Sangamner Farmers Protest : खरीप हंगामात बनावट बियाणांच्या समस्येतून सावरण्याचा प्रयत्न करणाऱ्या शेतकऱ्यांसमोर आता खत टंचाईचे नवे संकट उभे राहिले आहे. यूरिया खताच्या उपलब्धतेवरून संगमनेरमध्ये शेतकऱ्यांनी पुणे–नाशिक महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केले.
या आंदोलनाला माजी मंत्री आणि काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी भेट देत शेतकऱ्यांच्या मागण्यांना पाठिंबा दर्शवला. यावेळी त्यांनी खत कंपन्यांच्या कथित 'लिकिंग' प्रकरणावर गंभीर आरोप केले.
राज्यात अनेक ठिकाणी शेतकरी (Farmer) खतासाठी पहाटेपासून कृषी केंद्रांबाहेर रांगा लावत असल्याचे चित्र आहे. विशेषतः विदर्भ आणि मराठवाड्यात खत टंचाईची परिस्थिती अधिक गंभीर असल्याचे सांगितले जात आहे. दुसरीकडे, एल निनोच्या प्रभावामुळे पावसाचे असमान वितरण झाल्याने पिकांवर परिणाम होण्याची शक्यता कृषी तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
यावर्षी अनेक भागांत शेतकरी बनावट बियाणांमुळे दुबार पेरणीच्या संकटाला सामोरे गेले. त्यानंतर आता खत उपलब्ध होत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी वाढत आहे. संगमनेरमध्ये (Sangamner) पहाटेपासून खतासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी झाल्यानंतर शेतकऱ्यांनी महामार्गावर आंदोलन केले. या आंदोलनात महिला शेतकरी आणि कुटुंबीयही सहभागी झाले होते. आंदोलनामुळे सुमारे पाच तास वाहतूक विस्कळीत झाली.
आंदोलनादरम्यान शेतकऱ्यांनी खताची कृत्रिम टंचाई निर्माण करून काळाबाजार होत असल्याचा आरोप केला. परिस्थितीची माहिती मिळताच बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) आंदोलनस्थळी पोहोचले आणि प्रशासनाशी चर्चा केली.
यावेळी बोलताना थोरात म्हणाले की, सध्या पिकांना खत देण्याचा महत्त्वाचा टप्पा आहे. खताचा साठा उपलब्ध असूनही वितरणाला परवानगी दिली जात नसल्याचा आरोप त्यांनी केला. शेतकरी आणि महिला पहाटेपासून रांगेत उभे असूनही त्यांना वेळेवर खत मिळत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. तसेच खतांच्या वाढलेल्या किमतींबाबतही त्यांनी नाराजी व्यक्त केली.
थोरात यांनी पुढे दावा केला की, खत कंपन्यांकडून 'लिकिंग' होत असून त्यामागे मोठ्या स्तरावरील हितसंबंध असावेत. देशातील काही मोठ्या खत कंपन्यांचाही यात सहभाग असल्याचा आरोप त्यांनी केला. "अशा प्रकारचे धाडस कोणाच्या पाठबळाशिवाय होऊ शकत नाही," असे म्हणत त्यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली.
दरम्यान, खत टंचाई, वितरणातील अडचणी आणि शेतकऱ्यांच्या आंदोलनाबाबत प्रशासनाकडून अद्याप अधिकृत प्रतिक्रिया समोर आलेली नाही. शेतकऱ्यांनी तातडीने खत उपलब्ध करून देण्याची मागणी केली असून, आगामी काही दिवसांत परिस्थिती सुधारते का याकडे लक्ष लागले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.