Balasaheb Thorat Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Balasaheb Thorat Angry : संतापजनक! नाशिकमधील सत्ताधारी तेरा आमदार करतात तरी काय?

Sampat Devgire

Nashik Political News : नाशिक जिल्ह्यात 15 आमदार आहेत. यातील 13 आमदार सत्ताधारी पक्षासोबत आहेत. मात्र हे तेरा आमदार काय काम करतात? अशी विचारणा आता नागरिकांत होऊ लागली आहे.

नाशिकमधील अनेक प्रश्न सोडवण्याबाबत अश्वासन देऊनही सरकारने याकडे लक्ष दिले नाही. यावर काँग्रेसचे नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरातांनी संताप व्यक्त केला.

राज्यातील महायुती सरकारच्या राजकीय फोडाफोडीमुळे जिल्ह्यातील १५ पैकी १३ आमदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारचे समर्थक बनले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे सहा आमदार 'विकासा'साठी असे कारण देत ज्येष्ठ नेते शरद पवार यांना सोडून अजित पवार यांच्याबरोबर गेले होते, हा त्याचा ताजा संदर्भ आहे.

केवळ मालेगावचे मौलाना मुक्ती आणि काँग्रेसचे हिरामण खोसकर हेच विरोधक शिल्लक आहेत. सत्ताधारी आमदारांकडून सातत्याने मोठ्या घोषणा केल्या जातात. शेकडो कोटींच्या निधीचे फलक लावले जातात.

सामान्यांना खऱ्या अर्थाने त्रस्त करणाऱ्या समस्यांवर या आमदारांनी काय केले? अशी विचारणा होऊ लागली आहे. त्याला कारणही तसेच घडले आहे. रोजगारासाठी आवश्यक असलेल्या औद्योगिक जमिनीचा प्रश्न आमदार सत्यजित तांबे यांनी विविध स्तरांवर मांडून त्याला चालना दिली. नाशिक-मुंबई महामार्गावरील वाहतूक कोंडीचा प्रश्न गतवर्षी आणि यंदाही काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी लावून धरला.

सिन्नर येथील औद्योगिक वसाहतीचा भाग असलेल्या इंडिया बुल कंपनीची शेकडो एकर जमीन विना वापर पडून आहे. दुसरीकडे नाशिकच्या उद्योगांना जमीन नाही. या प्रश्नावर आमदार तांबे यांनी विधिमंडळात आवाज उठवला. त्यानंतर मंत्रालय स्तरावर देखील पाठपुरावा केला.

नुकताच त्यांनी दिल्ली येथे उद्योग मंत्र्यांची भेट घेऊन हा प्रश्न सोडविण्याची विनंती केली. जमीन परत घेण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. मात्र या महत्त्वाच्या प्रश्नावर अन्य सत्ताधारी आमदारांची भूमिका शांत राहणे अशीच दिसते.

प्रदीर्घ काळापासून नाशिक-मुंबई महामार्गावर अनेक ब्लॅक स्पॉट तयार झाले आहेत. शहापूर भागात प्रचंड वाहतूक कोंडी होते. शहापूरहून ठाणे शहरात प्रवेश करताना दीड ते दोन तास लागतात. कोंडीमुळे वाहनांच्या प्रचंड मोठ्या रांगा असतात. नागरिकांना याबाबत प्रचंड मनस्ताप सहन करावा लागतो. त्याची झळ आमदारांना देखील बसते, मात्र ते शांतच आहेत.

हा प्रश्न सोडविण्यासाठी गतवर्षी सरकारने तातडीने उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले होते. त्याचा एक भाग म्हणून दिवसा अवजड वाहनांची वाहतूक बंद करण्याचा निर्णय घेतला होता. ३१ मार्चअखेर वाहतूक सुरळीत होईल, अशा आश्वासन दिले होते. या सगळ्यांचा काहीही परिणाम झालेला नाही. सरकारचे आश्वासन हवेतच विरले आहे. मात्र सत्ताधारी एकाही आमदाराने सत्तेत गेल्याचा उपयोग हा प्रश्न सोडविण्यासाठी केला नाही.

या प्रश्नावर काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी आवाज उठवला. त्याला सभागृहात राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनीही सहमती दर्शवली. यावेळी देखील अन्य आमदार मात्र फारसे सक्रिय दिसून आले नाही.

जनतेला त्रस्त करणाऱ्या खऱ्या समस्यांबाबत राज्यातील सत्ताधारी पक्षाचे आमदार मौन बाळगून असतात. जनता दुखावली तरी चालेल सरकारला दुखवायचे नाही, अशी त्यांची भूमिका असावी. यामध्ये भारतीय जनता पक्ष, शिवसेना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट या तिन्ही पक्षांच्या आमदारांचा समावेश होतो.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT