Nagar Urban Bank News  Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Nagar Urban Bank News : अर्बन बँक घोटाळ्याच्या तपासाची गोपनीयता चव्हाट्यावर; 'या' व्हॉट्सॲप ग्रुपचा अ‍ॅडमिन चौकशीच्या फेऱ्यात

Pradeep Pendhare

Ahmednagar News : नगर अर्बन बँकेशी 291 कोटी रुपयांच्या घोटाळ्याशी संबंधीत गुन्ह्याच्या तपासावर कोणीतरी प्रभाव टाकत आहे, असे गंभीर निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने नोंदविले.

न्यायालयाने या गुन्ह्याच्या तपासासंदर्भातील गोपनीय कागदपत्रे समाज माध्यमांवर व्हायरल करत असल्याची गंभीर दखल घेतली. साईदीप अग्रवाल, 'नगर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक' नावाने असलेला 'व्हॉट्सॲप ग्रुप' आणि त्याच्या अ‍ॅडमिनच्या चौकशीचा आदेश दिला आहे.

नगर अर्बन बँकेच्या 291 कोटीच्या फसवणूक प्रकरणात अटकेत असलेला आरोपी अविनाश वैकर याच्या जामीन अर्ज सुनावणीत न्यायालयाने गंभीर निरीक्षणे नोंदवली. आरोपीचा मुलगा पोलिस तपासाचे गोपनीय कागदे सार्वजनिक करतो, याची गंभीर दखल न्यायालयाने घेतली. तसंच आरोपी अविनाश वैकर पर्यंत ही गोपनीय कागदपत्रे, कशी पोचली हा देखील गंभीर मुद्दा आहे, असे स्पष्ट भाष्य न्यायालयाने केले. न्यायालयाने गंभीर निरीक्षण नोंदवल्याने गुन्ह्याचा तपास आणि तपास करणारे पोलिस (Police) अधिकारी संशयाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. या गुन्ह्याचा तपास करणारे पोलिस चौकशीच्या रडावर आलेत. न्यायमूर्ती एस. जी. मेहरे यांच्यासमोर सुनावणी झाली. वैकरच्यावतीने ए. ए. याडकीकर आणि सरकारकडून पी. व्ही. डिग्गीकर यांनी बाजू मांडली.

न्यायालयाने (Court) यासंदर्भातील आदेशात म्हटले की, अर्जदाराच्या वकिलांनी निदर्शनास आणून दिले, की 28 मे 2024 च्या फॉरेन्सिक अहवालातील एक परिशिष्ट रेकॉर्डचा भाग बनवलेला नाही. तथापि, त्याच्या अशिलाला त्याचा काही भाग साईदीप अग्रवालकडून (रा. साईप्रसाद, 64, हरमन हेरिटेज, फेज-1, नगर रोड, कल्याणीनगर जंक्शन, शास्त्रीनगर, पुणे) मोबाईल क्रमांक 9890958428 वर मिळाला आहे. खरे तर 'फॉरेन्सिक ऑडिट' रिपोर्ट तपासाचा भाग आहे. हा गोपनीय अहवाल असणे अपेक्षित आहे आणि तपास अधिकाऱ्याने तो अद्याप सार्वजनिक केलेला नाही. परंतु तो अहवाल सार्वजनिक झाला आहे. यावरून अनुमान काढले जाऊ शकते की, या तपासाच्या मागे प्रभावशाली लोक आहेत, जे निष्पक्ष तपासात अडथळा आणू शकतात.

व्हॉट्सॲप ग्रुपचं नाव समोर

वकील याडकीकर यांना व्हॉट्सॲप ग्रुपचे नाव सुरवातीला सांगितले नाही. परंतु नंतर 'नगर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक' नावाच्या व्हॉट्सॲप ग्रुपकडून 28 मे 2024 च्या फॉरेन्सिक ऑडिट रिपोर्टच्या परिशिष्टाच्या भागाच्या प्रती मिळाल्या. त्यामुळे तपास अधिकाऱ्यांना हा अहवाल कसा लिक झाला, 'व्हॉट्सॲप ग्रुप'वर आणि वैयक्तिकरित्या साईदीप अग्रवाल यांनी कसा प्रसारित केला, याचा त्वरित तपास करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले.

न्यायालयाचा आदेश

या गुन्ह्याच्या तपास अधिकाऱ्यांनी 'व्हॉट्सॲप ग्रुप'च्या ॲडमिन आणि साईदीप अग्रवाल यांच्यावर कडक कारवाई करावी. त्यांनी या न्यायालयात तपासाचा अहवाल द्यावा. आरोपींपैकी कोणी त्यांच्या तपासावर प्रभाव टाकत आहे का? हे त्यांनी न्यायालयासमोर मांडावे. जर त्याला हा परिशिष्ट फॉरेन्सिक ऑडिट अहवाल तपासाचा भाग बनवायचा असेल, तर त्याने तो ट्रायल कोर्टातील दोषारोपपत्रामध्ये जोडून सरकारी वकील तसेच आरोपींना पुरवावा, असा आदेश दिला आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी 9 सप्टेंबर 2024 ला होणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT