Yogesh Gholap, Uddhav Thackeray Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

nashik politics : मुलगा ठाकरेंसोबत, मुलगी भाजपमध्ये अन् वडिलांची शिंदेंना साथ! हे काय गौडबंगाल?

Yogesh Gholap Supported Uddhav Thackeray Shiv Sena : वडिलांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडली. मात्र, मुलाचा ठाकरेंच्या शिवसेनेतच राहण्याचा निर्णय...

Sampat Devgire

Deolali Nashik Politics News :

माजी मंत्री बबनराव घोलप यांनी शिवसेनेचा (ठाकरे गट) राजीनामा दिला आहे. त्यावर प्रतिक्रिया येत आहेत. यासंदर्भात बबनराव यांचे चिरंजीव माजी आमदार योगेश घोलप यांनीही प्रतिक्रिया दिली आहे.

"मी योगेश घोलप सदैव माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत" अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. माजी मंत्री घोलप यांनी राजीनामा दिल्यानंतर ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करतील, असे आडाखे बांधले जात आहेत. तर आपण कोणताही निर्णय अद्याप घेतलेला नाही, असे घोलप यांनी स्पष्ट केले होते. या पार्श्वभूमीवर त्यांचे चिरंजीव योगेश घोलप यांनी दिलेल्या प्रतिक्रियेमुळे देवळाली विधानसभा मतदारसंघातील Uddhav Thackeray गटाची आगामी दिशा स्पष्ट झाली आहे.

माजी मंत्री घोलप शिवसेनेचे उपनेते म्हणून शिर्डी लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी पाहत होते. गेल्या निवडणुकीतदेखील त्यांची इच्छुक उमेदवार म्हणून चर्चा होती. यंदाच्या निवडणुकीतही घोलप उमेदवारी करतील, असे बोलले जात होते. प्रत्यक्षात घोलप यांच्याबाबत न्यायालयीन खटला प्रलंबित असल्याने ते उमेदवारी करण्यास पात्र नाहीत. या खटल्याची आगामी सुनावणी येत्या 23 फेब्रुवारीला होणार आहे. त्यानंतरच याबाबतचे राजकीय भवितव्य स्पष्ट होऊ शकेल.

घोलप यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना पत्र लिहिले आहे. शिर्डीतील संघटनात्मक नेमणूक वरिष्ठांनी रद्द केल्याने तसेच काही शिवसैनिकांवर अन्याय झाल्याने आपण राजीनामा देत असल्याचे त्यांनी पत्रात म्हटले होते. या पार्श्वभूमीवर झालेल्या शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्यात संबंध घोलप कुटुंब अनुपस्थित राहिले होते. त्यामुळे विविध चर्चा सुरू झाल्या होत्या. या पार्श्वभूमीवर माजी आमदार घोलप यांनी आपण शिवसेनेच्या ठाकरे गटासोबत असल्याचे स्पष्ट केल्याने घोलप कुटुंबीयांतील राजकीय दुरावा अधिक वाढण्याची शक्यता आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

घोलप यांचा संबंध प्रामुख्याने देवळाली विधानसभा मतदारसंघाशी जोडला जातो. गेली तीस वर्षे घोलप या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. सध्या मात्र राजकीय परिस्थिती भिन्न आहे. स्वतः माजी मंत्री घोलप यांनी राजीनामा दिला आहे. त्यांची एक कन्या तनुजा घोलप-भोईर या भाजपमध्ये असून, उमेदवारीसाठी इच्छुक आहेत. अशा स्थितीत माजी आमदार योगेश घोलप यांचे नावदेखील संभाव्य उमेदवार म्हणूनच घेतले जात आहे. घोलप यांच्या राजीनाम्यानंतर देवळाली विधानसभा मतदारसंघातील राजकीय स्थिती आणि उमेदवारांची गणिते आणखी गोंधळ निर्माण करणारी झाली आहेत.

edited by sachin fulpagare

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT