Nashik Kumbh Mela : नाशिकमध्ये होणारा आगामी कुंभमेळा आता जवळ आला आहे. त्यापार्श्वभूमीवर एकीकडे प्रशासनाकडून जोरदार तयारी सुरु आहे. तर दुसरीकडे मात्र, कुंभमेळा आखाड्यांमधील साधू-महंतांमध्ये असलेले अंतर्गत वाद उघड होत आहे. त्यातून आता पाच साधू मंहंतावर कारवाई झाल्याची माहिती समोर आली आहे.
श्री पंचायत बडा उदासीन आखाड्याने पाच साधू महंतांना आखाड्यातून आजीवन हद्दपार करण्याचा निर्णय घेतला आहे. या पाच साधू महंतांचे वर्तन आखाड्याच्या परंपरा व शिस्तीच्या विरुद्ध असल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवत ही कारवाई करण्यात आली आहे. यासंदर्भात आखाड्याचे श्री महंत दुर्गादास महाराज यांनी दिली माहिती दिली आहे.
तमिळनाडू मधील कांचीपुरम येथे श्री पंचायत आखाडा बडा उदासी निर्वाणची बैठक झाली. बैठकीस उपस्थित संतांनी आखाड्याच्या संघटनेशी संबंधित विविध प्रश्नांवर सविस्तर चर्चा केली. या चर्चेदरम्यान, पाच साधूंना आजीवन हद्दपार करीत त्यांचा हुक्का-पाणी बंद करण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला. या पाच साधूंमध्ये त्र्यंबकेश्वर येथील श्रीमहंत रघुमुनी यांचाही समावेश असल्याने नाशिकच्या धार्मिक वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.
याशिवाय स्थानिक महंत उग्रदास, जयेंद्र मुनी (कनखल), स्वामी शिवानंद (प्रयागराज), सेवादास (हरिद्वार) यांनाही आजीवन हद्दपार करण्यात आलं आहे. संबधितांनी आखाडा आणि श्री सतपंच परमेश्वर यांच्या प्रतिष्ठा आणि हिताच्या विरोधात न्यायालयासह इतर मंचांवर कारवाई केल्याचा आरोप आहे. त्याचबरोबर त्यांच्याशी सहकार्य करणाऱ्या इतर व्यक्तींचे वर्तनही आखाड्याच्या परंपरा व शिस्तीच्या विरुद्ध असल्याचे म्हटले जात होते.
कांचीपुरम येथे झालेल्या बैठकीला उपस्थित संत आणि महात्म्यांनी केलेल्या विचारमंथनानंतर वरील पाचही महंतांना श्री उदासी वेश भगवान आणि श्री पंचायत आखाडा बडा उदासी निर्वाणमधून हद्दपार करण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला. आखाड्याची प्रतिष्ठा, शिस्त आणि परंपरांचे रक्षण करणे सर्वतोपरी असून, भविष्यातही संस्थेच्या हिताविरुद्ध कोणत्याही प्रकारच्या कृतीवर नियमानुसार कारवाई केली जाईल, असे या बैठकीत सांगण्यात आले.
महंत रघुमुनी यांना आखाडा परिषदेच्या दुसऱ्या गटाने बडा उदासीन आखाड्याचे प्रतिनिधी म्हणून घेतल्याचे नुकतेच त्र्यंबकेश्वर येथे जाहीर केले होते. त्या वेळी अध्यक्ष निरंजनी आखाड्याचे श्री महंत रवींद्रपुरी महाराज आणि महामंत्री जुना आखाड्याचे श्री महंत हरीगिरी महाराज यांनी घोषणा करीत मागच्या काही वर्षांपासून बडा उदासीन आखाड्यातून निष्कासित झालेले महंत रघुमुनी यांना व्यासपीठावर स्थान देऊन त्यांच्या सहकार्याने त्र्यंबकेश्वर येथील कुंभमेळा होईल.
त्यांच्या माध्यमातून बडा उदासीन आखाडा आपल्याबरोबर असल्याचे जाहीर केले होते. दरम्यान, आताच्या निर्णयाने आखाडा परिषदेतील दोन्ही गटांचा संघर्ष तीव्र होणार असल्याचे दिसत आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.