Rajabhau Waje & Balasaheb Thorat Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Balasaheb Thorat : बाळासाहेब थोरात म्हणतात, `भांडवलदारी प्रवृत्तीच्या उमेदवारांना इगतपुरीतून हद्दपार करा`

Igatpuri Assembly Constituency: काँग्रेस नेेत बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत इगतपुरीचे उमेदवार लकी जाधव यांचा प्रचाराला सुरवात, स्थानिकांनी फिरवली पाठ

Sampat Devgire

Congress News: इगतपुरी मतदार संघातील काँग्रेसचे उमेदवार लकी जाधव यांच्या प्रचाराला आज सुरुवात झाली. पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात, खासदार राजाभाऊ वाजे यांसह विविध नेते यावेळी उपस्थित होते. मात्र स्थानिक पदाधिकाऱ्यांनी त्याकडे पाठ फिरवली.

इगतपुरी मतदार संघातील काँग्रेसचे उमेदवार लकी जाधव यांच्या उमेदवारीबाबत गेले काही दिवस स्थानिक पातळीवर मोठा विरोध होता. या पार्श्वभूमीवर आज मतदारसंघातील प्रमुख देवस्थान असलेल्या घाटनदेवी मंदिरात बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते प्रचाराचा नारळ वाढविण्यात आला.

यावेळी शिवसेना उद्दव ठाकरे पक्षाचे खासदार राजाभाऊ वाजे यांसह पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते. घाटनदेवी येथे झालेल्या या कार्यक्रमाकडे बहुतांशी काँग्रेसच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी पाठ फिरवली. त्यामुळे उमेदवार जाधव यांच्या बाबतची नाराजी कमी झालेली नाही, असा संदेश यातून गेला.

यावेळी बाळासाहेब थोरात यांनी मतदारसंघातील राजकीय स्थितीबाबत सूचक वक्तव्य केले. ते म्हणाले, धनदांडगे आणि भांडवलदार नेत्यांचे वर्चस्व मोडून काढण्यासाठी लकी जाधव या गरीब कार्यकर्त्याला पक्षाने उमेदवारी दिली आहे. या निवडणुकीत भांडवलदार प्रवृत्तीच्या उमेदवारांना हद्दपार करा.

उमेदवार जाधव यांनी या मतदारसंघाशी आपले अतिशय जवळचे नाते आहे. इगतपुरीतील पाणी आणि अन्य सुविधा साधने यांचा उपयोग सर्वप्रथम या मतदारसंघातील नागरिकांना झाला पाहिजे. त्यानंतर येथील धरणांचे पाणी मुंबई आणि मराठवाड्याला दिले जाईल.

या संदर्भात आपण प्राधान्यक्रमाने नियोजन करून त्यासाठी मोठा लढा उभारला जाईल. काँग्रेसने प्रथमच एका सामान्य कार्यकर्त्याला उमेदवारी दिली आहे. त्यामुळे मतदारसंघातील नागरिक निश्चितच आपल्या पाठीशी उभे राहतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

यावेळी काँग्रेस नेत्यांनी इगतपुरी मतदार संघामध्ये अतिशय अनुकूल वातावरण आहे. येथे प्रचारात मोठी आघाडी घेऊन विजय मिळवू असा विश्वास व्यक्त केला.

संगमनेर मतदार संघाच्या धरतीवर इगतपुरी मतदार संघाचा विकास करण्याचे काँग्रेस पक्षाचे स्वप्न आहे. त्यासाठी येथील युवकांना रोजगार दिला जाईल. शेतकऱ्यांना शेतीसाठी सुविधा आणि शेतमालाला भाव देण्याला पक्षाचे प्राधान्य असेल, असे यावेळी त्यांनी सांगितले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेसच्या नेत्या, प्रियंका गांधी आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सभा उमेदवार जाधव यांच्यासाठी घेतल्या जातील, असे या नेत्यांनी सांगितले.

आजच्या कार्यक्रमाला पक्षाच्या बहुतांशी स्थानिक पदाधिकाऱ्यांनी पाठ फिरवली असे दिसून आले. त्यामुळे आता या नाराज पदाधिकाऱ्यांची समजूत काढण्यासाठी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना प्रयत्न करावे लागणार आहेत. या संदर्भात काय निर्णय होतो, कोण पुढाकार घेतो याची उत्सुकता कायम आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT