Mayor Jayshree Mahajan & Police Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Jalgaon News: मिरवणूकीत महापौरांच्या घरावर हल्ला करणारे अटकेत

महापौरांच्या बेडरूमपर्यंत फेकले सुतळी बाँब; पहाटेपर्यंत मेहरूणमध्ये तणाव कायम

Sampat Devgire

जळगाव : शहराच्या (Jalgaon) महापौर जयश्री महाजन (Jayshree Mahajan) यांच्या घरावर गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या हल्ल्याप्रकरणी एमआयडीसी पोलिस (Police) ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिघांना ताब्यात घेण्यात आले आहे. मंगेश राजेंद्र नाईक, भरत चांगदेव आंधळे आणि सागर विजय लाड अशी ताब्यात घेण्यात आलेल्या तिघा संशयितांची नावे आहेत. (Mayor`s house attacked in mehrun Ganesh procession)

जळगावच्या महापौर जयश्री महाजन या मेहरुण परिसरात राहतात. त्यांच्या घरासमोर शुक्रवारी रात्री गणेश विसर्जन मिरवणुकीतील काही तरुणांनी राडा करत त्यांच्या घरावर गुलाल, पेटता सुतळी बॉम्ब फेकून दहशत माजविण्याचा प्रयत्न केला होता.

शहरातील मेहरूण परिसरातील विठ्ठल मंदिर ते महादेव मंदिरापर्यंतच्या रस्त्यावर गणेश विसर्जन मिरवणुकीत जोरदार राडा झाला. विठ्ठलमंदिरासमोरील महापौर जयश्री महाजन यांच्या निवासस्थानाजवळ गुलाल उधळण्यात येऊन घरात वरच्या मजल्यावर पेटते सुतळी बाँब फेकल्याने एकच गोंधळ उडाला. महापौर महाजन यांच्या कार्यकर्त्यांनी प्रतिकार केल्याने मंडळाचे कार्यकर्ते गणेशमूती तशीच सोडून पसार झाले. रात्री उशिरा या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विसर्जन मिरवणुकीत चक्क महापौर जयश्री महाजन यांच्या घरावर दगडफेक झाल्याची घटना घडल्यामुळे मोठे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. जुना मेहरूण येथील ‘एक गाव-एक गणपती’ व जय श्रीराम मित्रमंडळाची मिरवणूक निघाली होती. या वेळी ‘एक गाव-एक गणपती’ मंडळाचे काही कार्यकर्ते जय श्रीराम मंडळाच्या मिरवणूक सहभागी झाले. यानंतर त्यातील काही तरुणांनी महापौर जयश्री महाजन यांच्या घरासमोर अक्षरशः गोण्यांनी गुलालाची उधळण करून त्यांच्या घरावर गुलाल व दगडफेक करायला सुरवात केली. काहींनी पेटते सुतळी बाँब फेकल्याने एकच गोंधळ उडून दोन गट समोरासमोर आले. घटनेची माहिती मिळताच निरीक्षक प्रताप शिकारे, गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किरणकुमार बकाले फौजफाट्यासह घटनास्थळी दाखल झाले.

या प्रकरणी पूर्वेश महाजन यांच्या तक्रारीवरून ‘एक गाव एक गणपती’ व श्रीराम मित्र मंडळातील कार्यकर्ते योगेश राजेंद्र नाईक, तेजस ज्ञानेश्वर वाघ, अजय संतोष सांगळे, मयूर बाळकृष्ण सांगळे, दिनेश शिवदास घुगे, किरण जगदीश नाईक, तेजस सुनील घुगे, महेश शिवदास घुगे, दीपक राजेंद्र नाईक, राहुल सानप, वैभव किशोर वाघ (मेघा किराणा), महेश ऊर्फ माही लाड, रामा वासुदेव सानप, मंगेश राजेंद्र नाईक, भावेश उमेश घुगे, भरत चांगदेव आंधळे, किरण शेले, सागर विजय लाड व इतर २५ ते ३० जण अशांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या घटनेत अ‍ॅड. नीता भरत महाजन यांच्या गळ्यातील तीन तोळे वजनाची सोन्याची पोत गहाळ झाली असल्याचे नमूद करण्यात आले आहे. तसेच राजेंद्र नाईक व तेजस नाईक यांनी हातात चाकू घेऊन उपस्थितांवर चाकू मारण्याचा प्रयत्न केला असल्याचा देखील आरोप करण्यात आला असून, प्राणघातक हल्ला प्रकरणी मंगेश राजेंद्र नाईक (वय २९, रा. हनुमाननगर), भरत चांगदेव आंधळे (वय ३८, रा. मेहरुण), सागर विजय लाड (वय-२९, रा. मेहरुण) अशा तिघांना अटक करण्यात आली आहे.

----

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT