकीत नाशिकमधून उमेदवार देण्याचा निर्णय यापूर्वीच झालेल्या दौऱ्यात घेतला होता. मात्र स्थानिक पदाधिकाऱ्यांमधील गटबाजी हा श्री ठाकरे यांच्या दृष्टीने चिंतेचा विषय आहे. त्यावर त्यांनी नाराजी व्यक्त केली होती.
या पार्श्वभूमीवर मनसेची जम्बो कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली आहे. त्यात बरेच फेरबदल करण्यात आले आहेत. त्यानंतर होणाऱ्या ठाकरे यांच्या या दौऱ्यात पदाधिकारी आणि कार्यकर्ते उत्साहाने सहभागी होतील, अशी चिन्हे आहेत.
यामध्ये उत्तर महाराष्ट्रातील ४७ मतदार संघात मनसेला किती उमेदवार मिळतात, हा महायुती आणि महाविकास आघाडी दोन्हींच्या दृष्टीने चर्चेचा विषय आहे. मनसे नाशिक शहरात चार मतदारसंघात उमेदवार देऊ शकेल, अशी आजची स्थिती आहे.
ग्रामीण भागात मात्र पक्षाला उमेदवारांसाठी शोध मोहीम राबवावी लागेल, अशी स्थिती आहे. मनसेच्या उमेदवारांचा फटका कोणाला बसतो आणि पक्षाला जिल्ह्यात किती जागा मिळतात, हा देखील राजकीय दृष्ट्या महत्त्वाचा विषय आहे.
श्री. ठाकरे यांनी मनसेची स्थापना केल्यानंतर झालेल्या २००९ च्या विधानसभा निवडणुकीत पक्षाने मोठ्या प्रमाणावर विधानसभा निवडणुकीत उमेदवार उभे केले होते. त्यात पक्षाचे १३ आमदार विजयी झाले. यामध्ये नाशिकच्या सर्व तिन्ही जागांवर मनसेचे आमदार होते.
त्यानंतर २०१२ मध्ये झालेल्या निवडणुकीत महापालिकेत देखील मनसेची सत्ता आली. सध्या मात्र शहरातील या तिन्ही जागांवर भाजपचे आमदार आहेत. अशा स्थितीत मनसेला भाजपशी संघर्ष करावा लागणार आहे. या संदर्भात श्री. ठाकरे आणि त्यांचे निकटवर्तीय पदाधिकाऱ्यांना काय टिप्स देतात. कोणता राजकीय मार्ग निवडतात. याची उत्सुकता आहे. याबाबतचे स्पष्ट संकेत दोन दिवसांनी होणाऱ्या राज ठाकरे यांच्या दौऱ्यातून मिळतील, अशी अपेक्षा आहे.
----
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.