Maharashtra IVF Centers Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Maharashtra IVF Centers : स्री बीज विक्री प्रकरणात फडणवीस सरकार अॅक्शन मोडवर; राज्यातील सर्व IVF सेंटरची होणार झाडाझडती

Badlapur Uterine Eggs Selling Racket : बदलापूर येथील स्त्री बीज अवैध विक्री प्रकरण उघडकीस आल्यानंतर राज्य सरकार अॅक्शन मोडवर आले आहे. राज्यातील सर्व IVF सेंटर आता सरकारच्या रडारवर आहेत.

Ganesh Sonawane

Maharashtra IVF Centers : ठाणे जिल्ह्यातील बदलापूर येथे गरजू व गरीब महिलांची दिशाभूल करुन त्यांच्या स्री-बीजांची बेकायदेशीरपणे विक्री केल्याच्या प्रकरणाची फडणवीस सरकारने गंभीर दखल घेतली असून सरकार अॅक्शन मोडवर आले आहे. या प्रकरणाचे नाशिक कनेक्शन समोर आल्यानंतर आता राज्यातील सर्व 860 आयव्हीएफ केंद्रांची आरोग्य विभाग व पोलिस विभागाच्या मार्फत संयुक्त झाडाझडती घेण्यात येणार आहे.

राज्य सरकारने राज्यातील सर्वच IVF सेंटरच्या कारभाराची संयुक्त चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार पोलीस आणि आरोग्य विभागाच्या माध्यमातून प्रत्येक शहरातील IVF केंद्रांची तपासणी केली जाणार असून अनियमितता आढळल्यास संबधित केंद्राचा परवाना रद्द करण्यात येणार आहे.

ठाणे जिल्ह्यातील बदलापूर येथील स्री बीज तस्करी प्रकरणी तपास सुरु असताना या प्रकरणाचे नाशिक कनेक्शन समोर आले. नाशिक महापालिकेने शहरातील मुंबई नाका परिसरात असलेल्या 'मालती आयव्हीएफ' सेंटरची मान्यता रद्द केली आहे. संबंधित केंद्र सील करण्यात असून केंद्रातून महत्त्वाचे कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत. या प्रकरणी मालती आयव्हीएफ सेंटरचा संचालक डॉ. अमोल पाटील याला बदलापूर पोलिसांनी अटक केली असून त्याला न्यायालयाने ९ मार्च पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. डॉ. पाटीलवर सरोगेट मदर एजंट म्हणून काम केल्याचा आरोप आहे.

बदलापूर येथील स्री बीज विक्री प्रकरण समोर आल्यानंतर राज्यात खळबळ उडाली आहे. हे रॅकेट केवळ स्थानिक पातळीवर मर्यादित नसून राज्यभर हे रॅकेट चालवले जात असल्याचा संशय आहे. ठाणे जिल्ह्यात आयव्हीएफ सेंटर चालविले जात असले तरी परवानगी नाशिक महापालिकेची होती. नियमानुसार महापालिका हद्दीतच सेंटर चालविणे अपेक्षित असताना ठाणे जिल्ह्यात विविध ठिकाणी सेंटर चालविले जात असल्याचा प्रकार समोर आला आहे.

बदलापूरमध्ये एका घरातच हा सर्व प्रकार सुरु होता. अवैधरीत्या स्त्री बीज वाढवणारी इंजेक्शन्स साठवून गरजू महिलांना पैशांचे आमिष दाखवले जात होते. त्यानंतर त्यांना IVF सेंटरमध्ये पाठवून ऑपरेशनद्वारे बीज काढून त्यांची विक्री केली जात असल्याचा आरोप आहे. कायद्यानुसार एक महिला आपल्या संपूर्ण आयुष्यात केवळ एकदाच स्त्री-बीज दान करू शकते. मात्र एकाच महिलेची अनेक बनावट आधार कार्ड आणि प्रतिज्ञापत्रे तयार करुन अनेकवेळा स्री बीज काढले जात असल्याचा आरोप आहे.

स्री बीज विक्री प्रकरणाची व्याप्ती लक्षात घेता राज्य सरकारने आता सर्वच IVF केंद्रांची संयुक्त तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत. आरोग्य विभाग आणि पोलिस प्रशासनाच्या पथकांकडून कागदपत्रे, परवाने, वैद्यकीय प्रक्रिया आणि आर्थिक व्यवहारांची चौकशी केली जाणार आहे.

या प्रकरणी विधान परिषदेत भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी लक्षवेधी सूचना मांडून सरकारचे लक्ष वेधले असता गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी उत्तर दिलं. या गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी आयव्हीएफ केंद्रांच्या परवानगी प्रक्रियेला ऑनलाइन करण्यात येणार असून, महिलांचे आधार कार्ड लिंक करण्यात येईल तसेच सर्व केंद्रांची तपासणी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल असे सरकारने स्पष्ट केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT