नाशिक लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीची उमेदवारी अजून घोषित झालेली नाही. तरीही तिकीट मिळणार या आत्मविश्वासाने ठाकरे गटाने प्रचाराला सुरुवात केली आहे. त्यातही विजय करंजकर यांच्या प्रचाराला वेग आला आहे. अशातच एक वेगळी चर्चा सुरू झाल्याने अनेक शंकाकुशंका उपस्थित होत आहेत. यावर नाशिकचे ठाकरे गटाचे महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांनी थेट उत्तर देत एक घाव दोन तुकडे केले आहेत.
नाशिक लोकसभा निवडणुकीसाठी (Nashik Loksabha Constituency) सर्वाधिक इच्छुक रिंगणात उतरतील, अशी चिन्हे आहेत. महायुती आणि महाआघाडीतील (MVA) सर्वच पक्षांच्या कार्यकर्त्यांनी इच्छा व्यक्त केली आहे. प्रत्यक्षात ही जागा कोणत्या दोन पक्षांना सुटते हे लवकरच समोर येईल. महाआघाडीतील शिवसेना ठाकरे गटाची ही पारंपरिक जागा असून, सुरुवातीपासून ठाकरे गट आग्रही आहे. शरद पवारसुद्धा ठाकरेंच्या मताशी सहमत असल्याचा दावा करण्यात येतो. (Loksabha Election 2024)
ठाकरे गटाचे विजय करंजकर (Vijay Karanjkar) यांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. विजय मिळवण्यासाठी त्यांनी ताकद वाढवण्यास सुरुवात केली आहे. असे असताना ठाकरे गटाकडून उमेदवार बदलला जाऊ शकतो, अशी चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे करंजकरांच्या मनात चलबिचल सुरू झाली आहे. यावर नाशिक महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर (Sudhakar Badgujar) यांनी भूमिका स्पष्ट केली आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
'ही जागा शिवसेनेची आहे. त्यामुळे विजय अप्पा करंजकर यांनी प्रचार कामाला सुरुवात केली आहे. काही जणांकडून मुद्दाम उमेदवार बदलण्याबाबत वावड्या उठवल्या जातात. त्यात काहीही अर्थ नाही, असे बडगुजर यांनी स्पष्ट केले आहे.
शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख विजय करंजकर यांनी खूप आधीपासून निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. यापूर्वी विधानपरिषदेवर त्यांची वर्णी लागली होती. मात्र, तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshiyari) यांनी संबंधित आमदारांच्या यादीला मंजुरीच दिली नाही. परिणामी करंजकर यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला. आता त्यांनी ताकद लावण्यास सुरुवात केली असतानाच त्यांच्या नावाबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत. तसेच शिवसेना ऐनवेळी उमेदवार बदलणार, अशी चर्चा सुरू झाली आहे.
सुधाकर बडगुजर यांच्या आक्रमक पवित्र्यामुळे वरिष्ठ पातळीवर ही जागा ठाकरे गटाला सुटल्याचे आणि विजय करंजकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याचे तूर्तास दिसते. तसेच आताची राजकीय परिस्थिती लक्षात घेता ऐनवेळी उमेदवार बदलून आपली पत दावणीला लावण्याचा निर्णय शिवसेना किंवा शरद पवार गट घेण्याची शक्यताही कमीच वाटते.
(Edited by Avinash Chandane)
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.